बुधवार, 12 मार्च 2014

कसली तत्व? कसल्या निष्ठा?

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण्यांचे खरे स्वरुप उघड होऊ लागले आहे. आतापर्यत पक्षश्रेष्ठींची महती गाणारे राजकारणी नेते जेव्हा त्यांचे तिकीट कापले जाते तेव्हा त्याच पक्षाध्यक्षांच्या विरोधात आरोप करण्यातच आघाडीवर असतात असेच चित्र आहे. वास्तविक ज्या गोेष्टीची लाज वाटली पाहिजे त्याच गोष्टीचे संबंधित राजकारणी समर्थन करताना दिसतात तेव्हा मतदाराची मान शरमेने खाली जाते. सत्तेची नशा राजकारण्यांना अशी काही चढलेली असते की त्यामध्ये खंड पडला की त्यांना राहवत नाही. सतत सत्ता आणि सत्ता एवढेच त्यांना माहित असते. त्यामुळेच आपण सोडून दुसर्‍या कुणाला सत्तेचा प्रसाद मिळत असेल तर ते सरळ पक्षाला तिलांजली देऊन दुसर्‍या पक्षात प्रवेश करतात आणि दुर्दे:व म्हणजे इतर पक्षही त्यांचे जंगी स्वागत करुन त्यांनाच उमेदवारी देतात. निष्कर्ष काय तर तेच ते राजकारणी सतत सत्तेच्या खुर्चीवर बसतात आणि सामान्य कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो.
राजकारणी मंडळी ही चालू असतात असाच सर्वसामान्य समज आहे. त्यावर अशा काही घटना समोर आल्या की शिक्कामोर्तब होते. दलबदलू आणि सत्तापिपासू राजकारणी मंडळींना खर तर जनतेनेच दिवसा तारे दाखवायला पाहिजेत. परंतु ते होताना दिसत नाही. एखाद्या पक्षात ज्यावेळी दलबदलू राजकारणी असतो त्यावेळी तो पक्ष निष्ठा आणि पक्षाची तत्वे याविषयी भरभरुन बोलत असतो. परंतु हा केवळ देखावाच असतो. ज्यावेळी त्याला तिकीट मिळत नाही त्यावेळी तोच दलबदलू नेत्याचा दुसरा चेहरा पहावयास मिळतो. मग त्याने यापूर्वी ज्या पक्षनिष्ठेच्या गप्पा मारलेल्या असतात त्याचे काय? की आपण केले ते नाटक होते असे त्याने सरळ कबुल करावे आणि आपण केवळ सत्ताप्रेमीच आहोत हे अभिमानाने सांगावे. हे राजकारणी इतके हुशार असतात की पक्षबदलाला तात्विक मुलामा देत त्यांचे कसे बरोबर आहे याचे दाखले देतात. जनता देखील त्यांच्या या भूलथपांनाच अनेकवेळा फसते आणि पक्ष न पाहता केवळ व्यक्ती पाहून त्याच्या मागे जाते. हे कोठेतरी थांबले पाहिजे.
पक्षबदलू नेत्यांना जनतेने वेळीच त्यांची जागा दाखविली तर भविष्यात असे अनेक पक्षबदलू नेते निर्माण होणेच थांबेल. महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसर्‍यांना संधी द्यायला संबंधित पक्षबदलू नेत्यांना कमीपणा का वाटतो? आजन्म आपणच सत्ता भोगावी असाच त्यांचा समज असतो. म्हणून गंमतीने आण्णा हजारे असे सांगतात की, राजकारणी जेव्हा निधन पावतो तेव्हा त्याला असेच वाटत असते की स्मशानापर्यत मला खुर्चीवरुनच घेवून जावे. आण्णा हे उदाहरण गंमतीने सांगत असले तरी त्यामध्ये सत्य आहे हे कोणीच विसरु नये.
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें