गुरुवार, 3 अप्रैल 2014

निस्वार्थी वृत्ती हवी आहे!

सध्याचे जग हे स्वार्थी झाले आहे. आपला काही फायदा असेल तरच काम करायचे हाच अनेकांचा जीवन जगण्याचा मंत्र आहे. त्यामुळे आजकाल निस्वार्थी वृत्तीने काम करणार्‍या व्यक्ती फारच कमी पाहायला मिळतात. प्रामुख्याने आपल्या समोर राजकारणाचेच चित्र असल्यामुळे कदाचित आपल्याला सर्वत्र स्वार्थी वृत्तीने पछाडलेलेच लोक दिसतात. आणि ही वस्तुस्थिती नाकारुन काहीही उपयोग नाही. परंतु असे असले तरी विविध क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने सेवा करणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्याकडे आपले लक्ष जात नाही. किंवा गेले तरी त्याला वेडा ठरविण्याकडेच आपला कल असतो. वास्तविक देशाला पुन्हा वैभव शिखराला न्यायचे असेल तर आज अशाच निस्वार्थी लोकांची अत्यंत आवश्यकता आहे.
माणसाच्या डोक्यात एकदा स्वार्थी वृत्तीची नशा चढली की त्याला दुसरे तिसरे काही दिसत नाही असे म्हणतात. अर्थात याचा अनुभव आपण घेतच असतो. निरपेक्षपणे कोणते काम करायचे असते ही कल्पनात अनेकांना करवत नाही. सतत मी आणि माझा फायदा या दोन मुद्दयांभोवतीच अनेकजण घोटाळताना आपण पाहतो. साहजिकच ज्यावेळी समाजरुपी स्वार्थी वाळवंटात ज्यावेळी आपल्याला ओअ‍ॅसिसच्या रुपात निस्वार्थीपणे कार्य करणार्‍या व्यक्ती दिसतात तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटल्यावाचून राहत नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अनेक संघटना विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यापैकी कित्येकजण कोणताही मोबदला घेत नाहीत. तर ते आपले कर्तव्यच आहे याच भावनेतून ते सतत कार्यशील असतात.
कोणतीही गोष्ट निरपेक्ष वृत्तीने केली तर मिळणारे आत्मिक समाधान हे अपूर्व असेच असते. याची कल्पना आर्थिक लाभ लक्षात घेऊन सतत काम करणार्‍यांना कधीच येणार नाही. आपण समाजाचाच एक भाग आहोत ही कल्पनाच हळूहळू पुसट होऊ लागली आहे. आपण सुखी झालो की जीवीतकार्य संपले अशीच मनोधारणा अनेकांची तयार होऊ लागली आहे. त्यामध्ये बदल घडविणे गरजेचे आहे. आपण  सुखी झालेच पाहिजे यात शंका नाही परंतु त्याचबरोबरीने समाज देखील कसा उन्नत होईल यादृष्टीनेही आपण सर्वांनी प्रयत्न करायला नकोत का? उदा. आजकाल वैद्यकीय उपचार घेणे म्हणजे खिशाला चाट असेच समीकरण बनले आहे. साहजिकच गरीब काय मध्यमवर्गींयांनाही रुग्णालय आणि डॉक्टर म्हटले की अंगावर काटा येतो. मग समाजात ज्यांचा वैद्यकीय व्यवयास जोरात चालला आहे त्या डॉक्टरांनी निदान महिन्यातून एक दिवस खेडोपाडी जाऊन रुग्ण तपासणी मोफत करुन त्यांच्यावर अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया अथवा उपचार करण्यास काय अडचण आहे? परंतु हे होताना दिसत नाही. कितीही पैसा कमावला तरी पैशाची काही हाव संपत नाही. त्यामुळे समाजसेवा हा शब्दच कित्येकांच्या डिक्शनरीत आढळत नाही.
असे चित्र असले तरीही आज बर्‍याच प्रमाणात सामाजिक कार्यामध्ये भाग घेणार्‍यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे चित्र नक्कीच आशादायक आहे. भविष्यात आपल्यापैकी प्रत्येकानेच दिवसातला निदान एक तास समाजासाठी दिला तरी खूप सामाजिक कार्य होईल यात तिळमात्र शंका नाही.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें