रविवार, 29 दिसंबर 2013

वेगाची नशा कधी संपणार?

सध्या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोजचे वृत्तपत्र उघडले की हमखास अपघाताची बातमी असतेच. यामध्ये बहुतेक अपघात होतात हे अनेकांच्या डोक्यात गेलेल्या वेगाच्या नशेमुळे होतात. रस्ता म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टीच आहे अशा आविर्भावात अनेकजण वाहन चालवित असतात. त्यामध्ये देखिल हॉलीवुड आणि बॉलीवुड चित्रपटांचा प्रभाव या नशावीरांवर असतोच. वास्तविक अपघात होऊ नयेत यासाठी  हमरस्त्यावर वाहन सावकाश चालवा, वेगाची नशा करी जीवनाची दुर्दशा या प्रकारचे जे फलक असतात. परंतु त्याकडे पाहण्यास कोणाला वेळ असतो? जो तो आपल्याच वेगात दौडत असतो. 
21 वे शतक म्हणजे सुपरफास्ट शतक असा एक चुकीचा समज आपण करुन घेतला आहे. तुम्हाला इच्छित स्थळी जर योग्य वेळी पोहचायचे असेल तर घरातून 15 ते 20 मिनीटे लवकर निघा ना? पण नाही! उशीरा निघून लवकर पोहचायची जर इच्छा मनात धरली आणि त्यानुसार कृती केली तर दुसरे काय होणार? रात्रीच्या वेळी तर काही वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवतात किंवा त्यांची झोप तरी पूर्ण झालेली नसते. आणि मग नको ते प्रकार घडतात. मध्यंतरी मराठी चित्रपट आणि मालिकांमधील हरहुन्नरी कलावंत आनंद अभ्यंकर, भक्ती बर्वे या अपघातातच गेल्या हे कधीच विसरता येणार नाही. अपघाताचा धसका बर्‍याच कलावंतानी घेतलेला आहे. कारण त्यांनी रात्रीचा प्रवास कमी केला आहे. जीवन हे अनमोल असते ते अशा अपघातात वाया का घालवायचे? हा प्रश्‍न कोणाच्याच मनात निर्माण होत नाही.
चित्रपटांमधून गाड्या पळविण्याचे जे प्रकार दाखविले जातात. त्यामध्ये कॉम्पुटरची करामतीचा भाग असतो हे आपण कसे विसरतो? आणि जो हिरो पडद्यावर रुबाब मारतो तो स्टंट सीन करताना अनेकदा डमीचा आधार घेतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण ज्यावेळी आपला जीव धोक्यात घालतो त्यावेळी त्यावेळी आपल्य मागे असलेल्या कुटुंबाला काय वाटेल याचा साधा विचारही आपण करीत नाही? आपण कुणाचा तरी मुलगा, पती, जावई,बाप असतो हे आपल्या लक्षात येत नाही. कारण वेगाची नशा आपल्या डोक्यात गेलेली असते. त्यामुळे एक वेळ असा विचार मनात येतो की, प्रत्येक वाहनांमध्ये वेगाची गती किती असावी? निश्‍चित केले जावे. त्यामुळे तरी काही प्रमाणात अपघातांचे प्रमाण कमी होईल. कायदे करुन प्रश्‍न संपत नाहीत तर ते निर्माण होतात. लोकांची मानसिकता जोपर्यत बदलत नाही. तोपर्यत काहीही उपयोग होणार नाही. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनीच पुढाकार घ्यावे आवश्यक आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें