बुधवार, 19 मार्च 2014

इंटरनेटव्दारे फसवणूक चिंताजनक !

आजकाल विविध ‘ डे ‘चा जमाना आहे. पण केवळ ‘ डे ‘ साजरे करण्यापेक्षा त्यामागील विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हेच घ्या ना! दि. १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला . ग्राहक खरेच जागरुक असतात का? हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. प्रामुख्याने इंटरनेटव्दारे होणार्‍या फसवणूकीचा विषय चिंताजनक आहे. त्यासंबंधात विचारमंथन करणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यात वर्तमानपत्रात ऑनलाईन शॉपिंग व्दारे झालेल्या फसवणूकीची बातमी वाचली. संबंधित व्यक्तीने ऑनलाईन वेब साईटव्दारे काही वस्तु मागवल्या व त्या हाती पडल्यावर पार्सल मधून फक्त कागदाची रद्दी निघाली. त्याचे काही हजार रूपये पाण्यात गेले. या व अशा प्रकारच्या ऑनलाईन खरेदीतून फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण मधून अधून ऐकतो, वाचतो व सोडून देतो. पण ह्या गोष्टी इतक्या सहजपणे घेण्यासारख्या नाहीत.
इंटरनेट व त्याचा वापर याचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरनेटला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच ई-बँकिंग व ई-शॉपिंग मुळे तर हे प्रमाण वाढले आहे. आजच्या धकाधकीच्या काळात ऑनलाईन व्यवहारांमुळे अनेक सोई झाल्या आहेत. पण त्याचप्रमाणे याची दुसरी बाजूपण तितकीच गंभीर आहे. इंटरनेटवरून फसवणूक करणारे पण तितकेच वाढले आहेत. मुळ वेबसाईटची नक्कल करून खोट्या जाहीरातीच्या माध्यमातून काही महाभाग सर्वसामान्य नागरिकांना * आर्थिक * चुना लावतात. आपण नेहमी जी संकेतस्थळे पाहतो त्यावर अनेक आकर्षक योजनांच्या जाहीराती असतात. बर्‍याच प्रमाणात सुट व बरोबर अनेक इतर वस्तु फुकट देण्याचे अमीष यात दाखवले जाते. तसेच अनेक टि.व्ही. वाहिन्यांनवर पण सतत ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहीत करणार्‍या जाहीराती व कार्यक्रम दाखविले जातात. यात अगदी पायाच्या नखा पासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांसाठी उपयोगी पडणारी उत्पादने दाखविली व विकली जातात. अर्थात सर्वच संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणूक होते असे नाही परंतु फसवणूकीच्या प्रमाण आहे हे कोणीच नाकारु शकत नाही.  ह्या फसवणुक करणार्‍यांना माणसाच्या स्वभावाची चांगली माहिती असते की माणूस प्रलोभनांना बळी पडतो. याचाच फायदा घेऊन ते गंडा घालतात. यात आपल्या बँक खात्यावर डल्ला घातला जाऊ शकतो. कारण या व्यवहारात जर क्रेडीत कार्ड/डेबीट कार्ड वापरले तर त्यावरून आपली सर्व माहिती घेऊन आपले बँक खाते रिकामे केले जावू शकते.
अशा प्रकारच्या फसवणूकीत ऑनलाईन लॉटरी, फसव्या ई-मेल व्दारे तुमची माहिती जमा करून ती तुमचे खाते व पैसे लाटण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तुमचा पैसा वापरून कुठूनही खरेदी केली जाते व बिल तुमच्या नावे येते.  या व अशा प्रकारच्या फसवणूकी पासून आपल्याला जर वाचायचे असेल तर आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा पैशाचा व्यवहार करताना योग्या ती काळजी घ्यावी. आपल्या पैशाच्या व्यवहाराची माहिती कधीही ई-मेल व्दारे पाठवू नये. ज्या संगणकावरून आपण अशी खरेदी करत आहोत तो संगणक व ते ठिकाण खात्रीचे असावे. आपल्याला ज्या संकेत स्थळाची योग्य व खात्रीची माहिती आहे तेथूनच खरेदी करावी. कंपनीचा पत्ता नीट पहावा, फोन नंबर पहावा. जर नुसताच ई-मेल आपल्याला आला असेल तर अशा ठिकाणाहून खरेदी करू नये. संकेतस्थळाचे सुरक्षितता प्रमाणपत्र तपासावे. त्याची माहिती थोड्या वाचनाने मिळू शकते. कोणत्याही संकेतस्थळाच्या पत्त्यामध्ये नुसते http//: असेल तर त्यावर आपली माहिती सुरक्षित राहिलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे  https//: असे जर असेल तर या  ‘S’ अक्षराने तुमची माहिती सुरक्षित राहू शकेल याची  शक्यता वाढते. तसेच प्रत्येकाने आपला पासवर्ड थोड्या दिवसांनी बदलत रहावा, आपल्या व्यवहारांची नोंद ठेवावी, के्रडिट कार्ड नंबर, पासवर्ड कोणालाही सांगू नये. या व अशा काही गोष्टी एक नागरिक म्हणून आपण करू शकतो.
यात देशातील सरकार व न्यायव्यवस्थेनेपण महत्वपूर्ण कार्य करणे अपेक्षित आहे. भारतासारख्या देशात ऑनलाईन शॉपिंग हे जवळजवळ 2000 शहरे व गावांमध्ये पोहोचले आहे. यात बरेच जण ‘ कॅश ऑन डिलीव्हरी ‘  हा पर्याय न वापरता ई-पेमेंट करतात व अशा प्रकारे फसवणूकीला आयते आमंत्रण देतात. या फसवणूकीवर आपल्या देशात पुरेसे कायदे नाहीत. सर्वसामान्य माणूस याबाबत अजून अज्ञानी आहे. आपल्यासारख्या आय.टी. महासत्ता म्हणवणार्‍या देशात सायबर गुन्ह्यांविरूध्द कडक कायदेच नाहीत. त्यामुळे आरोपींवर वचक बसत नाही. ही बाब खेदाची आहे. दरवर्षी ग्राहक दिनाला जनजागृती फेर्‍या, पोस्टर, चर्चा केल्या जातात पण याविषयावर कितपत गांर्भियाने विचार होतो हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे जगभरात अशा प्रकारचे कायदे होत आहेत व अस्तीत्वातपण आहेत त्यामुळे आपल्या देशाने पण याचे महत्व ओळखून योग्य पावले उचलावीत आणि महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी देखील जागरुक होणे आवश्यक आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें