बुधवार, 9 अप्रैल 2014

केजरीवाल्यांच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आम आदमीच!

49 दिवसांचे दिल्लीतील मुख्यमंत्रीपद भुषविणार्‍या अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीतील एका रोड शोमध्ये एका सामान्य रिक्षावाल्याने सणसणीत कानाखाली लगावली. आणि प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने त्याचा आवाज संपूर्ण देशात ऐकायला गेला. यानंतर केजरीवालयांच्या शांततामय समर्थकांनी कानाखाली लगावणार्‍या रिक्षावाल्याची धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नेहमीप्रमाणे केजरीवाल यांनी आपल्या समर्थकांना शांततेचा उपदेश केला. हे असे तिसर्‍यांदा झाले आहे. म्हणजेच यापूर्वी केजरीवालांवर तिनदा हल्लयाचा प्रयत्न झाला आणि तो आम आदमीनेच केला होता. आता केजरीवाल यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत महत्वाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे, तो म्हणजे माझ्यावर हल्ला करणार्‍यांच्या मागील मास्टरमाईंड कोण? परंतु याचे साधे सरळ उत्तर जनतेच्या मनात आहे ते म्हणजे आम आदमी!
केजरीवाल यांचे वागणे कसे दुतोंडी आहे यावर वारंवार शिक्कामोर्तब झाले आहे. केजरीवाल वास्तविक पूर्णपणे नास्तिक आहेत. परंतु ज्यावेळी ते वाराणसीला गेले त्यावेळी त्यांनी गंगेत एकदा नव्हे तर अनेकदा डुबकी मारली. कारण फोटोग्राफरना चांगली पोजच मिळत नव्हती. त्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन माथा टेकला. काय हे सर्व करायची गरज होती. तुम्ही नास्तिक आहात तर निडरपणे जनतेसमोर जा ना! की, मी नास्तिक आहे त्यामुळे मी गंगेत डुबकी मारणार नाही आणि शिवमंदिरात जाणार नाही. परंतु प्रत्येक ठिकाणीच वागणे दुहेरी असल्याने केजरीवाल त्यांच्या परंपरेला जागले. यात चुकीचे काहीच नाही. आज दिल्लीतील रॅलीत एका रिक्षावाल्याने केजरीवालांना प्रथम पाच ते दहा रुपयांचा हार घातला आणि मग त्यांच्या सणसणीत कानाखाली लगावली. ही थप्पड एवढी जोरात होती की, केजरीवाल यांचा गाल सुजला. यानंतर त्यांनी रॅली अर्धवट सोडून तत्काळ म. गांधीजींच्या राजघाटावर धाव घेतली आणि आण्णा स्टाईल धरणे आंदोलन केले. ही नौटंकी आता जनतेला माहित झाली आहे.
इथे एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. मध्यंतरी बिहार येथे  भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा सुरु होण्याअगोदर सभाठिकाण बॉम्बस्फोटाने दणाणून गेले होते. असे असले तरीही कोणाही न घाबरता मोदी यांनी जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले. आणि जनतेने देखिल बॉम्बच्या भितीने सभास्थानापासून काढता पाय न काढता संपूर्ण सभा शांततेत ऐकली. दुसरीकडे दिल्लीत केजरीवाल यांच्याच आम आदमीने त्यांच्या कानाखाली लगावल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचार रॅली अर्धवट सोडून तेथून पळ काढला. याला काय म्हणायचे? असाच प्रश्‍न सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
आम्ही अहिंसेवर विश्‍वास ठेवतो असा केजरीवाल यांचा दावा आहे. मग असे असेल तर म. गांधीच्या तत्वज्ञानानुसार एका गालावर थप्पड मारल्यावर केजरीवाल यांनी दुसरा गाल पुढे करायला पाहिजे होता. मात्र घडले उलटेच कानफटात लगावणार्‍या त्या रिक्षावाल्यालाच केजरीवाल समर्थकांनी बेदम चोपले. खरं तरं केजरीवाल यांनी हिंसा करणार्‍या त्यांच्या समर्थकांना पक्षातून तत्काळ निलंबित करायला पाहिजे होते. परंतु नेहमी दुतोंडीपणाचा वारसा जपणार्‍या केजरीवालांकडून ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?
या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? हा प्रश्‍न विचारुन केजरीवाल आता राजकीय सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेच दिसते. विरोधी पक्ष या थराला जातील असे वाटत नाही. त्यामुळे दुसर्‍यावर आरोप करण्यापेक्षा केजरीवाल यांनी त्यांच्या वर्तवणुकीचाच आढावा घेणे गरजेेचे आहे. याचेही राजकारण केल्यास केजरीवाल यांचा आप पक्षालाच तोटा होईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनताच आप पक्षाला सणसणीत उत्तर देईल असेच चित्र आहे.

मंगलवार, 8 अप्रैल 2014

भारतमातेसाठी मतदान करा !

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविण्याचा निर्धार आवश्यक आहे. मतदान शंभर टक्के झाले म्हणजे यशस्वी झाली असे नाही. मतदान का करायचे, कोणत्या गोष्टींचा विचार करुन करायचे. याचाही थोडा विचार करा. महागाईचा फटका बसलेला नाही अशी सर्वसामान्य व्यक्ती या देशात शोधून काढावी लागेल. शेतकर्‍यांनी गेली काही वर्षे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले आहे. मग ही महागाई कशामुळे? याचं उत्तर आहे. बेबंद भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. हजारो कोटींच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे डोळेझाक करणे आपल्याला यापुढे परवडणार आहे का, याचा मनाशी गांभीर्याने विचार करा. नाहीतर महागाईचा हा वणवा तुम्हा आम्हाला पुरता फस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि देशाला पूर्ण गिळंकृत केल्याशिवायही राहणार नाही. हे आपण उघड्या डोळ्यांनी स्वस्थपणे पाहत राहणार का?
रोजगाराच्या संधी आटल्या आहेत. उद्योगक्षेत्रातील गुंतवणुक मंदावली आहे. परकीय भांडवलाचा ओघ थांबला आहे. सेवाक्षेत्राची घोडदौड पूर्ण थांबली आहे. उत्पादनक्षेत्र नामषेश होईल. असे भयावह चित्र आहे. नव्याने उद्योग सुरु होण्यासाठी अनुकुलता नाही आणि नव उद्योजकांचे मनोधैर्य पूर्ण खचलेले आहे. विजेच्या टंचाईमुळे ना शेतकर्‍याला त्याची कामगिरी बजावता येतेय, ना उद्योगांना झेप घेता येतेय. आर्थिक पातळीवरील ही दाणादाण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात लोटणार का?
भारताच्या सीमा तर सुरक्षित नाहीतच, पण अंतर्गत सुरक्षेसाठी खिंडार पडलेले आहे. इंडियन मुजाहिदीनसारख्या शक्तींनी संपूर्ण देशात जाळे पसरले आहे आणि देशातील 275 जिल्ह्यात माओवाद्यांच्या आव्हानाने गंभीररुप धारण केलेले आहे. बुध्दीवंत म्हणविणारे लोक या शक्तींचे खुलेआम समर्थन करण्यात सोकावलेले आहेत.या देशाला अस्थिर करण्यात रस असणार्‍या परकीय शक्ती पूर्ण ताकदीनिशी तुटून पडलेल्या आहेत. कमकुवत सरकार, दुबळे नेतृत्व या देशात स्थैर्य निर्माण करु शकणार नाहीत. आहे हे ठिक आहे. असे तुम्हाला वाटते का?
धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा मतपेटीच्या राजकारणासाठी वापरला जात आहे. देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला समान न्याय, समान संधी उपलब्ध करुन देण्याचे तत्व पायदळी तुडविले जात आहे. अल्पसंख्यक समाजाला देशाच्या विकासप्रक्रियेत मनापासून सहभागी करुन घेण्याऐवजी त्यांच्या मनात भयगंड उत्पन्न करण्याची राजनीती वापरली जात आहे. भाषा आणि जात या मुद्दयावरही तेढ निर्माण करण्यासाठी सत्तास्थानी असणारे खतपाणी घालत आहेत. एक देश, एक घटना, समान संधी, समान न्याय असा विचार करणार्‍या शक्ती बळकट झाल्या, तरच देश एकसंघपणे उभा राहिल. भाषा आणि जात, तथाकथिक प्रादेशिक अस्मिता असा संकुचित विचार करुन केलेले मतदान देशाच्या प्रगतीला बाधा आणणार नाही ना? त्याचप्रमाणे व्यवस्था परिवर्तनाच्या नावाखाली अराजकता निर्माण करणार्‍या शक्तींचा धोका ओळखून मतदान केले पाहिजे.
देशातील अडीच कोटी युवा मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पिढीला विकासात रस आहे. तिची लोकशाहीवरची श्रध्दा कायम ठेवायची असेल, या पिढीचे भवितव्य उज्वल करायचे असेल. तर अर्थव्यवस्थेला गती देणारे, विकासाची कास धरणारे, भ्रष्टाचाराला थारा न देणारे, सक्षम सरकार आवश्यक आहे. असे सरकार लाभणे आपण मतदानाचा हक्क कसा बजावतो. यावर अवलंबून आहे. देशासाठी आश्‍वासक वातावरण निर्माण करण्यासाठीच आपले मतदान होते आहे ना, याचाही विचार करणे गरजे

 

गुरुवार, 3 अप्रैल 2014

निस्वार्थी वृत्ती हवी आहे!

सध्याचे जग हे स्वार्थी झाले आहे. आपला काही फायदा असेल तरच काम करायचे हाच अनेकांचा जीवन जगण्याचा मंत्र आहे. त्यामुळे आजकाल निस्वार्थी वृत्तीने काम करणार्‍या व्यक्ती फारच कमी पाहायला मिळतात. प्रामुख्याने आपल्या समोर राजकारणाचेच चित्र असल्यामुळे कदाचित आपल्याला सर्वत्र स्वार्थी वृत्तीने पछाडलेलेच लोक दिसतात. आणि ही वस्तुस्थिती नाकारुन काहीही उपयोग नाही. परंतु असे असले तरी विविध क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने सेवा करणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्याकडे आपले लक्ष जात नाही. किंवा गेले तरी त्याला वेडा ठरविण्याकडेच आपला कल असतो. वास्तविक देशाला पुन्हा वैभव शिखराला न्यायचे असेल तर आज अशाच निस्वार्थी लोकांची अत्यंत आवश्यकता आहे.
माणसाच्या डोक्यात एकदा स्वार्थी वृत्तीची नशा चढली की त्याला दुसरे तिसरे काही दिसत नाही असे म्हणतात. अर्थात याचा अनुभव आपण घेतच असतो. निरपेक्षपणे कोणते काम करायचे असते ही कल्पनात अनेकांना करवत नाही. सतत मी आणि माझा फायदा या दोन मुद्दयांभोवतीच अनेकजण घोटाळताना आपण पाहतो. साहजिकच ज्यावेळी समाजरुपी स्वार्थी वाळवंटात ज्यावेळी आपल्याला ओअ‍ॅसिसच्या रुपात निस्वार्थीपणे कार्य करणार्‍या व्यक्ती दिसतात तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटल्यावाचून राहत नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अनेक संघटना विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यापैकी कित्येकजण कोणताही मोबदला घेत नाहीत. तर ते आपले कर्तव्यच आहे याच भावनेतून ते सतत कार्यशील असतात.
कोणतीही गोष्ट निरपेक्ष वृत्तीने केली तर मिळणारे आत्मिक समाधान हे अपूर्व असेच असते. याची कल्पना आर्थिक लाभ लक्षात घेऊन सतत काम करणार्‍यांना कधीच येणार नाही. आपण समाजाचाच एक भाग आहोत ही कल्पनाच हळूहळू पुसट होऊ लागली आहे. आपण सुखी झालो की जीवीतकार्य संपले अशीच मनोधारणा अनेकांची तयार होऊ लागली आहे. त्यामध्ये बदल घडविणे गरजेचे आहे. आपण  सुखी झालेच पाहिजे यात शंका नाही परंतु त्याचबरोबरीने समाज देखील कसा उन्नत होईल यादृष्टीनेही आपण सर्वांनी प्रयत्न करायला नकोत का? उदा. आजकाल वैद्यकीय उपचार घेणे म्हणजे खिशाला चाट असेच समीकरण बनले आहे. साहजिकच गरीब काय मध्यमवर्गींयांनाही रुग्णालय आणि डॉक्टर म्हटले की अंगावर काटा येतो. मग समाजात ज्यांचा वैद्यकीय व्यवयास जोरात चालला आहे त्या डॉक्टरांनी निदान महिन्यातून एक दिवस खेडोपाडी जाऊन रुग्ण तपासणी मोफत करुन त्यांच्यावर अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया अथवा उपचार करण्यास काय अडचण आहे? परंतु हे होताना दिसत नाही. कितीही पैसा कमावला तरी पैशाची काही हाव संपत नाही. त्यामुळे समाजसेवा हा शब्दच कित्येकांच्या डिक्शनरीत आढळत नाही.
असे चित्र असले तरीही आज बर्‍याच प्रमाणात सामाजिक कार्यामध्ये भाग घेणार्‍यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे चित्र नक्कीच आशादायक आहे. भविष्यात आपल्यापैकी प्रत्येकानेच दिवसातला निदान एक तास समाजासाठी दिला तरी खूप सामाजिक कार्य होईल यात तिळमात्र शंका नाही.