मंगलवार, 31 दिसंबर 2013

घमंड नको!

रामलीला मैदानावर जनहितार्थ आंदोलने करणारे अरविंद केजरीवाल यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच ही घटना आहे. बहुधा त्यामुळेच त्यांची तुलना अनिल कपूर अभिनीत नायक या चित्रपटाशी करण्यात येते. केजरीवाल यांनी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर जे भाषण केले ते केवळ 'आप'च्या नेते आणि कार्यकर्त्यांनीच नव्हे तर सर्वच पक्षात कार्य करणार्‍यांसाठी मार्गदर्शक असेच आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घमंड येऊ देऊ नका असा प्रेमळ सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला. या घटनेला एक दिवस होत नाही तोपर्यत त्यांच्याच पक्षातील नेते कुमार विश्‍वास यांनी आत्मप्रौढी मिरवित दम असेल तर अमेठीतून निवडणुकीला उभे राहण्याचे आव्हान थेट भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच दिले आहे. यावर अजून तरी केजरीवाल यांनी प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही.
आम आदमी पक्षाने दिल्लीत जे यश मिळवून सरकार स्थापन केले आहे ते निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणाचाही पाठिंबा मागितला नसला तरी कॉग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. परंतु असे असले तरीही आपचे नेते कॉग्रेसवरच टिका करण्याचे धाडस करीत आहेत. यावरुन आपच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी नेत्यांना हाकलून लावायचे आहेे. यामध्ये खरे तर कॉग्रेसचीच गोची होणार आहे. कारण प्रथम पुढाकार घेऊन पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जर विनाकारण पाठिंबा काढला तर त्याचा तोटा कॉग्रेसलाच होईल यात शंका नाही. परंतु त्याचवेळी आपच्या नेत्यांनी केजरीवाल यांनी घालून दिलेली आचारसंहिता जोपासली पाहिजे.
आपल्याला लोकांची कामे करायची आहेत. हे कधीही विसरुन चालणार नाही. त्यामुळेच इतर राजकीय पक्षातील नेत्याप्रमाणे मनाला येईल तशी शेरेबाजी त्यांनी करणे कटाक्षाने टाळले पाहिेजे. कारण बाकीच्यांना केवळ राजकारण करायचे असते असाच सामान्यांचा समज आहे. परंतु आप पक्षाला समाजकारणाला महत्व द्यायचे असल्याने त्यांनी राजकारणातील आरोप प्रत्यरोपांच्या फैरी न झाडलेल्याच चांगल्या. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याची गर्जना करणार्‍या विश्‍वास यांनी आता मोदींना फुकटचा सल्ला दिला आहे. याची खरेच गरज होती का? असाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. कोण कोणाविरोधात लढणार हे ज्या त्या वेळी पाहिले जाईल. त्यामुळे आतापासून एकमेकांना इशारे देऊन मीच खरा प्रामाणिक असा आव आणण्यात अर्थ नाही.इतर राजकीय पक्ष आणि आप याचे वेगळेपण लोकांच्या नजरेत कायम भरले पाहिजे. तरच अल्पावधीत जरी सरकार पडले तरी पुढील निवडणूकीत आपला एकहाती सत्ता मिळण्याची चिन्हे असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे घमंड अर्थात गर्वाला मुठमातीच दिली पाहिजे. अन्यथा याचा फटका 'आप'ला पुढील निवडणूकीत हमखास बसेल यात शंका नाही.

सोमवार, 30 दिसंबर 2013

मस्ती की पाठशाला !

देशात, बलात्कार कसा करावा? खून कसा करावा? चोर्‍या कोणत्या पध्दतीने कराव्यात यासह अन्य गुन्हे सराईतपणे कसे करावेत हे शिकविणारी कोणतीही पाठ्यशाळा उपलब्ध नाहीत. तरीही समाजात गुन्हेगारीचा आलेख सतत चढताच आहे. हे कशामुळे होते? याचा विचार शिक्षक आणि पालक कधीतरी शांतपणे करणार आहेत का? हल्लीच्या काळात शाळेत जाणे म्हणजे टाईमपास करण्याकरिता जाणे! असाच अनेक पाल्यांचा समज झालेला आहे. कारण शाळा सुटल्यानंतर प्रायव्हेट क्लासमध्ये काय शिकविले जाते? याकडेच अनेक पाल्यांचे लक्ष असते. तीच गत महाविद्यालयाची! आजकाल पूर्वीसारखा शिक्षकांचा धाक उरलेला नाही. पालकांचा दरारा तर केव्हाच इतिहासजमा झाला आहे. आज विद्यार्थीच शिक्षक आणि पालकांना खडे बोल सुनावण्यास मागे पुढे पाहत नाहीत. हे चित्र बदलण्याकरिता आपण सर्वानीच सामुहिक प्रयत्न करायला पाहिजेत.
शाळा हे मंदिर आहे हे वाक्य आता केवळ पाठ्यपुस्तकांतच वाचायले मिळते. परंतु वास्तवात काय चित्र दिसते? तेथे केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षण मिळते की, विद्यार्थ्यांवर खरेच राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारे शिक्षण मिळते ? हे पाहणे बहुसंख्य पालकांना महत्वाचे वाटत नाही. आपल्या पाल्य इंग्लिश मिडीअममध्ये शिकला म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता झाली असाच अनेकांचा समज असतो. यासाठी कितीही पैसे डोनेशन म्हणून मोजण्यास पालक तयार असतात. बालवाडीपासून उच्चशिक्षणाशिवाय शाळेच्या फी व्यतिरिक्त पालकांच्या खिशातून जादा पैसे अनेक संस्थाचालक उकळतात. आणि त्याला डोनेशन असे गोंडस नाव देतात. म्हणजे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर काहीतरी जादा दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. हाच संस्कार होतो ना? मग मोठेपणी निस्वार्थ भावनेने काम करणे म्हणजे हा अनेकांना मुर्खपणाच वाटतो. परंतु याला अपवादही काहीजण आहेत. आज काही सेवाभावी संस्थां/संघटनांमधून उच्चशिक्षण घेतलेले परंतु गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या लाथाडून ,अविवाहित राहून समाजासाठीच आपले जीवन समर्पित करणारी व्यक्तीमत्वही याच मातीत जन्माला येत आहेत.
सुखाची परिभाषाच आता बदलली आहे. वाट्टेल ते करुन पैसा कमावणे आणि भौतिक साधनात रममाण होणे म्हणजे सुख! असेच अनेकांना वाटते. परंतु शारिरीक समाधान हे दिवसेंदिवस वाढतच असते. ते कधीच पूर्ण होत नाही. आपल्याला मानसिक समाधान मिळते का? हा प्रश्‍न कितीजण स्वत:ला विचारतात. प्रचंड पैसे कमावलेल्या माणसाला मऊ बिछान्यावर झोप येत नाही. तर एखाद्या साधू, सन्यासी किंवा निरपेक्ष भावनेने काम केलेल्या कोणीही साध्या जमीनीवर देखिल आडवे पडल्यावर काही क्षणांत शांत झोपतो? हे कशाचे लक्षण आहे. आपल्या देशाला गौरवशाली इतिहास आहे. परंतु त्या इतिहासाचा केवळ जागर करण्यातच आम्ही धन्यता मानणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच. पैश्याच्या मागे लागून आयुष्य वाया घालविण्यापेक्षा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केला पाहिजे. पैसा मिळविलाच पाहिजे पण तो सचोटीच्या मार्गाने हा संस्कार देशाच्या भावी आधारस्तंभांवर होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी शाळा तसेच महाविद्यालये या मस्ती करण्याचे ठिकाण होता कामा नयेत. तर तेथून भविष्यकाळात गतकाळातील समाजसुधारकांचा वारसा पुढे चालविणारे अनेकजण घडावेत या दृष्टीने शाळांनी आपली वाटचाल ठेवली पाहिजे.

रविवार, 29 दिसंबर 2013

वेगाची नशा कधी संपणार?

सध्या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोजचे वृत्तपत्र उघडले की हमखास अपघाताची बातमी असतेच. यामध्ये बहुतेक अपघात होतात हे अनेकांच्या डोक्यात गेलेल्या वेगाच्या नशेमुळे होतात. रस्ता म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टीच आहे अशा आविर्भावात अनेकजण वाहन चालवित असतात. त्यामध्ये देखिल हॉलीवुड आणि बॉलीवुड चित्रपटांचा प्रभाव या नशावीरांवर असतोच. वास्तविक अपघात होऊ नयेत यासाठी  हमरस्त्यावर वाहन सावकाश चालवा, वेगाची नशा करी जीवनाची दुर्दशा या प्रकारचे जे फलक असतात. परंतु त्याकडे पाहण्यास कोणाला वेळ असतो? जो तो आपल्याच वेगात दौडत असतो. 
21 वे शतक म्हणजे सुपरफास्ट शतक असा एक चुकीचा समज आपण करुन घेतला आहे. तुम्हाला इच्छित स्थळी जर योग्य वेळी पोहचायचे असेल तर घरातून 15 ते 20 मिनीटे लवकर निघा ना? पण नाही! उशीरा निघून लवकर पोहचायची जर इच्छा मनात धरली आणि त्यानुसार कृती केली तर दुसरे काय होणार? रात्रीच्या वेळी तर काही वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवतात किंवा त्यांची झोप तरी पूर्ण झालेली नसते. आणि मग नको ते प्रकार घडतात. मध्यंतरी मराठी चित्रपट आणि मालिकांमधील हरहुन्नरी कलावंत आनंद अभ्यंकर, भक्ती बर्वे या अपघातातच गेल्या हे कधीच विसरता येणार नाही. अपघाताचा धसका बर्‍याच कलावंतानी घेतलेला आहे. कारण त्यांनी रात्रीचा प्रवास कमी केला आहे. जीवन हे अनमोल असते ते अशा अपघातात वाया का घालवायचे? हा प्रश्‍न कोणाच्याच मनात निर्माण होत नाही.
चित्रपटांमधून गाड्या पळविण्याचे जे प्रकार दाखविले जातात. त्यामध्ये कॉम्पुटरची करामतीचा भाग असतो हे आपण कसे विसरतो? आणि जो हिरो पडद्यावर रुबाब मारतो तो स्टंट सीन करताना अनेकदा डमीचा आधार घेतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण ज्यावेळी आपला जीव धोक्यात घालतो त्यावेळी त्यावेळी आपल्य मागे असलेल्या कुटुंबाला काय वाटेल याचा साधा विचारही आपण करीत नाही? आपण कुणाचा तरी मुलगा, पती, जावई,बाप असतो हे आपल्या लक्षात येत नाही. कारण वेगाची नशा आपल्या डोक्यात गेलेली असते. त्यामुळे एक वेळ असा विचार मनात येतो की, प्रत्येक वाहनांमध्ये वेगाची गती किती असावी? निश्‍चित केले जावे. त्यामुळे तरी काही प्रमाणात अपघातांचे प्रमाण कमी होईल. कायदे करुन प्रश्‍न संपत नाहीत तर ते निर्माण होतात. लोकांची मानसिकता जोपर्यत बदलत नाही. तोपर्यत काहीही उपयोग होणार नाही. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनीच पुढाकार घ्यावे आवश्यक आहे.

शनिवार, 28 दिसंबर 2013

आता तरी शहाणे व्हा!

आपल्याकडील तरुण पिढी पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करण्यातच धन्यता मानत असल्याचे पहावयास मिळते. परंतु पाश्‍चात्यळलेल्या  आणि पिझ्झा आणि बर्गरप्रेमी तरुणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाईल अशी बातमी प्रकाशात आली आहे. भारतीयांना फास्ट फूडची चटक लावणार्‍या मॅकडोनाल्ड कंपनीने त्यांच्या कंपनीत कामास असणार्‍या कर्मचार्‍यांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार ग्राहकांना आपले पदार्थ केवळ सर्व्ह करा परंतु तुम्ही या पदार्थांच्या आहारी जाऊ नका असा सल्ला दिला आहे. कारण काय तर फास्ट फूड खाल्याने अनेक आजारांना तोंड द्यावे लागते हे मॅकडोनाल्ड कंपनीला समजले आहे. म्हणजे थोडक्यात स्वत:च्या फायद्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळा असाच फतवा कंपनीने काढला आहे.
काही वर्षापासून भारतीयांच्या तब्येतीच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे आपण काय खातो? हे आहे. प्रामुख्याने शहरात पती -  पत्नी दोघेही नोकरी करीत असतात. त्यामुळे स्वयंपाक करण्यास बहुतांशीवेळा टाळाटाळच केली जाते. आणि मग फास्ट फूडला जवळ केले जाते. फास्ट फूडमुळे स्वयंपाकाचा वेळ निश्‍चित वाचतो. परंतु ते पदार्थ प्रकृतीला अपायकारक असल्याचे भारतीय तज्ञांनी अनेकवेळेला सांगितले आहे. परंतु त्यावर विश्‍वास ठेवायला आपले भारतीय मन तयार होत नाही. जर तोच विचार कोणी पाश्‍चात्य विचारवंताने अथवा तज्ञांनी सांगितला तर मात्र आपण त्यांचे म्हणणे गांभिर्याने घेतो. पूर्वीच्या काळातील माणसे पहा, त्यांचे खाणे खरोखरच पौष्टिक होते. त्यामुळेच त्यांच्या तब्येती धडधाकट होत्या. आपल्याकडील आजी - आजोबा यांच्या तब्येती पहा ना! बहुतांशी जणांच्या तब्येती अजून उत्तम आहेत. याउलट आताची तरुण पिढी घ्या! तीशीतच अनेक तरुण ढेपाळलेले पहावयास मिळतात. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. कारण देशाची पिढीच जर अनेक रोगांचे माहेरघर असलेली निर्माण झाली तर अवघड आहे.
घरचे खाणे त्यांना माहितच नाही. बाहेर गेले की कोठल्यातरी रेस्टॉरंट मध्ये जायचे, स्टेटस जपण्यासाठी पिझ्झा, बर्गरची ऑर्डर द्यायची, सोबत कोक अथवा पेप्सी घ्यायची. हे यांचे तंत्र. परंतु यामुळे आपण आपल्या प्रकृतीवरच आघात करीत आहोत हे किती जणांच्या लक्षात येते. फास्ट फूड खाल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रद्याशी संबंधित विविध आजार आपल्या शरीरात घर करतात हे कोणीच लक्षात घेत नाही. स्वत:च्या खिशाला चाट लावून फालतू पदार्थ खाण्यापेक्षा भाकरी -  पिठले कधीही उत्तम!  परंतु ते खाण्यात कित्येकांना कमीपणा वाटतो.
मध्यंतरी युती शासनाच्या काळात एक रुपयात झुणका भाकर ची योजना सुरु होती. त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी सायंकाळच्या वेळी हमखास झुणका भाकर च्या स्टॉलवर दिसायचे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आताची महागाईचा वाढता रेषो लक्षात घेऊन पुन्हा एकदा वाढीव दराने झुणका भाकर योजना लागू करणे गरजेचे आहे. फास्ट फूड टाळणे अत्यावश्यक आहे. फास्ट फूड विकणार्‍या जगविख्यात कंपनीनेच त्यांच्या कर्मचार्‍यांना फास्ट फूड न खाण्याचा सल्ला दिल्याचे समोर आल्यानंतर तरी आपल्या तरुण पिढीने शहाणे व्हावे!

 

शुक्रवार, 27 दिसंबर 2013

व्यसन करा,महसुल वाढवा!

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 31 डिसेंबर रोजी कित्येक हजार लिटर दारु रिचवली जाईल. परंतु नागरिकांनी मागील वर्षीपेक्षा  यंदा अधिक दारु ढोसावी आणि शासनाच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी सरकारने वर्षअखेरीस पहाटे पाच वाजेपर्यत बार, परमीट रुम्स, हॉटेल्स उघडे ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कहर म्हणजे याच सरकारने दि. 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत व्यसनमुक्ती निर्धार पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त जाहीरातबाजी करण्यात आली असून व्यसन सोडा, माणसं जोडा हा नवा नारा देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात सरकारचे वर्तन पाहता व्यसन करा,महसुल वाढवा असेच त्यांचे धोरण दिसते. त्यामुळे बिनधास्तपणे सरकारने मुक्तपणे दारु प्या अशा जाहीराती कराव्यात अशी मागणी दारुप्रेमींतून होत आहे.
दारु वाईट! यावर सगळ्यांचेच एकमत आहे. असे असले तरीही अनेकजण दारुच्या विळख्यात सापडलेली आपण पाहतो. याला जबाबदार कोण? हा स्वतंत्र विषय आहे. परंतु राज्याचे मायबाप शासन म्हणून सत्ताधार्‍यांचे काही कर्तव्य आहे की नाही? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महात्मा गांधीचे नाव घेवून राज्यकारभार करायचा आणि नेमके त्यांच्या तत्वाच्या विरोधात वर्तन करायचे हे कोठले धोरण? देशाचे आधारस्तंभ म्हणून युवकांकडे पाहिले जाते. वास्तविक त्यांच्यावर चांगले संस्कार करुन समाजभान जागृत करण्याचे कार्य सरकारने केले पाहिजे. पण दुर्दे:वाने तसे होताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत जर केवळ पैशालाच महत्व दिले गेले तर समाजहिताचे निर्णय केराच्या टोपलीतच पडतील. नेमके तसेच दारुबंदीेचे झाले आहे. सरकारचे नेमके धोरण काय? हेच सामान्य माणसाला कळेनासे झाले आहे. म्हणजे एकीकडे व्यसनमुक्ती सप्ताह राबवायचा. त्यासाठी पैसे खर्च करायचे. तर दुसरीकडे ते खर्च झालेल्या भरपाईसाठी 31 डिसेंबर रोजी पहाटेपर्यत बार चालू ठेवण्याला परवानगी द्यायची. काय म्हणायचे या नितीला? संबंधित बार चालकाकडून प्रति तासाला 250 रुपये जादा आकारण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे दारु विक्रीतून राज्य सरकारला प्रतिवर्षी दहा हजार कोटी रुपयांचा महसुल मिळतो. प्रतिवर्षी या महसुलात वाढच होताना दिसते आहे. याचा अर्थच महाराष्ट्रातील तरुण पिढी दारुच्या आहारी जात आहे. निवडणुकीत तरी दुसरे काय होते. महिनाभर नेत्यांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना रात्री मटण आणि दारु पुरविली जाते. आणि तेथूनच खर्‍या अर्थाने तरुण पिढीला दारुची चटक लागते. बरं! सध्या व्यसन करायला दारु स्वस्त नाही. तरीही दारुचा खप वाढतो आहे. याचा अर्थच तरुण पिढी स्वकष्टार्जित कमाई दारुत ओतते आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आणि वैयक्तिक त्याचे नुकसानच होताना दिसते. परंतु कळते पण वळत नाही! असे म्हणतात त्यातलाच हा प्रकार.
यंदाच्या 31 डिसेंबर रोजी शासनाने वास्तविक ड्राय डे घोषित केला असता तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. आणि इतर राज्यांना एक आदर्श मिळाला असता. पण ही संधी शासनाने घालविली. आता निदान व्यसनमुक्ती सप्ताह तरी तत्काळ बंद करायला पाहिजे. आणि त्याऐवजी वर्षअखेरीस तरुणांनी भरपूर दारु प्या अशी जागृती करायला पाहिजे. असे सामान्यांना वाटले तर त्यात गैर काही नाही.

गुरुवार, 26 दिसंबर 2013

अर्ध्यावरती डाव मोडणार!

कॉग्रेसच्या पाठिंब्याने का होईना पण अखेर अरविंद केजरीवाल यांनी आपचे सरकार दिल्लीत बनविले. निवडणुकीआधी कॉग्रेसवर वाट्टेल ते आरोप करणार्‍या आपला दिलेला पाठिंबा युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना पसंत पडलेला दिसत नाही. निदान वरवर तरी तसे दिसते. अंतर्गत राजकारण काय असेल? हे सांगण्याची गरज नाही. कॉग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत केजरीवाल यांचे पुतळे जाळले तर काही कार्यकर्त्यांनी थेट कॉग्रेस कार्यालयावरच हल्ला चढविला आणि तोडफोड केल्याचे वृत्त प्रसाारमाध्यमांनी दिले आहे. तर केजरीवाल यांनी कॉग्रेसच्या पाठिंब्याबाबत आम्हाला काही देणे घेणे नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिले आहे. साहजिकच एकूण परिस्थिती पाहता आपच्या सरकारचा अर्ध्यावरती डाव  मोडण्याचीच चिन्हे आहेत. आता प्रतिक्षा आहे ती, सरकार केव्हा कोसळते? याचीच…
दिल्लीत भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला असला तरी बहुमत नसल्याने त्याने सरकार बनविण्याचे धाडस केले नाही. आपचे केजरीवाल यांनी प्रारंभापासूनच आम्ही कोणाचाही पाठिंबा घेणार नाही आणि कोणालाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेेलाच ते जागतील असेच सर्वांना वाटत होते. परंतु त्यांनी अचानक कॉग्रेसचा पाठिंबा घेतला त्याचवेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कॉग्रेसनेही मोठ्या मनाने पाठिंबा देण्याचे धैर्य दाखविले. तोपर्यत कॉग्रेस कार्यकर्त्यांनी तरी काही खळखळ केली नाही. परंतु ज्यावेळी केजरीवाल मुख्यमंत्री बनतील असे जाहीर झाले तेव्हा मात्र युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरुन पुतळे जाळणे, तोडफोड करणे हे उपक्रम इनामइतबारे सुरु केले. अर्थात यामागील सुत्रे देखिल कॉग्रेसच्या नेत्यांनीच हलविली असल्याचे बोलले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
केजरीवाल यांनी तरी अजून सत्तापदी विराजमान होण्याआधीच कॉग्रेस विरोधातील बडबड सुरु केली आहे. कॉग्रेस आणि आप यांनी सरकार बनविताना जनतेवर निवडणुकीच्या पैशाचा चुराडा होऊ नये म्हणून आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा केला होता. त्याऐवजी काही सामाईक कार्यक्रमांवर सहमती केली असती तर ते अधिक श्रेयस्कर झाले असते. आप ने देखिल प्रारंभीच कॉग्रेसवर वार करण्यापेक्षा प्रथम जनतेचे प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला असता तर ते अधिक श्रेयस्कर झाले असते. आपच्याच एका पक्षाने सोशल मिडीयावर कॉग्रेसवर दुतोंडी साप म्हणून टिका केली आहे. वास्तविक असल्या टिकेची काहीही गरज नव्हती. आपण ज्यांचा पाठिंबा घेतो त्यांचाच जर तुम्ही जाहीरपणे पाणउतारा करायला लागलात तर भविष्यकाळ अंधकारमयच असणार.
केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे संकेत दिेले आहेत. दिल्लीतील आतापर्यतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांचे नाव पुढे आले आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की, जर कॉग्रेस आणि आप चे संबंध असेच ताणले गेले तर काही महिन्यातच सरकार कोसळेल आणि सर्वात कमी दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होईल. तसे होऊ नये आणि आप ने कॉग्रेसच्या पाठिंब्यावर अधिकाधिक जनतेचे प्रश्‍न सोडवावेत हीच आम आदमीची इच्छा आहे.

 

बुधवार, 25 दिसंबर 2013

'मोदी फॅक्टर'...

चार राज्यात कॉग्रेसची दाणादाण उडाली आहे. या चारही राज्यात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचारसभा केल्या होत्या. त्यांच्या सभांना झालेली गर्दी प्रसारमाध्यमाव्दारे आपण सर्वांनीच पाहिली आहे. मोदींनी प्रश्‍न विचारल्यावर नागरिकांतून मिळणारा प्रतिसाद देखिल आपण पाहिला आहे. असे असूनही काही भाजपा विरोधक आणि खुद्द अमेरिकेतील तज्ञांच्या मते या विजयात मोदी लाटेचा काहीही वाटा नाही? मग नेमकी मोदी लाट म्हणजे काय? हे त्यांनी स्पष्ट केले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते.
चारही राज्यात कॉग्रेसचे जेवढे आमदार निवडून आले त्यांची बेरीज केली तरी ती मध्यप्रदेशमध्ये भाजपाच्या आमदारांपेक्षा कमी होते. यावरुन लोकांच्या मनात कॉग्रेसच्याप्रती किती राग आहे याची कल्पना येते. निकाल लागल्यावर सोशल मिडीयावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या त्या पाहिल्या की कोणाच्याही चेहर्‍यावर हसू येत होते. समजा नरेंद्र मोदी यांचे नाव योग्य वेळी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले नसते तर आणि त्यांनी झंझावाती प्रचार केला नसता तर भाजपाला किती जागा मिळाल्या असत्या? याचा अर्थ असा नव्हे की जेथे भाजपाची सत्ता होती त्या मुख्यमंत्र्यांचा काहीही प्रभाव नाही. त्यांचा प्रभाव आहेच. परंतु त्याला मोदींची साथ मिळाली हे विसरुन कसे चालेल? बिहारमधील सभेपूर्वी बॉम्बस्फोटांची मालिका होऊन देखिल सभेची गर्दी जराही कमी झाली नाही हे कशाचे द्योतक आहे? जर मोदींचे विचार लोकांना ऐकायचे नसते तर त्यांनी मोदींच्या सभांना गर्दी केली असती का?
राजकीय सभांमध्ये आश्‍वासनांचा पाऊस पाडणे निराळे आणि प्रत्यक्ष योजना राबवून त्यावर नागरिकांशी संवाद साधणे वेगळे! या दोन भिन्न गोष्टी आहेत. मोदींनी गुजरातचा केलेला कायापालट त्यांचे विरोधक देखिल मान्य करतात. त्यामुळे भविष्यात मोदी पंतप्रधान झाले तर संपूर्ण देशाला ते एक प्रकारची शिस्त लावतील असा भाव मतदारांच्या मनात आहे. त्यामुळेच राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये भाजपाला स्वप्नातही वाटले नसेल इतके यश मिळाले आहे. मोदींचे पंतप्रधानपदाचे प्रतिस्पर्धी असलेले राहुल गांधी यांनी एखादे वाक्य उच्चारताच त्यावर धुरळा उडायला पाहिजे होता. तसा तो उडतो परंतु नकारात्मक पध्दतीने. या उलट मोदी इज न्यूज असेच समीकरण तयार झाले आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी मोदी यांना दहा वर्षाहून अधिक काळ तीव्र विरोध केला तीच प्रसारमाध्यमांचे पान आज मोदी यांच्याशिवाय हलत नाही. ही वस्तुस्थिती तर आपण मान्य करणार की नाही? मोदींनी एखादा मुद्दा मांडला की त्यावर प्रसारमाध्यमातून आठवडाभर चर्चा होतात. त्यामुळे त्यांना चर्चेसाठी खाद्य पुरविण्याचे काम मोदीच करतात असे म्हटले तर वावगे होणार नाही.
भाजपा विरोधकांनी निदान आता तरी साखर झोपेतून जागे व्हावे आणि सत्य परिस्थिती स्विकारावी. अमेरिकेच्या तज्ञांने निष्कर्ष मानायचे, राजकीय टिकाकारांचे म्हणणे ग्राह्य धरायचे? की येथील जनतेच्या मनाचा अंदाज घेत पावले टाकायची? याचा फैसला आता सत्ताधार्‍यांना करायचा आहे. शहामृग हा प्राणी बाहेर वादळ आले की वाळून तोंड खुपसून बसतो आणि वादळ गेले की तोंड वरती काढतो. तशी गत आज विरोधकांची झाली आहे. बाहेर मोदींचे वादळ सुरु असताना ते वाळूत तोंड खूुपसून बसले आहेत. परंतु त्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही. विरोधकांनी वाळून खुपसलेले तोंड बाहेर काढून जर सभोवार डोळसपणे नजर टाकावी आणि मग चार राज्यातील विधानसभा निवडणूकात मोदी फॅक्टर नसल्याचा निष्कर्ष काढला तर ते अधिक योग्य होईल.

मंगलवार, 24 दिसंबर 2013

वासनांधांना चौकात फोडा!

आपल्या देशातील काही तरुणांचा ओढा पाश्‍चात्य संस्कृतीकडे आहे. यामध्ये दिवसेंदिवस काही प्रमाणात तरी वाढ होत आहे. तेथील मोकळे वातावरण आपल्याला बरे वाटते. परंतु तेथे बलात्कार झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाचनात येत नाहीत.कारण तेथे फालतू नखरे चालतच नाहीत. गुन्हा केला की कडक शिक्षा हेच सुत्र तेथे अवलंबिले जाते. याउलट भारतात आहे. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू हा परकीय विचार आपल्यापैकी काही जणांना प्रिय आहे. आणि त्यांची त्याच दिशेने वाटचाल असते. नुकतेच कर्नाटकातील मंगळूरु येथे आठ वासनांधांनी एका प्रेमी जोडप्याचे अपहरण करुन त्यांना निर्जन स्थळी नेले. आणि तेथे त्यांना सर्वांसमक्ष सेक्स करण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच तरुणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर त्यांनी सर्वासमक्ष सेक्स केले. त्याची या तरुणांनी व्हिडीओ क्लिप काढून ती कॉम्पुटरवर टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या वासनांध तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी काही दिवसांनी हे वासनांध उजळ माथ्याने समाजात वावरताना आपल्याला दिसतील. याची अनेकांना खात्री आहे. हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे.
वास्तविक पोलिसांनी या वासनांध तरुणांवर कायद्याची अशी कलमे लावली पाहिजेत की त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप झाला पाहिजे. आणि पुन्हा असले कृत्य करताना त्यांनी हजारदा विचार केला पाहिजे. परंतु दुर्दे:वाने असे होताना दिसत नाही. कोणताही गुन्हा करा आणि काही महिन्यांनी अथवा वर्षांनी बिनधास्तपणे बाहेर फिरा हीच वस्तुस्थिती असल्याचे दिसते. एखाद्या महिलेवर बलात्कार करणार्‍या आरोपीला त्याचे काहीही सोयरसुतक नसते. परंतु त्या महिलेचे पूर्ण आयुष्य उध्दवस्त होते. त्याचे काय? महाराष्ट्रातच महिलांवर अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना महिलांनीच तुडवून मारले होते. हे अद्याप कोणी विसरलेले नाही. त्यातीलच एक अक्कू यादव! त्याला तर न्यायालय आवारातच महिलांनी मारले होते. या वासनांधांना अशीच शिक्षा आवश्यक आहे. गुन्हेगारांना जरब बसलीच पाहिजे. त्याशिवाय त्या शिक्षेला काही अर्थ नाही.
गुन्हेगारांना धाक निर्माण व्हावा या उद्देशानेच युती शासनाच्या काळात एन्काऊंटर चे सत्र सुरु झाले होते. समाजमन बिघडविणार्‍या गुन्हेगारांना, अटक करुन, तुरुंगात खितपत ठेवून काय उपयोग? यामुळे केवळ शासनाचा पर्यायाने जनतेचाच पैसा पाण्यात जातो हे कोणीही मान्य करेल. त्याला चाप बसविण्याचे कार्यच एन्काऊंटरच्या माध्यमातून केले गेले.  या संपूर्ण पार्श्‍वभूमीवर नाना पाटेकर यांचा अब तक छप्पन हा चित्रपट आला होता. त्यामध्ये यामागची मानसिकता नेमकीपणाने स्पष्ट करण्यात आली आहे. आता तरी मंगळुरु येथे काय झाले? सदर आठ तरुणांची जोडप्यास सेक्स करतानाची क्लिप काढण्याची हिंमत्त तरी कशी झाली?  कारण घरात संस्कार नाहीत. आणि आपण कसेही वागलो तरी चालते या समजतुनेच हा प्रकार झाला असे म्हटले तर वावगे होणर नाही. सेक्स आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. नेट चालू केले आणि अश्‍लिल वेबसाईट टाकल्या की झाले. त्याचाच हा परिपाक! देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर तरुणांच्या मनात देश स्वतंत्र करायचा एवढेच ध्येय होते. आता भरकटलेल्या तरुणांच्या मनात बाई, बाटली शिवाय दुसरे काय असते? या तरुणांना वठणीवर आणणे अत्यावश्यक आहे. याकरिताच शिक्षेचा धाक गरजेचा आहे. या प्रकरणातून मंगळूरचे वासनांध सुटले तर त्यांची भिड चेपेल आणि ते पुन्हा नव्या जोडप्याच्या शोधात भटकत राहतील.याकरिता पोलिसांनीच त्यांना जमावाच्या ताब्यात दिले ेपाहिजे. मग जमाव त्यांचा सत्कार करेल की रस्त्यात फोडून काढेल? हे सांगायला ज्योतिषाची गरज आहे काय?

सोमवार, 23 दिसंबर 2013

भारतमातेच्या सेवेला प्राधान्य हवे !

आपण भारतभूमीला ‘माता’ मानतो! अन्य कोणत्याही देशात ही संकल्पना नाही. आज आपल्या भारतमातेची काय अवस्था आहे? भारताच्या सीमेला लागून असलेले सर्व देश भारतमातेचे लचके तोडण्यातच मग्न आहेत. तर दुसरीकडे आपण भारतीयच एकमेकांशी जाती – पंथावरुन भांडत आहोत. शिवाय अन्यही अनेक प्रश्‍न भारतासमोर आ वासून उभे आहेत. त्यामुळे ईश्‍वरभक्तीत बुडालेल्या ईश्‍वराच्या साधकांनी काही वेळ जपाची माळ बाजूला ठेवून देशासमोरील भयानक प्रश्‍न सोडविण्याकरिता पर्यायाने भारतमातेची सेवा करण्याकरिता सर्वस्व वाहून दिले पाहिजे. ती आज काळाची गरज आहे.
जगात भारतमातेला परमवैभवाला नेण्याकरिता जे प्रयत्न करावे लागतील ते सामुहिकरितीने सर्वांना बरोबर घेऊन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सज्जन शक्तींचा दबावगट निर्माण झाला पाहिजे. मायबाप सरकारचा कारभार पाहिला तर निश्‍चितच भारतमातेला दु:ख होत असेल. कारण जे निर्णय सरकार घेते त्यामध्ये मतांची बेगमी किती असते? आणि निस्वार्थ भावनेने केलेली भारतमातेची सेवा किती असते? याचे मुल्यमापन आपण सर्वजण नेहमी करतो. भारतमातेच्या हिताचा विचार करणार्‍या समाजात विविध संघटना आहेत. आणि त्यांचे कोट्यावधी कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांच्यात एकवाक्यता आहे का? हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. भारतापुढील प्रश्‍न सोडविण्याची पध्दत माझीच बरोबर! मी म्हणतो तीच पूर्व दिशा असा टोकाचा विचार करुन त्यानुसार वाटचाल करणार्‍या संघटनाही आपल्या दृष्टीपथात पडतात.हे कोठेतरी थांबले पाहिजे .टीका करण्याऐवजी तीच शक्ती त्यांनी भारतमातेची सेवा करण्यातच खर्ची केली तर ते अधिक संयुक्तिक होईल.
भ्रष्टाचार, दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी, अन्न, वस्त्र, निवारा, घुसखोरी, आतंकवाद, गोहत्या आदि विविध समस्या भारतीयांना पर्यायाचे भारतमातेला भेडसावत आहेत. परंतु याकडे लक्ष दयायला कोणाला वेळ नाही. असे प्रश्‍न उभे ठाकले की अनेकजण हा तर सरकारचा विषय असे म्हणून हात झटकतो आणि मोकळा होतो. परंतु आपण ज्या पात्रतेचे असतो त्याच पात्रतेचे सरकार आपल्याला मिळते हे लक्षात ठेवले पाहिजे. आजकाल जो तो आपापल्या व्यापात गुंतलेला आहे. स्वार्थाच्या परिघाभोवतीच घिरट्या घालणारे अनेकजण आहेत. परंतु असे असले तरीही कित्येक जण त्यांच्या आयुष्यातील काही तास हे निस्वार्थपणे भारतमातेची सेवा करण्याकरिता देतात. हे महत्वाचे! आज समाजात अनेक अध्यात्मिक संघटना आहेत. त्या साधकांना देवभक्तीत करण्यास सांगतात परंतु बहुतांशी संघटना या राष्ट्रकार्यात देखिल धडाडीने सहमागी होताना दिसतात. देशापुढील प्रश्‍नावर कोणतीही भीडभाड न ठेवता बेधडकपणे संघटनांचे प्रमुख त्यांचे मत व्यक्त करतात. त्यांची संघटना म्हणजे राजकीय पक्ष नसल्याने त्यांना मतांची काळजी करावी लागत नाही. देशात सज्जन शक्ती मोठ्या प्रमाणात आहे परंतु ती विभागलेली आहे. त्या शक्तीला एकजूट करणे अत्यावश्यक आहे. सध्या भारतमातेची अवस्था बिकट अशीच आहे. परंतु आपण पराभवाची पूजा करणारे नसून विजयाची पूजा करणारे आहोत हे दुर्लक्षून चालणर नाही. देशहित म्हणजे काय? या गोष्टीवर  आपल्या सर्वांचेच एकमत आहे. परंतु मग आचरण का होत नाही? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडला पाहिजे. अयोग्य गोष्ट करणार नाही आणि खपवून घेणार नाही असा निश्‍चय सर्वांनी केला. आणि प्रामाणिकपणे कोणताही प्रश्‍न हातात घेऊन त्यामागे सामुहिक ताकद लावली तर लवकरात लवकर भारतमातेची सध्या असलेली बिकट अवस्था नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही.

रविवार, 22 दिसंबर 2013

आरोपांचा धुरळा कधी थांबणार?

सध्या कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे पाहिले असता आपल्याला काय दिसते? जो तो दुसर्‍या पक्षातील नेत्यांवर आरोप करण्यातच धन्यता मानत असतो. म्हणजे स्वत: फार काही जनसेवा न करता दुसर्‍यांने काय केले नाही हे सांगण्यातच त्याला आनंद वाटत असतो. राजकीय पक्षांच्या सभा असोत अन्यथा प्रसारमाध्यमांवर होणार्‍या चर्चा असोत. सर्वत्र आपल्याला हेच चित्र पहावायस मिळते. एकमेकांवर नुसते आरोप केल्याने काय साध्य होणार आहे? असाच प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.
भारत स्वतंत्र होऊन 60 वर्षे होऊन गेली. परंतु भारतापुढील समस्यांची जंत्री संपली आहे का? बहुतांशी समस्या जैसे थे च स्वरुपात आहेत. अजून आपण देशवासियांना अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गोष्टीही देऊ शकलेलो नाही. सत्ताधार्‍यांचे जसे हे अपयश आहे. तेवढेच अपयश ते विरोधी पक्षांचे आहे. सरकारवर वचक ठेवण्याचे काम विरोधी पक्षांचे असते. मग निवडून येऊन विरोधी पक्षाचे नेते काय करतात? हा प्रश्‍न जनतेने विचारला तर ते चुकीचे होणार नाही. निवडणुका आल्या की आरोपांची फैरी इतक्या झडतात की वृत्तपत्रात दुसर्‍या बातम्या कमीच दृष्टीपथात येतात. आरोप करण्यात वायफळ शक्ती आणि वेळ खर्च करण्यापेक्षा तोच वेळ जर लोकांची सेवा करण्यात घालविला तर खरेच अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.
संसदेच्या कामकाजात तरी आपल्याला काय दिसते? लहान मुले जशी एकमेकांशी भांडतात त्याच पध्दतीने जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकमेकांशी वाद घालताना आपण पाहतो. वास्तविक त्याचे लाईव्ह टेलिकास्ट होत असतानाही आपण लोकप्रतिनिधींना आपण समजूतदारपणे वागावे याचे भान नसते. हे पाहून हसावे की रडावे तेच समजत नाही. कोणत्याही पक्षाचा निवडणुकीपूर्व जाहिरनामा काढून पहा. प्रत्येक पाच वर्षानी तीच तीच आश्‍वासने दिलेली असतात. म्हणजे थोडक्यात कोणत्याच प्रश्‍नाची तड लावायची नाही. केवळ आश्‍वासने देत लोकांना गंडवायचे हेच बहुतेक उमेदवारांचे धोरण असते. याला कोठेतरी खीळ बसणे गरजेचे आहे.
दुसर्‍यांवर आरोप केले की आपण फार स्वच्छ असा काही राजकीय नेत्यांचा समज असतो. त्यालाच सुरुंग लावण्याचे काम वास्तविक मतदारांनी केले पाहिजे. केवळ घोषणाबाजी करणार्‍या नेत्यांना कायमचे घरी बसवायला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. निवडणूका आल्या की तरुणाई नेत्यांच्या वक्तृत्वाला बळी पडते. आणि दारु आणि मटनाच्या आहारी जाते. परंतु यामुळे सक्षम असे लोकप्रतिनिधी सत्तास्थानी येत नाहीत. याकडे किती जणांचे लक्ष असते? पुढील निवडणूकीत मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्यामुळे मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर जाऊन आरोपप्रेमी नेत्यांना निवडणूकीत सपाटून मार खायला लावला पाहिजे.
विरोधी पक्ष विकासकामे झाली नाहीत याचा ठपका सत्ताधार्‍यांवर ठेवतो. आणि सत्ताधारी नागरिकांना भूलथापा देतात. त्याला नागरिक भुलतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे. भविष्यकाळात केवळ घोषणा करणारे आणि एकमेकांवर आरोप करण्यातच वेळ घालविणारे लोकप्रतिनिधी कायमचे राजकीय पटलावरुन हद्दपार करण्याकरिता नागरिकांनीच विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे.

 

शनिवार, 21 दिसंबर 2013

भागवतपुराण!

मध्यंतरी भारतीय जनता पक्षात आडवाणी विरुध्द मोदी असा सामना पहावयास मिळाला होता. यामधून दोघांच्यात विनाकारण दरी वाढत चालली असल्याचे चित्र दिसले. त्याचाच परिपाक म्हणून आडवाणी  यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन आपली  नाराजी व्यक्त केली. परंतु भाजपाची मातृसंस्था असलेल्या रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी आडवाणींची भेट झाल्यावर सर्व काही निवळले. आणि प्रसारमाध्यमांना नवीन विषय शोधणे भाग पडले. त्याकाळी काही अतिउत्साही तरुणांनी आडवाणींच्या घरासमोर जाऊन निदर्शनेही करीत मोदींचा जयजयकार केला होता. काहीही झाले तरी ज्येष्ठ असलेल्या आडवाणी पक्षातच राहवेत आणि नव्या नेतृत्वाला सल्ला द्यावा अशीच भाजपा कार्यकत्यार्र्ंची इच्छा होती. आणि ती भागवत भेटीने पूर्ण झाली. त्यावेळी भागवत यांनी इतरांबद्दल कोणतीच टिप्पण्णी केली नव्हती. परंतु नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी कोणाचेही नाव न घेता योग्य शब्दात टिका केली आणि आडवाणींचे स्थान पक्षात किती आवश्यक आहे ते अधोरेखीत केले.
दिल्ली येथे आडवाणी यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी पुराणकालातील एक गोष्ट सांगितली. ती पुराणकालातील असली तरी त्याचा संदर्भ आजच्या भाजपा नेते तसेच कार्यकर्त्यांच्या व्यवहाराशीच होता. हे सुज्ञांना लगेच कळले. नाहीतर पुस्तक समारंभाला पुराणकालीन कथा त्यांनी कशाला सांगितली असती? काय होती ती गोष्ट? पाहूया, एका गावात एक महिला असते. त्या महिलेचे वास्तव्य गावात असल्याने त्या गावाची भरभराट होते. एकेकाळी तीला मानाचे स्थान असते. परंतु कालांतराने त्या महिलेलीच निंदानालस्ती गावातील लोक करु लागतात. त्यामुळे ती महिला वैतागते आणि गाव सोडून जायचे निश्‍चित करते. आणि त्यानुसार कार्यवाही देखिल करते. महिलेने गावाची वेस ओलांडताच काही दिवसातच गावाची पूर्ण रयाच जाते. आपापसात भांडणे सुरु होतात, दंगली भडकतात आणि काही महिन्यातच गाव बेचिराख होतो. अशी ती कथा. आता त्या महिलेच्या जागी आडवाणी आणि गावाच्या ठिकाणी पक्ष हा शब्द घालून कथा वाचा बरं! त्यातून काय सूचित होते?
आडवाणींनी मोदीविरोध एवढा करायला नको होता असेच अनेकांचे मत आहे. ज्यावेळी पक्षप्रचार प्रमुख म्हणून नाव घोषित केले त्यावेळी आडवाणी आणि त्याचे खास सहकारी मुद्दामहून गोवा येथे गेले नाहीत ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. परंतु काहीही असले तरी आडवाणी यांनी पक्ष वाढविण्यासाठी अतिशय कष्ट उपसले आहेत हे देखिल भाजपा कार्यकर्ते विसरु शकत नाहीत. जीवनप्रवासात त्यांनी घेतलेले निर्णय सर्वांनाच आवडतील असे नाही. परंतु त्यांचे जीवन पारदर्शकपणे सर्वाच्या समोर आहे.भविष्यकाळात कोणीही आडवाणींना कोणीही कमी लेखू नये आणि जर आडवाणींनी पक्षाला राम राम केला तर पक्षाची अवस्था लवकरच त्या गावासारखी होईल असा सूचक इशारा तर भागवत यांनी पुराणाचा दाखला देऊन दिला नाही ना? असाच प्रश्‍न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.