शनिवार, 15 मार्च 2014

केजरीवालजी, मिडीयावर का घसरता?

दिवसेंदिवस आपचे नेते वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत सापडत चालले आहेत. काल दिल्लीचे 49 दिवसांचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व मिडीया नमो नमो चा जप करीत असून आपण सत्तेवर आल्यास मिडीयावाल्यांना जेलमध्ये घालू अशी धमकीवजा इशारा दिला आहे. मिडीया नेहमी वस्तुस्थिती दर्शविण्याचेच कार्य करीत असतो. जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल विराजमान झाले होते. तेव्हा सतत त्यांचाच उदोउदो सुरु होता. हे बहुधा केजरीवाल विसरले आहेत. म्हणजे त्यांच्या बाजूने बातम्या दाखविल्या की मिडीयावाले चांगले आणि इतरांच्या वस्तुस्थितीदर्शक बातम्या दाखविल्या की मिडीयावाले विकले गेले अशी जर केजरीवालांची विचारसरणी असेल तर यापुढील काळात केजरीवाल यांचा उदोउदो करणार्‍या मिडीयावाल्यांनी त्यांचे विनाकारण किती कौतुक करायचे याचा गांभिर्याने विचार करावा अशीच सामान्यांची भावना आहे.
सध्या देशात नमोची लाट आहे. हे कोणीच नाकारु शकत नाही. मध्यंतरी एका जाहीर सभेत बोलताना केजरीवाल यांनी अशी कोणतीच मोदी लाट नसल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. परंतु त्याच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मोदी लाट असल्याचे कबुल केले. दुतोंडी केजरीवाल यांच्या या दोन्ही क्लिप सोशल मिडीयावरुन फिरत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांनी राजा हरिश्‍चंद्राचा आव आणून दुसर्‍यांना मार्गदर्शन करण्याच्या फंदात पडू नये. यावेळी तरी दुसरे काय झाले. साधी राहणीचा देखावा निर्माण करण्यात धन्यता मानणार्‍या आपने नागपूरला चक्क दहा दजार रुपये द्या आणि केजरीवालांसोबत जेवण घ्या अशी योजना जाहीर केली याचा यथातथाच प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातच केजरीवाल यांनी मिडीया विकला गेला असल्याचे वक्तव्य केले. ते सर्व वाहिन्यांनी दाखविले. हा प्रकार रात्री झाला. सकाळी पत्रकारांनी कालच्या प्रकाराबाबत विचारले असता केजरीवाल यांचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा समोर आला. त्यांनी आपण असे म्हटले नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. मग काल कोण केजरीवाल यांचे भूत बोलले का ? असा प्रश्‍न आम आदमीला पडला आहे. बरं. इकडे केजरीवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केला असला तरी तिकडे दिल्लीत मात्र त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार बैठक घेऊन केजरीवाल यांच्या भूमिकेचे समर्थन केले. केजरीवाल यांना आम आदमीचे एकच सांगणे आहे, तुम्ही जे वक्तव्य करता त्यावर ठाम रहा. आज एक आणि उद्या दुसरेच असा दुतोंडीपणा कशासाठी?
सत्य आहे ते मिडीया दाखवित असेल तर त्यांंच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे? आपचे नेत्यांना प्रसिध्दीचे व्यसन लागले आहे. अर्थात ते मिडीयानेच लावले आहे. दिल्लीत सत्तेवर असताना केजरीवाल या नावाशिवाय मिडीयावाल्यांचा दिवस मावळत नव्हता. सतत विविध वाहिन्यांवर झळकत राहायचे याची सवय यामुळे केजरीवालांना लागली. आणि त्याचाच प्रत्यय काल डिनर पार्टीत सर्वांना आला. पुरावे दिल्याशिवाय तोंडाची बाष्कळ बडबड करण्यात काहीही अर्थ नाही. देशात आपबद्दल जी सहानुभूती होती ती कमी होत चालली आहे. भविष्यात आपच्या नेत्यांनी अशीच दुतोंडी वक्तव्ये केली तर आप नावाचा पक्ष अस्तित्वात होता अशी नोंद इतिहासात करावी लागेल.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें