रविवार, 22 दिसंबर 2013

आरोपांचा धुरळा कधी थांबणार?

सध्या कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे पाहिले असता आपल्याला काय दिसते? जो तो दुसर्‍या पक्षातील नेत्यांवर आरोप करण्यातच धन्यता मानत असतो. म्हणजे स्वत: फार काही जनसेवा न करता दुसर्‍यांने काय केले नाही हे सांगण्यातच त्याला आनंद वाटत असतो. राजकीय पक्षांच्या सभा असोत अन्यथा प्रसारमाध्यमांवर होणार्‍या चर्चा असोत. सर्वत्र आपल्याला हेच चित्र पहावायस मिळते. एकमेकांवर नुसते आरोप केल्याने काय साध्य होणार आहे? असाच प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.
भारत स्वतंत्र होऊन 60 वर्षे होऊन गेली. परंतु भारतापुढील समस्यांची जंत्री संपली आहे का? बहुतांशी समस्या जैसे थे च स्वरुपात आहेत. अजून आपण देशवासियांना अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गोष्टीही देऊ शकलेलो नाही. सत्ताधार्‍यांचे जसे हे अपयश आहे. तेवढेच अपयश ते विरोधी पक्षांचे आहे. सरकारवर वचक ठेवण्याचे काम विरोधी पक्षांचे असते. मग निवडून येऊन विरोधी पक्षाचे नेते काय करतात? हा प्रश्‍न जनतेने विचारला तर ते चुकीचे होणार नाही. निवडणुका आल्या की आरोपांची फैरी इतक्या झडतात की वृत्तपत्रात दुसर्‍या बातम्या कमीच दृष्टीपथात येतात. आरोप करण्यात वायफळ शक्ती आणि वेळ खर्च करण्यापेक्षा तोच वेळ जर लोकांची सेवा करण्यात घालविला तर खरेच अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.
संसदेच्या कामकाजात तरी आपल्याला काय दिसते? लहान मुले जशी एकमेकांशी भांडतात त्याच पध्दतीने जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकमेकांशी वाद घालताना आपण पाहतो. वास्तविक त्याचे लाईव्ह टेलिकास्ट होत असतानाही आपण लोकप्रतिनिधींना आपण समजूतदारपणे वागावे याचे भान नसते. हे पाहून हसावे की रडावे तेच समजत नाही. कोणत्याही पक्षाचा निवडणुकीपूर्व जाहिरनामा काढून पहा. प्रत्येक पाच वर्षानी तीच तीच आश्‍वासने दिलेली असतात. म्हणजे थोडक्यात कोणत्याच प्रश्‍नाची तड लावायची नाही. केवळ आश्‍वासने देत लोकांना गंडवायचे हेच बहुतेक उमेदवारांचे धोरण असते. याला कोठेतरी खीळ बसणे गरजेचे आहे.
दुसर्‍यांवर आरोप केले की आपण फार स्वच्छ असा काही राजकीय नेत्यांचा समज असतो. त्यालाच सुरुंग लावण्याचे काम वास्तविक मतदारांनी केले पाहिजे. केवळ घोषणाबाजी करणार्‍या नेत्यांना कायमचे घरी बसवायला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. निवडणूका आल्या की तरुणाई नेत्यांच्या वक्तृत्वाला बळी पडते. आणि दारु आणि मटनाच्या आहारी जाते. परंतु यामुळे सक्षम असे लोकप्रतिनिधी सत्तास्थानी येत नाहीत. याकडे किती जणांचे लक्ष असते? पुढील निवडणूकीत मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्यामुळे मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर जाऊन आरोपप्रेमी नेत्यांना निवडणूकीत सपाटून मार खायला लावला पाहिजे.
विरोधी पक्ष विकासकामे झाली नाहीत याचा ठपका सत्ताधार्‍यांवर ठेवतो. आणि सत्ताधारी नागरिकांना भूलथापा देतात. त्याला नागरिक भुलतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे. भविष्यकाळात केवळ घोषणा करणारे आणि एकमेकांवर आरोप करण्यातच वेळ घालविणारे लोकप्रतिनिधी कायमचे राजकीय पटलावरुन हद्दपार करण्याकरिता नागरिकांनीच विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें