बुधवार, 9 अप्रैल 2014

केजरीवाल्यांच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आम आदमीच!

49 दिवसांचे दिल्लीतील मुख्यमंत्रीपद भुषविणार्‍या अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीतील एका रोड शोमध्ये एका सामान्य रिक्षावाल्याने सणसणीत कानाखाली लगावली. आणि प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने त्याचा आवाज संपूर्ण देशात ऐकायला गेला. यानंतर केजरीवालयांच्या शांततामय समर्थकांनी कानाखाली लगावणार्‍या रिक्षावाल्याची धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नेहमीप्रमाणे केजरीवाल यांनी आपल्या समर्थकांना शांततेचा उपदेश केला. हे असे तिसर्‍यांदा झाले आहे. म्हणजेच यापूर्वी केजरीवालांवर तिनदा हल्लयाचा प्रयत्न झाला आणि तो आम आदमीनेच केला होता. आता केजरीवाल यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत महत्वाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे, तो म्हणजे माझ्यावर हल्ला करणार्‍यांच्या मागील मास्टरमाईंड कोण? परंतु याचे साधे सरळ उत्तर जनतेच्या मनात आहे ते म्हणजे आम आदमी!
केजरीवाल यांचे वागणे कसे दुतोंडी आहे यावर वारंवार शिक्कामोर्तब झाले आहे. केजरीवाल वास्तविक पूर्णपणे नास्तिक आहेत. परंतु ज्यावेळी ते वाराणसीला गेले त्यावेळी त्यांनी गंगेत एकदा नव्हे तर अनेकदा डुबकी मारली. कारण फोटोग्राफरना चांगली पोजच मिळत नव्हती. त्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन माथा टेकला. काय हे सर्व करायची गरज होती. तुम्ही नास्तिक आहात तर निडरपणे जनतेसमोर जा ना! की, मी नास्तिक आहे त्यामुळे मी गंगेत डुबकी मारणार नाही आणि शिवमंदिरात जाणार नाही. परंतु प्रत्येक ठिकाणीच वागणे दुहेरी असल्याने केजरीवाल त्यांच्या परंपरेला जागले. यात चुकीचे काहीच नाही. आज दिल्लीतील रॅलीत एका रिक्षावाल्याने केजरीवालांना प्रथम पाच ते दहा रुपयांचा हार घातला आणि मग त्यांच्या सणसणीत कानाखाली लगावली. ही थप्पड एवढी जोरात होती की, केजरीवाल यांचा गाल सुजला. यानंतर त्यांनी रॅली अर्धवट सोडून तत्काळ म. गांधीजींच्या राजघाटावर धाव घेतली आणि आण्णा स्टाईल धरणे आंदोलन केले. ही नौटंकी आता जनतेला माहित झाली आहे.
इथे एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. मध्यंतरी बिहार येथे  भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा सुरु होण्याअगोदर सभाठिकाण बॉम्बस्फोटाने दणाणून गेले होते. असे असले तरीही कोणाही न घाबरता मोदी यांनी जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले. आणि जनतेने देखिल बॉम्बच्या भितीने सभास्थानापासून काढता पाय न काढता संपूर्ण सभा शांततेत ऐकली. दुसरीकडे दिल्लीत केजरीवाल यांच्याच आम आदमीने त्यांच्या कानाखाली लगावल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचार रॅली अर्धवट सोडून तेथून पळ काढला. याला काय म्हणायचे? असाच प्रश्‍न सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
आम्ही अहिंसेवर विश्‍वास ठेवतो असा केजरीवाल यांचा दावा आहे. मग असे असेल तर म. गांधीच्या तत्वज्ञानानुसार एका गालावर थप्पड मारल्यावर केजरीवाल यांनी दुसरा गाल पुढे करायला पाहिजे होता. मात्र घडले उलटेच कानफटात लगावणार्‍या त्या रिक्षावाल्यालाच केजरीवाल समर्थकांनी बेदम चोपले. खरं तरं केजरीवाल यांनी हिंसा करणार्‍या त्यांच्या समर्थकांना पक्षातून तत्काळ निलंबित करायला पाहिजे होते. परंतु नेहमी दुतोंडीपणाचा वारसा जपणार्‍या केजरीवालांकडून ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?
या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? हा प्रश्‍न विचारुन केजरीवाल आता राजकीय सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेच दिसते. विरोधी पक्ष या थराला जातील असे वाटत नाही. त्यामुळे दुसर्‍यावर आरोप करण्यापेक्षा केजरीवाल यांनी त्यांच्या वर्तवणुकीचाच आढावा घेणे गरजेेचे आहे. याचेही राजकारण केल्यास केजरीवाल यांचा आप पक्षालाच तोटा होईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनताच आप पक्षाला सणसणीत उत्तर देईल असेच चित्र आहे.

मंगलवार, 8 अप्रैल 2014

भारतमातेसाठी मतदान करा !

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविण्याचा निर्धार आवश्यक आहे. मतदान शंभर टक्के झाले म्हणजे यशस्वी झाली असे नाही. मतदान का करायचे, कोणत्या गोष्टींचा विचार करुन करायचे. याचाही थोडा विचार करा. महागाईचा फटका बसलेला नाही अशी सर्वसामान्य व्यक्ती या देशात शोधून काढावी लागेल. शेतकर्‍यांनी गेली काही वर्षे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले आहे. मग ही महागाई कशामुळे? याचं उत्तर आहे. बेबंद भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. हजारो कोटींच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे डोळेझाक करणे आपल्याला यापुढे परवडणार आहे का, याचा मनाशी गांभीर्याने विचार करा. नाहीतर महागाईचा हा वणवा तुम्हा आम्हाला पुरता फस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि देशाला पूर्ण गिळंकृत केल्याशिवायही राहणार नाही. हे आपण उघड्या डोळ्यांनी स्वस्थपणे पाहत राहणार का?
रोजगाराच्या संधी आटल्या आहेत. उद्योगक्षेत्रातील गुंतवणुक मंदावली आहे. परकीय भांडवलाचा ओघ थांबला आहे. सेवाक्षेत्राची घोडदौड पूर्ण थांबली आहे. उत्पादनक्षेत्र नामषेश होईल. असे भयावह चित्र आहे. नव्याने उद्योग सुरु होण्यासाठी अनुकुलता नाही आणि नव उद्योजकांचे मनोधैर्य पूर्ण खचलेले आहे. विजेच्या टंचाईमुळे ना शेतकर्‍याला त्याची कामगिरी बजावता येतेय, ना उद्योगांना झेप घेता येतेय. आर्थिक पातळीवरील ही दाणादाण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात लोटणार का?
भारताच्या सीमा तर सुरक्षित नाहीतच, पण अंतर्गत सुरक्षेसाठी खिंडार पडलेले आहे. इंडियन मुजाहिदीनसारख्या शक्तींनी संपूर्ण देशात जाळे पसरले आहे आणि देशातील 275 जिल्ह्यात माओवाद्यांच्या आव्हानाने गंभीररुप धारण केलेले आहे. बुध्दीवंत म्हणविणारे लोक या शक्तींचे खुलेआम समर्थन करण्यात सोकावलेले आहेत.या देशाला अस्थिर करण्यात रस असणार्‍या परकीय शक्ती पूर्ण ताकदीनिशी तुटून पडलेल्या आहेत. कमकुवत सरकार, दुबळे नेतृत्व या देशात स्थैर्य निर्माण करु शकणार नाहीत. आहे हे ठिक आहे. असे तुम्हाला वाटते का?
धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा मतपेटीच्या राजकारणासाठी वापरला जात आहे. देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला समान न्याय, समान संधी उपलब्ध करुन देण्याचे तत्व पायदळी तुडविले जात आहे. अल्पसंख्यक समाजाला देशाच्या विकासप्रक्रियेत मनापासून सहभागी करुन घेण्याऐवजी त्यांच्या मनात भयगंड उत्पन्न करण्याची राजनीती वापरली जात आहे. भाषा आणि जात या मुद्दयावरही तेढ निर्माण करण्यासाठी सत्तास्थानी असणारे खतपाणी घालत आहेत. एक देश, एक घटना, समान संधी, समान न्याय असा विचार करणार्‍या शक्ती बळकट झाल्या, तरच देश एकसंघपणे उभा राहिल. भाषा आणि जात, तथाकथिक प्रादेशिक अस्मिता असा संकुचित विचार करुन केलेले मतदान देशाच्या प्रगतीला बाधा आणणार नाही ना? त्याचप्रमाणे व्यवस्था परिवर्तनाच्या नावाखाली अराजकता निर्माण करणार्‍या शक्तींचा धोका ओळखून मतदान केले पाहिजे.
देशातील अडीच कोटी युवा मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पिढीला विकासात रस आहे. तिची लोकशाहीवरची श्रध्दा कायम ठेवायची असेल, या पिढीचे भवितव्य उज्वल करायचे असेल. तर अर्थव्यवस्थेला गती देणारे, विकासाची कास धरणारे, भ्रष्टाचाराला थारा न देणारे, सक्षम सरकार आवश्यक आहे. असे सरकार लाभणे आपण मतदानाचा हक्क कसा बजावतो. यावर अवलंबून आहे. देशासाठी आश्‍वासक वातावरण निर्माण करण्यासाठीच आपले मतदान होते आहे ना, याचाही विचार करणे गरजे

 

गुरुवार, 3 अप्रैल 2014

निस्वार्थी वृत्ती हवी आहे!

सध्याचे जग हे स्वार्थी झाले आहे. आपला काही फायदा असेल तरच काम करायचे हाच अनेकांचा जीवन जगण्याचा मंत्र आहे. त्यामुळे आजकाल निस्वार्थी वृत्तीने काम करणार्‍या व्यक्ती फारच कमी पाहायला मिळतात. प्रामुख्याने आपल्या समोर राजकारणाचेच चित्र असल्यामुळे कदाचित आपल्याला सर्वत्र स्वार्थी वृत्तीने पछाडलेलेच लोक दिसतात. आणि ही वस्तुस्थिती नाकारुन काहीही उपयोग नाही. परंतु असे असले तरी विविध क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने सेवा करणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्याकडे आपले लक्ष जात नाही. किंवा गेले तरी त्याला वेडा ठरविण्याकडेच आपला कल असतो. वास्तविक देशाला पुन्हा वैभव शिखराला न्यायचे असेल तर आज अशाच निस्वार्थी लोकांची अत्यंत आवश्यकता आहे.
माणसाच्या डोक्यात एकदा स्वार्थी वृत्तीची नशा चढली की त्याला दुसरे तिसरे काही दिसत नाही असे म्हणतात. अर्थात याचा अनुभव आपण घेतच असतो. निरपेक्षपणे कोणते काम करायचे असते ही कल्पनात अनेकांना करवत नाही. सतत मी आणि माझा फायदा या दोन मुद्दयांभोवतीच अनेकजण घोटाळताना आपण पाहतो. साहजिकच ज्यावेळी समाजरुपी स्वार्थी वाळवंटात ज्यावेळी आपल्याला ओअ‍ॅसिसच्या रुपात निस्वार्थीपणे कार्य करणार्‍या व्यक्ती दिसतात तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटल्यावाचून राहत नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अनेक संघटना विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यापैकी कित्येकजण कोणताही मोबदला घेत नाहीत. तर ते आपले कर्तव्यच आहे याच भावनेतून ते सतत कार्यशील असतात.
कोणतीही गोष्ट निरपेक्ष वृत्तीने केली तर मिळणारे आत्मिक समाधान हे अपूर्व असेच असते. याची कल्पना आर्थिक लाभ लक्षात घेऊन सतत काम करणार्‍यांना कधीच येणार नाही. आपण समाजाचाच एक भाग आहोत ही कल्पनाच हळूहळू पुसट होऊ लागली आहे. आपण सुखी झालो की जीवीतकार्य संपले अशीच मनोधारणा अनेकांची तयार होऊ लागली आहे. त्यामध्ये बदल घडविणे गरजेचे आहे. आपण  सुखी झालेच पाहिजे यात शंका नाही परंतु त्याचबरोबरीने समाज देखील कसा उन्नत होईल यादृष्टीनेही आपण सर्वांनी प्रयत्न करायला नकोत का? उदा. आजकाल वैद्यकीय उपचार घेणे म्हणजे खिशाला चाट असेच समीकरण बनले आहे. साहजिकच गरीब काय मध्यमवर्गींयांनाही रुग्णालय आणि डॉक्टर म्हटले की अंगावर काटा येतो. मग समाजात ज्यांचा वैद्यकीय व्यवयास जोरात चालला आहे त्या डॉक्टरांनी निदान महिन्यातून एक दिवस खेडोपाडी जाऊन रुग्ण तपासणी मोफत करुन त्यांच्यावर अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया अथवा उपचार करण्यास काय अडचण आहे? परंतु हे होताना दिसत नाही. कितीही पैसा कमावला तरी पैशाची काही हाव संपत नाही. त्यामुळे समाजसेवा हा शब्दच कित्येकांच्या डिक्शनरीत आढळत नाही.
असे चित्र असले तरीही आज बर्‍याच प्रमाणात सामाजिक कार्यामध्ये भाग घेणार्‍यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे चित्र नक्कीच आशादायक आहे. भविष्यात आपल्यापैकी प्रत्येकानेच दिवसातला निदान एक तास समाजासाठी दिला तरी खूप सामाजिक कार्य होईल यात तिळमात्र शंका नाही.

 

शुक्रवार, 28 मार्च 2014

यांना लाज कशी वाटत नाही?

भारत देश म्हणजे धर्मशाळा झाला आहे असे म्हटले जाते. ते सत्य असल्याचे वारंवार प्रत्ययास येत असते. देशात प्रचंड संख्येने बांगलादेशी नागरिक घुसले आहेत. हे वास्तव आता शासनाने स्विकारले आहे. परंतु एकगठ्ठा मतांच्या लालसेपोटी सत्ताधारी या बांगलादेशी नागरिकांच्या अंगाला हात लावू इच्छित नाही. केवळ लांबून इशारे द्यायचे आणि प्रत्यक्षात काहीही करायचे नाही हा मुर्खपणा खुलेआम सुरु असतो. आणि बहुसंख्य जनता देखिल त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानते. आज या बांगलादेशी मतांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात देशाची आणखी एक फाळणी झाली तर नवल वाटायचे कारण नाही.
आता तर केंद्रिय गृहमंत्रालयातील विदेशी विभागातील अवर सचिव विकास श्रीवास्तव यांनी तर कमालच केली आहे. त्यांनी हायकोर्टात चक्क शपथपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, बांगलादेशी नागरिकांची देशात मोठ्या प्रमाणात घुसखोर होत आहे. आर्थिक, राजकीय व इतर कारणांनी स्थलांतरित झालेल्या बांगलादेशींना हुडकून काढणे अत्यंत कठीण आहे. त्याचप्रमाणे देशात किती बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्य करीत आहेत याची नेमकी माहिती देता येणार नाही.
आता याला काय म्हणावे? मायबाप शासनच जर उघडपणे बांगलादेशी नागरिकांची बाजू घेणार असेल तर त्या सरकारला काय अर्थ आहे? आपल्या घरात रस्त्यावरील कोणीही राहण्यास आला तर ते आपण सहन करतो का? नाही ना! मग देशात लाखो बांगलादेशी निर्धास्तपणे वास्तव्य करीत आहेत आणि शासन म्हणते त्यांना हुडकून काढणे आम्हाला शक्य नाही. मग तुम्हाला काय शक्य आहे ते तरी सांगा असाच सामान्यांचा सवाल आहे. आज देशातील 50 हून अधिक मतदारसंघ असे आहेत की जेथे अल्पसंख्यक मतांच्या जोरावर जनसेवक निवडून येतात. त्यामध्ये बांगलादेशी नसतील असे आपण म्हणू खात्रीने सांगू शकतो का? मतांच्या लाचारीसाठीच सरकार बांगलादेशी घुसखोरांना लाथ मारुन बाहेर काढण्यास कचरत आहे. जर त्यांना आपण हाकलले तर आपल्याला मुस्लिमांची मते पडतील का? हाच प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. परंतु येथील राष्ट्रवादी मुस्लिमांचा कधीच बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा नव्हता आणि नसेल.
आता या बांगलादेशी घुसखोरांना सरकारने गालीचे अंथरले आहेतच. त्याचाच परिपाक म्हणजे देशात दहशवादी कारवाया वाढत चालल्या आहेत. मागील काही दिवसात सरकारने इंडियन मुजाहिदीन या आंतकवादी संघटनेच्या खतरनाक अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यांना स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय हे शक्य आहे का? घुसखोरांना आश्रय दिल्यावर दुसरे काय होणार? घुसखोरांना हुडकून काढणे अशक्य असल्याचे सांगणार्‍या सरकारला काहीही वाटत नसले तरी सरकारच्या विचारसरणीची सामान्यांना आज लाज वाटत आहे.

 

सोमवार, 24 मार्च 2014

आयुष्याचे जीवनगाणे

प्रत्येकाचा मनुष्यस्वभाव हा निराळा असतो. एखाद्याला एका गोष्टीत आनंद दिसला तर दुसर्‍याला तसे दिसेलच याची काही शाश्‍वती नाही. हे म्हणणे पटावे यासाठी नेहमी एक उदाहरण दिले जाते. दोन माणसांच्या समोर एक पेला ठेवला त्यामध्ये थोडे पाणी भरले आणि त्यांना विचारले की पेल्याचे वर्णन करा. तर त्यातील एकजण म्हणेल की, हा पेला अर्धा रिकामा आहे. तर दुसरा म्हणेल की, हा पेला अर्धा भरलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जीवनाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो हे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दु:खाचे डोंगर असतात त्याचप्रमाणे सुखाच्या काही टेकड्याही असतात. परंतु आयुष्याच्या वाटेला दु:ख आले म्हणून रडत बसायचे? की त्याचा धीराने सामना करायचा? हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.
आजकालची पिढी ही सुखवस्तु आहे. म्हणजे लहानपणापासूनच पालक मुलांचे वाट्टेल ते हट्ट पुरवितात.साहजिकच मुलांच्यात नकार पचवायची ताकदच नसते. साहजिकच कोणतीही मनाविरुध्द गोष्ट झाली की चिमुकल्यांपासून महाविद्यालयीन युवक – युवतींपर्यत अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर आपल्याला आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. सतत होकाराची सवय लागली असल्याने अनेकांना नकार म्हणजे जीवनातील सर्वात मोठे संकट वाटते. आणि ते आपले जीवन संपवितात. परंतु आपल्या मागे आई – वडिलांची मनस्थिती काय होईल याचा कोणीही विचार करताना दिसत नाही.
जीवन हे अनमोल असते. परंतु जीवनाचे मूल्य फार कमी जणांना कळते. इतर प्राणी आणि मनुष्य यामध्ये महत्वाचा फरक असतो. तो म्हणजे इतरांना विचारशक्ती नसते. मनुष्याला असते. अर्थात या विचारशक्तीचा वापर कसा करायचा? हे मात्र ज्याचे त्याने ठरवायचे असते. दुर्देवाने आज तेच होताना दिसत नाही. जो तो आपल्याची विचारविश्‍वात रममाण झालेला आपल्याला पाहायवास मिळतो. मी आणि माझे एवढेच अनेकांची विश्‍व बनते. आपण सुखी झालेच पाहिजे परंतु त्याचबरोबरीने समाज देखिल अधिकाधिक कसा सुखी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण आज आहे उद्या असू की नसू हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला मिळालेल्या जीवन देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी कसे सार्थकी लागेल हेच पहावे लागेल. कित्येकजण जीवनाला दोष देण्यातच धन्यता मानतात. अशा महाभागांनी जरा आठवड्यातून एकदा स्मशानात जाऊन यावे म्हणजे त्यांना जीवनाचे महत्व पटेल. आपल्या जीवनाचा उपयोग इतरांसाठी  कसा होईल हे प्रत्येकाने पाहिेले तर अनोखे जीवनगाण्याचे स्वर आसमंतात घुमतील आणि ते निश्‍चित मधुर असतील हे नक्की!

बुधवार, 19 मार्च 2014

इंटरनेटव्दारे फसवणूक चिंताजनक !

आजकाल विविध ‘ डे ‘चा जमाना आहे. पण केवळ ‘ डे ‘ साजरे करण्यापेक्षा त्यामागील विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हेच घ्या ना! दि. १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला . ग्राहक खरेच जागरुक असतात का? हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. प्रामुख्याने इंटरनेटव्दारे होणार्‍या फसवणूकीचा विषय चिंताजनक आहे. त्यासंबंधात विचारमंथन करणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यात वर्तमानपत्रात ऑनलाईन शॉपिंग व्दारे झालेल्या फसवणूकीची बातमी वाचली. संबंधित व्यक्तीने ऑनलाईन वेब साईटव्दारे काही वस्तु मागवल्या व त्या हाती पडल्यावर पार्सल मधून फक्त कागदाची रद्दी निघाली. त्याचे काही हजार रूपये पाण्यात गेले. या व अशा प्रकारच्या ऑनलाईन खरेदीतून फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण मधून अधून ऐकतो, वाचतो व सोडून देतो. पण ह्या गोष्टी इतक्या सहजपणे घेण्यासारख्या नाहीत.
इंटरनेट व त्याचा वापर याचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरनेटला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच ई-बँकिंग व ई-शॉपिंग मुळे तर हे प्रमाण वाढले आहे. आजच्या धकाधकीच्या काळात ऑनलाईन व्यवहारांमुळे अनेक सोई झाल्या आहेत. पण त्याचप्रमाणे याची दुसरी बाजूपण तितकीच गंभीर आहे. इंटरनेटवरून फसवणूक करणारे पण तितकेच वाढले आहेत. मुळ वेबसाईटची नक्कल करून खोट्या जाहीरातीच्या माध्यमातून काही महाभाग सर्वसामान्य नागरिकांना * आर्थिक * चुना लावतात. आपण नेहमी जी संकेतस्थळे पाहतो त्यावर अनेक आकर्षक योजनांच्या जाहीराती असतात. बर्‍याच प्रमाणात सुट व बरोबर अनेक इतर वस्तु फुकट देण्याचे अमीष यात दाखवले जाते. तसेच अनेक टि.व्ही. वाहिन्यांनवर पण सतत ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहीत करणार्‍या जाहीराती व कार्यक्रम दाखविले जातात. यात अगदी पायाच्या नखा पासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांसाठी उपयोगी पडणारी उत्पादने दाखविली व विकली जातात. अर्थात सर्वच संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणूक होते असे नाही परंतु फसवणूकीच्या प्रमाण आहे हे कोणीच नाकारु शकत नाही.  ह्या फसवणुक करणार्‍यांना माणसाच्या स्वभावाची चांगली माहिती असते की माणूस प्रलोभनांना बळी पडतो. याचाच फायदा घेऊन ते गंडा घालतात. यात आपल्या बँक खात्यावर डल्ला घातला जाऊ शकतो. कारण या व्यवहारात जर क्रेडीत कार्ड/डेबीट कार्ड वापरले तर त्यावरून आपली सर्व माहिती घेऊन आपले बँक खाते रिकामे केले जावू शकते.
अशा प्रकारच्या फसवणूकीत ऑनलाईन लॉटरी, फसव्या ई-मेल व्दारे तुमची माहिती जमा करून ती तुमचे खाते व पैसे लाटण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तुमचा पैसा वापरून कुठूनही खरेदी केली जाते व बिल तुमच्या नावे येते.  या व अशा प्रकारच्या फसवणूकी पासून आपल्याला जर वाचायचे असेल तर आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा पैशाचा व्यवहार करताना योग्या ती काळजी घ्यावी. आपल्या पैशाच्या व्यवहाराची माहिती कधीही ई-मेल व्दारे पाठवू नये. ज्या संगणकावरून आपण अशी खरेदी करत आहोत तो संगणक व ते ठिकाण खात्रीचे असावे. आपल्याला ज्या संकेत स्थळाची योग्य व खात्रीची माहिती आहे तेथूनच खरेदी करावी. कंपनीचा पत्ता नीट पहावा, फोन नंबर पहावा. जर नुसताच ई-मेल आपल्याला आला असेल तर अशा ठिकाणाहून खरेदी करू नये. संकेतस्थळाचे सुरक्षितता प्रमाणपत्र तपासावे. त्याची माहिती थोड्या वाचनाने मिळू शकते. कोणत्याही संकेतस्थळाच्या पत्त्यामध्ये नुसते http//: असेल तर त्यावर आपली माहिती सुरक्षित राहिलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे  https//: असे जर असेल तर या  ‘S’ अक्षराने तुमची माहिती सुरक्षित राहू शकेल याची  शक्यता वाढते. तसेच प्रत्येकाने आपला पासवर्ड थोड्या दिवसांनी बदलत रहावा, आपल्या व्यवहारांची नोंद ठेवावी, के्रडिट कार्ड नंबर, पासवर्ड कोणालाही सांगू नये. या व अशा काही गोष्टी एक नागरिक म्हणून आपण करू शकतो.
यात देशातील सरकार व न्यायव्यवस्थेनेपण महत्वपूर्ण कार्य करणे अपेक्षित आहे. भारतासारख्या देशात ऑनलाईन शॉपिंग हे जवळजवळ 2000 शहरे व गावांमध्ये पोहोचले आहे. यात बरेच जण ‘ कॅश ऑन डिलीव्हरी ‘  हा पर्याय न वापरता ई-पेमेंट करतात व अशा प्रकारे फसवणूकीला आयते आमंत्रण देतात. या फसवणूकीवर आपल्या देशात पुरेसे कायदे नाहीत. सर्वसामान्य माणूस याबाबत अजून अज्ञानी आहे. आपल्यासारख्या आय.टी. महासत्ता म्हणवणार्‍या देशात सायबर गुन्ह्यांविरूध्द कडक कायदेच नाहीत. त्यामुळे आरोपींवर वचक बसत नाही. ही बाब खेदाची आहे. दरवर्षी ग्राहक दिनाला जनजागृती फेर्‍या, पोस्टर, चर्चा केल्या जातात पण याविषयावर कितपत गांर्भियाने विचार होतो हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे जगभरात अशा प्रकारचे कायदे होत आहेत व अस्तीत्वातपण आहेत त्यामुळे आपल्या देशाने पण याचे महत्व ओळखून योग्य पावले उचलावीत आणि महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी देखील जागरुक होणे आवश्यक आहे.

शनिवार, 15 मार्च 2014

केजरीवालजी, मिडीयावर का घसरता?

दिवसेंदिवस आपचे नेते वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत सापडत चालले आहेत. काल दिल्लीचे 49 दिवसांचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व मिडीया नमो नमो चा जप करीत असून आपण सत्तेवर आल्यास मिडीयावाल्यांना जेलमध्ये घालू अशी धमकीवजा इशारा दिला आहे. मिडीया नेहमी वस्तुस्थिती दर्शविण्याचेच कार्य करीत असतो. जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल विराजमान झाले होते. तेव्हा सतत त्यांचाच उदोउदो सुरु होता. हे बहुधा केजरीवाल विसरले आहेत. म्हणजे त्यांच्या बाजूने बातम्या दाखविल्या की मिडीयावाले चांगले आणि इतरांच्या वस्तुस्थितीदर्शक बातम्या दाखविल्या की मिडीयावाले विकले गेले अशी जर केजरीवालांची विचारसरणी असेल तर यापुढील काळात केजरीवाल यांचा उदोउदो करणार्‍या मिडीयावाल्यांनी त्यांचे विनाकारण किती कौतुक करायचे याचा गांभिर्याने विचार करावा अशीच सामान्यांची भावना आहे.
सध्या देशात नमोची लाट आहे. हे कोणीच नाकारु शकत नाही. मध्यंतरी एका जाहीर सभेत बोलताना केजरीवाल यांनी अशी कोणतीच मोदी लाट नसल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. परंतु त्याच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मोदी लाट असल्याचे कबुल केले. दुतोंडी केजरीवाल यांच्या या दोन्ही क्लिप सोशल मिडीयावरुन फिरत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांनी राजा हरिश्‍चंद्राचा आव आणून दुसर्‍यांना मार्गदर्शन करण्याच्या फंदात पडू नये. यावेळी तरी दुसरे काय झाले. साधी राहणीचा देखावा निर्माण करण्यात धन्यता मानणार्‍या आपने नागपूरला चक्क दहा दजार रुपये द्या आणि केजरीवालांसोबत जेवण घ्या अशी योजना जाहीर केली याचा यथातथाच प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातच केजरीवाल यांनी मिडीया विकला गेला असल्याचे वक्तव्य केले. ते सर्व वाहिन्यांनी दाखविले. हा प्रकार रात्री झाला. सकाळी पत्रकारांनी कालच्या प्रकाराबाबत विचारले असता केजरीवाल यांचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा समोर आला. त्यांनी आपण असे म्हटले नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. मग काल कोण केजरीवाल यांचे भूत बोलले का ? असा प्रश्‍न आम आदमीला पडला आहे. बरं. इकडे केजरीवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केला असला तरी तिकडे दिल्लीत मात्र त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार बैठक घेऊन केजरीवाल यांच्या भूमिकेचे समर्थन केले. केजरीवाल यांना आम आदमीचे एकच सांगणे आहे, तुम्ही जे वक्तव्य करता त्यावर ठाम रहा. आज एक आणि उद्या दुसरेच असा दुतोंडीपणा कशासाठी?
सत्य आहे ते मिडीया दाखवित असेल तर त्यांंच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे? आपचे नेत्यांना प्रसिध्दीचे व्यसन लागले आहे. अर्थात ते मिडीयानेच लावले आहे. दिल्लीत सत्तेवर असताना केजरीवाल या नावाशिवाय मिडीयावाल्यांचा दिवस मावळत नव्हता. सतत विविध वाहिन्यांवर झळकत राहायचे याची सवय यामुळे केजरीवालांना लागली. आणि त्याचाच प्रत्यय काल डिनर पार्टीत सर्वांना आला. पुरावे दिल्याशिवाय तोंडाची बाष्कळ बडबड करण्यात काहीही अर्थ नाही. देशात आपबद्दल जी सहानुभूती होती ती कमी होत चालली आहे. भविष्यात आपच्या नेत्यांनी अशीच दुतोंडी वक्तव्ये केली तर आप नावाचा पक्ष अस्तित्वात होता अशी नोंद इतिहासात करावी लागेल.