गुरुवार, 26 दिसंबर 2013

अर्ध्यावरती डाव मोडणार!

कॉग्रेसच्या पाठिंब्याने का होईना पण अखेर अरविंद केजरीवाल यांनी आपचे सरकार दिल्लीत बनविले. निवडणुकीआधी कॉग्रेसवर वाट्टेल ते आरोप करणार्‍या आपला दिलेला पाठिंबा युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना पसंत पडलेला दिसत नाही. निदान वरवर तरी तसे दिसते. अंतर्गत राजकारण काय असेल? हे सांगण्याची गरज नाही. कॉग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत केजरीवाल यांचे पुतळे जाळले तर काही कार्यकर्त्यांनी थेट कॉग्रेस कार्यालयावरच हल्ला चढविला आणि तोडफोड केल्याचे वृत्त प्रसाारमाध्यमांनी दिले आहे. तर केजरीवाल यांनी कॉग्रेसच्या पाठिंब्याबाबत आम्हाला काही देणे घेणे नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिले आहे. साहजिकच एकूण परिस्थिती पाहता आपच्या सरकारचा अर्ध्यावरती डाव  मोडण्याचीच चिन्हे आहेत. आता प्रतिक्षा आहे ती, सरकार केव्हा कोसळते? याचीच…
दिल्लीत भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला असला तरी बहुमत नसल्याने त्याने सरकार बनविण्याचे धाडस केले नाही. आपचे केजरीवाल यांनी प्रारंभापासूनच आम्ही कोणाचाही पाठिंबा घेणार नाही आणि कोणालाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेेलाच ते जागतील असेच सर्वांना वाटत होते. परंतु त्यांनी अचानक कॉग्रेसचा पाठिंबा घेतला त्याचवेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कॉग्रेसनेही मोठ्या मनाने पाठिंबा देण्याचे धैर्य दाखविले. तोपर्यत कॉग्रेस कार्यकर्त्यांनी तरी काही खळखळ केली नाही. परंतु ज्यावेळी केजरीवाल मुख्यमंत्री बनतील असे जाहीर झाले तेव्हा मात्र युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरुन पुतळे जाळणे, तोडफोड करणे हे उपक्रम इनामइतबारे सुरु केले. अर्थात यामागील सुत्रे देखिल कॉग्रेसच्या नेत्यांनीच हलविली असल्याचे बोलले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
केजरीवाल यांनी तरी अजून सत्तापदी विराजमान होण्याआधीच कॉग्रेस विरोधातील बडबड सुरु केली आहे. कॉग्रेस आणि आप यांनी सरकार बनविताना जनतेवर निवडणुकीच्या पैशाचा चुराडा होऊ नये म्हणून आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा केला होता. त्याऐवजी काही सामाईक कार्यक्रमांवर सहमती केली असती तर ते अधिक श्रेयस्कर झाले असते. आप ने देखिल प्रारंभीच कॉग्रेसवर वार करण्यापेक्षा प्रथम जनतेचे प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला असता तर ते अधिक श्रेयस्कर झाले असते. आपच्याच एका पक्षाने सोशल मिडीयावर कॉग्रेसवर दुतोंडी साप म्हणून टिका केली आहे. वास्तविक असल्या टिकेची काहीही गरज नव्हती. आपण ज्यांचा पाठिंबा घेतो त्यांचाच जर तुम्ही जाहीरपणे पाणउतारा करायला लागलात तर भविष्यकाळ अंधकारमयच असणार.
केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे संकेत दिेले आहेत. दिल्लीतील आतापर्यतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांचे नाव पुढे आले आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की, जर कॉग्रेस आणि आप चे संबंध असेच ताणले गेले तर काही महिन्यातच सरकार कोसळेल आणि सर्वात कमी दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होईल. तसे होऊ नये आणि आप ने कॉग्रेसच्या पाठिंब्यावर अधिकाधिक जनतेचे प्रश्‍न सोडवावेत हीच आम आदमीची इच्छा आहे.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें