शनिवार, 28 दिसंबर 2013

आता तरी शहाणे व्हा!

आपल्याकडील तरुण पिढी पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करण्यातच धन्यता मानत असल्याचे पहावयास मिळते. परंतु पाश्‍चात्यळलेल्या  आणि पिझ्झा आणि बर्गरप्रेमी तरुणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाईल अशी बातमी प्रकाशात आली आहे. भारतीयांना फास्ट फूडची चटक लावणार्‍या मॅकडोनाल्ड कंपनीने त्यांच्या कंपनीत कामास असणार्‍या कर्मचार्‍यांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार ग्राहकांना आपले पदार्थ केवळ सर्व्ह करा परंतु तुम्ही या पदार्थांच्या आहारी जाऊ नका असा सल्ला दिला आहे. कारण काय तर फास्ट फूड खाल्याने अनेक आजारांना तोंड द्यावे लागते हे मॅकडोनाल्ड कंपनीला समजले आहे. म्हणजे थोडक्यात स्वत:च्या फायद्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळा असाच फतवा कंपनीने काढला आहे.
काही वर्षापासून भारतीयांच्या तब्येतीच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे आपण काय खातो? हे आहे. प्रामुख्याने शहरात पती -  पत्नी दोघेही नोकरी करीत असतात. त्यामुळे स्वयंपाक करण्यास बहुतांशीवेळा टाळाटाळच केली जाते. आणि मग फास्ट फूडला जवळ केले जाते. फास्ट फूडमुळे स्वयंपाकाचा वेळ निश्‍चित वाचतो. परंतु ते पदार्थ प्रकृतीला अपायकारक असल्याचे भारतीय तज्ञांनी अनेकवेळेला सांगितले आहे. परंतु त्यावर विश्‍वास ठेवायला आपले भारतीय मन तयार होत नाही. जर तोच विचार कोणी पाश्‍चात्य विचारवंताने अथवा तज्ञांनी सांगितला तर मात्र आपण त्यांचे म्हणणे गांभिर्याने घेतो. पूर्वीच्या काळातील माणसे पहा, त्यांचे खाणे खरोखरच पौष्टिक होते. त्यामुळेच त्यांच्या तब्येती धडधाकट होत्या. आपल्याकडील आजी - आजोबा यांच्या तब्येती पहा ना! बहुतांशी जणांच्या तब्येती अजून उत्तम आहेत. याउलट आताची तरुण पिढी घ्या! तीशीतच अनेक तरुण ढेपाळलेले पहावयास मिळतात. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. कारण देशाची पिढीच जर अनेक रोगांचे माहेरघर असलेली निर्माण झाली तर अवघड आहे.
घरचे खाणे त्यांना माहितच नाही. बाहेर गेले की कोठल्यातरी रेस्टॉरंट मध्ये जायचे, स्टेटस जपण्यासाठी पिझ्झा, बर्गरची ऑर्डर द्यायची, सोबत कोक अथवा पेप्सी घ्यायची. हे यांचे तंत्र. परंतु यामुळे आपण आपल्या प्रकृतीवरच आघात करीत आहोत हे किती जणांच्या लक्षात येते. फास्ट फूड खाल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रद्याशी संबंधित विविध आजार आपल्या शरीरात घर करतात हे कोणीच लक्षात घेत नाही. स्वत:च्या खिशाला चाट लावून फालतू पदार्थ खाण्यापेक्षा भाकरी -  पिठले कधीही उत्तम!  परंतु ते खाण्यात कित्येकांना कमीपणा वाटतो.
मध्यंतरी युती शासनाच्या काळात एक रुपयात झुणका भाकर ची योजना सुरु होती. त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी सायंकाळच्या वेळी हमखास झुणका भाकर च्या स्टॉलवर दिसायचे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आताची महागाईचा वाढता रेषो लक्षात घेऊन पुन्हा एकदा वाढीव दराने झुणका भाकर योजना लागू करणे गरजेचे आहे. फास्ट फूड टाळणे अत्यावश्यक आहे. फास्ट फूड विकणार्‍या जगविख्यात कंपनीनेच त्यांच्या कर्मचार्‍यांना फास्ट फूड न खाण्याचा सल्ला दिल्याचे समोर आल्यानंतर तरी आपल्या तरुण पिढीने शहाणे व्हावे!

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें