बुधवार, 12 फ़रवरी 2014

लक्ष आजच्या ‘तमाशा’ कडे!

राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेपूर्वी दिलेला इशारा आज सत्यात उतरणार आहे. नऊ तारखेला सभेत मुद्दे मांडल्यावर महाराष्ट्रात काय ‘तमाशा’ होतो ते बघा अशा अर्थाचे वक्तव्य राज यांनी केले होते. अखेर तो दिवस उगवला आहे. आज कोणत्याही परिस्थितीत लोकशाही मार्गाने राज्यातील सर्व हमरस्ते जाम करण्यात येतील असा इशारा काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार बैठकीत राज यांनी दिल्याने आता सर्वाचेच लक्ष आज काय होणार? याकडेच लागून राहिले आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून ‘राज यांचे नाव बदलून नवे नाटक’ अशी टिका करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना ज्यांच्या अंगावर साधी डास मारल्याचीही केस नाही त्यांनी याबाबतीत बोलू नये असा ठाकरी सल्ला राज यांनी देतानाच सरकारला याप्रश्‍नी दि. 21 फेब्रुवारी पर्यत हा प्रश्‍न मार्गी लावण्याची मुदत दिली आहे. एकूणच अजून काही दिवस तरी महाराष्ट्र ढवळून निघणार असून सतत राज यांचेच नाव चर्चेत राहणार आहे.
मनसे म्हणजे तोडफोड हे समीकरण झाले असताना आज मनसैनिक चक्क अहिंंसात्मक पध्दतीने आंदोलन करणार असल्याने अनेकांना आश्‍चर्य झाले असेल परंतु हा बदल अल्पकाळासाठीच आहे. कारण राज यांनी कालच्या पत्रकार बैठकीत दि. 21 पर्यत या प्रश्‍नाचा निकाल लागला नाही तर आम्हाला आमच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल अशी धमकीच राज्य सरकारला दिली आहे. परवाच्या सभेत राज यांनी जे टोलप्रश्‍नी मुद्दे उपस्थित केले ते बिनतोड असेच होते. त्यामुळे शिवसेनेसह भाजपानेही केवळ विरोधाला विरोध हे  धोरण ठेवून उपयोग नाही. शिवसेनेकडून मनसेवर नाटक कंपनी म्हणून टिका करण्यात आली असली तरी महाराष्ट्रात याच नाटक कंपनीने सेनेच्या तोंडास फेस आणला होतो हे विसरुन कसे बरे चालेल?
टोलप्रश्‍नी म्हणावा तसा जनतेचे समर्थन राज यांना मिळत नसल्याचेच दिसत होते. कारण आतापर्यंतचे आंदोलन हे हिंसक पध्दतीचे होते. परंतु आज होणार्‍या आंदोलनात सामान्य नागरिक सहभागी होतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर धर्मांधांनी केलेल्या दंग्यानंतर राज यांनी जो भव्य मोर्चा काढला होता. त्याला खरेच प्रतिसादही चांगला मिळाला होता यात वादच नाही. त्यामुळे जनतेचाच प्रश्‍न घेऊन निघणार्‍या 21 च्या मोर्चाकडेही सर्वांचे लक्ष आहे. तोपर्यत सरकारने ठोस पावले उचलली तर चांगले होईल अन्यथा त्यानंतर तोडफोडीचेच सत्र महाराष्ट्रात पहावयास मिळेल हे नक्की!

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें