शुक्रवार, 7 मार्च 2014

अतिआत्मविश्‍वास बरा नव्हे!

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभेला महाराष्ट्रात युतीच्या जागा अधिकाधिक याव्यात यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मुंबई येथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे करु नयेत असे मत व्यक्त केले. यावर राज यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नसतानाच शिवसेनेने आणि काही भाजपाच्या नेत्यांनीही या भेटीलाच आक्षेप घेत गडकरी यांच्यावर तोंडसुख घेतले. पाच जणात सहावा कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि सगळीच समीकरणे धुळीस मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात ही समीकरणे केवळ लोकसभेपुरतीच होती. यंदाची लोकसभा निवडणुकीला अत्यंत महत्व आहे. नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी असाच सामना आहे. देशात मोदींची लाट आहे. भाजपाला 272 चा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास भाजपा मागे पुढे पाहत नसल्याचेच दिसत आहे. नुकतीच त्यांनी रामविलास पासवान यांच्याशी युती करुन त्याचे संकेत दिले आहेत. बहुधा यामुळेच गडकरी यांनी मनसेला साकडे घातले असेल असे वाटते. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेने मोठ्या संख्येने मते मिळविली होती. अर्थात ते त्यांचे यशच म्हणायला हवे. परंतु शिवसेनेने आमची मते मनसेने खाल्ली हो! असा प्रचार केला. आणि मनसेला खलनायकाच्या भूमिकेत उभे केले. मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिल्याने त्याचा फायदा कॉग्रेस आणि राष्ट्रवादीलाच झाला. आणि तेच पुन्हा एकदा सत्तेत आले. हा इतिहास आहे.
साहजिकच इतिहासा बदलण्यासाठीच आणि सेना भाजपाच्या मतांत फाटाफूट व्हायला नको या उद्देशाने गडकरी यांनी काही प्रयत्न केले असतील तर त्याला चुकीचे म्हणता येत नाहीत. भाजपाला आता एकेक जागा महत्वाची आहे. मनसेने त्यांचे उमेदवार उभे केले नाहीत तर सर्व मते युतीला पडतील अर्थात मोदींना पडतील असा साधा सरळ हिशेब गडकरी यांनी केला असल्याचेच दिसते. हे सर्वांना मान्य होणे अवघडच होते. आणि तसेच घडले. मागील  वेळी देखिल आत्मविश्‍वासच युतीला नडला होता. यंदा तरी यामध्ये काही फरक होईल असे वाटले होते. काही काही वेळा अतिआत्मविश्‍वास स्वत:च्याच नाशाला कारणीभूत होतो हेच खरे!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें