सोमवार, 23 दिसंबर 2013

भारतमातेच्या सेवेला प्राधान्य हवे !

आपण भारतभूमीला ‘माता’ मानतो! अन्य कोणत्याही देशात ही संकल्पना नाही. आज आपल्या भारतमातेची काय अवस्था आहे? भारताच्या सीमेला लागून असलेले सर्व देश भारतमातेचे लचके तोडण्यातच मग्न आहेत. तर दुसरीकडे आपण भारतीयच एकमेकांशी जाती – पंथावरुन भांडत आहोत. शिवाय अन्यही अनेक प्रश्‍न भारतासमोर आ वासून उभे आहेत. त्यामुळे ईश्‍वरभक्तीत बुडालेल्या ईश्‍वराच्या साधकांनी काही वेळ जपाची माळ बाजूला ठेवून देशासमोरील भयानक प्रश्‍न सोडविण्याकरिता पर्यायाने भारतमातेची सेवा करण्याकरिता सर्वस्व वाहून दिले पाहिजे. ती आज काळाची गरज आहे.
जगात भारतमातेला परमवैभवाला नेण्याकरिता जे प्रयत्न करावे लागतील ते सामुहिकरितीने सर्वांना बरोबर घेऊन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सज्जन शक्तींचा दबावगट निर्माण झाला पाहिजे. मायबाप सरकारचा कारभार पाहिला तर निश्‍चितच भारतमातेला दु:ख होत असेल. कारण जे निर्णय सरकार घेते त्यामध्ये मतांची बेगमी किती असते? आणि निस्वार्थ भावनेने केलेली भारतमातेची सेवा किती असते? याचे मुल्यमापन आपण सर्वजण नेहमी करतो. भारतमातेच्या हिताचा विचार करणार्‍या समाजात विविध संघटना आहेत. आणि त्यांचे कोट्यावधी कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांच्यात एकवाक्यता आहे का? हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. भारतापुढील प्रश्‍न सोडविण्याची पध्दत माझीच बरोबर! मी म्हणतो तीच पूर्व दिशा असा टोकाचा विचार करुन त्यानुसार वाटचाल करणार्‍या संघटनाही आपल्या दृष्टीपथात पडतात.हे कोठेतरी थांबले पाहिजे .टीका करण्याऐवजी तीच शक्ती त्यांनी भारतमातेची सेवा करण्यातच खर्ची केली तर ते अधिक संयुक्तिक होईल.
भ्रष्टाचार, दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी, अन्न, वस्त्र, निवारा, घुसखोरी, आतंकवाद, गोहत्या आदि विविध समस्या भारतीयांना पर्यायाचे भारतमातेला भेडसावत आहेत. परंतु याकडे लक्ष दयायला कोणाला वेळ नाही. असे प्रश्‍न उभे ठाकले की अनेकजण हा तर सरकारचा विषय असे म्हणून हात झटकतो आणि मोकळा होतो. परंतु आपण ज्या पात्रतेचे असतो त्याच पात्रतेचे सरकार आपल्याला मिळते हे लक्षात ठेवले पाहिजे. आजकाल जो तो आपापल्या व्यापात गुंतलेला आहे. स्वार्थाच्या परिघाभोवतीच घिरट्या घालणारे अनेकजण आहेत. परंतु असे असले तरीही कित्येक जण त्यांच्या आयुष्यातील काही तास हे निस्वार्थपणे भारतमातेची सेवा करण्याकरिता देतात. हे महत्वाचे! आज समाजात अनेक अध्यात्मिक संघटना आहेत. त्या साधकांना देवभक्तीत करण्यास सांगतात परंतु बहुतांशी संघटना या राष्ट्रकार्यात देखिल धडाडीने सहमागी होताना दिसतात. देशापुढील प्रश्‍नावर कोणतीही भीडभाड न ठेवता बेधडकपणे संघटनांचे प्रमुख त्यांचे मत व्यक्त करतात. त्यांची संघटना म्हणजे राजकीय पक्ष नसल्याने त्यांना मतांची काळजी करावी लागत नाही. देशात सज्जन शक्ती मोठ्या प्रमाणात आहे परंतु ती विभागलेली आहे. त्या शक्तीला एकजूट करणे अत्यावश्यक आहे. सध्या भारतमातेची अवस्था बिकट अशीच आहे. परंतु आपण पराभवाची पूजा करणारे नसून विजयाची पूजा करणारे आहोत हे दुर्लक्षून चालणर नाही. देशहित म्हणजे काय? या गोष्टीवर  आपल्या सर्वांचेच एकमत आहे. परंतु मग आचरण का होत नाही? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडला पाहिजे. अयोग्य गोष्ट करणार नाही आणि खपवून घेणार नाही असा निश्‍चय सर्वांनी केला. आणि प्रामाणिकपणे कोणताही प्रश्‍न हातात घेऊन त्यामागे सामुहिक ताकद लावली तर लवकरात लवकर भारतमातेची सध्या असलेली बिकट अवस्था नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें