सोमवार, 24 मार्च 2014

आयुष्याचे जीवनगाणे

प्रत्येकाचा मनुष्यस्वभाव हा निराळा असतो. एखाद्याला एका गोष्टीत आनंद दिसला तर दुसर्‍याला तसे दिसेलच याची काही शाश्‍वती नाही. हे म्हणणे पटावे यासाठी नेहमी एक उदाहरण दिले जाते. दोन माणसांच्या समोर एक पेला ठेवला त्यामध्ये थोडे पाणी भरले आणि त्यांना विचारले की पेल्याचे वर्णन करा. तर त्यातील एकजण म्हणेल की, हा पेला अर्धा रिकामा आहे. तर दुसरा म्हणेल की, हा पेला अर्धा भरलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जीवनाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो हे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दु:खाचे डोंगर असतात त्याचप्रमाणे सुखाच्या काही टेकड्याही असतात. परंतु आयुष्याच्या वाटेला दु:ख आले म्हणून रडत बसायचे? की त्याचा धीराने सामना करायचा? हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.
आजकालची पिढी ही सुखवस्तु आहे. म्हणजे लहानपणापासूनच पालक मुलांचे वाट्टेल ते हट्ट पुरवितात.साहजिकच मुलांच्यात नकार पचवायची ताकदच नसते. साहजिकच कोणतीही मनाविरुध्द गोष्ट झाली की चिमुकल्यांपासून महाविद्यालयीन युवक – युवतींपर्यत अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर आपल्याला आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. सतत होकाराची सवय लागली असल्याने अनेकांना नकार म्हणजे जीवनातील सर्वात मोठे संकट वाटते. आणि ते आपले जीवन संपवितात. परंतु आपल्या मागे आई – वडिलांची मनस्थिती काय होईल याचा कोणीही विचार करताना दिसत नाही.
जीवन हे अनमोल असते. परंतु जीवनाचे मूल्य फार कमी जणांना कळते. इतर प्राणी आणि मनुष्य यामध्ये महत्वाचा फरक असतो. तो म्हणजे इतरांना विचारशक्ती नसते. मनुष्याला असते. अर्थात या विचारशक्तीचा वापर कसा करायचा? हे मात्र ज्याचे त्याने ठरवायचे असते. दुर्देवाने आज तेच होताना दिसत नाही. जो तो आपल्याची विचारविश्‍वात रममाण झालेला आपल्याला पाहायवास मिळतो. मी आणि माझे एवढेच अनेकांची विश्‍व बनते. आपण सुखी झालेच पाहिजे परंतु त्याचबरोबरीने समाज देखिल अधिकाधिक कसा सुखी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण आज आहे उद्या असू की नसू हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला मिळालेल्या जीवन देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी कसे सार्थकी लागेल हेच पहावे लागेल. कित्येकजण जीवनाला दोष देण्यातच धन्यता मानतात. अशा महाभागांनी जरा आठवड्यातून एकदा स्मशानात जाऊन यावे म्हणजे त्यांना जीवनाचे महत्व पटेल. आपल्या जीवनाचा उपयोग इतरांसाठी  कसा होईल हे प्रत्येकाने पाहिेले तर अनोखे जीवनगाण्याचे स्वर आसमंतात घुमतील आणि ते निश्‍चित मधुर असतील हे नक्की!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें