सोमवार, 30 दिसंबर 2013

मस्ती की पाठशाला !

देशात, बलात्कार कसा करावा? खून कसा करावा? चोर्‍या कोणत्या पध्दतीने कराव्यात यासह अन्य गुन्हे सराईतपणे कसे करावेत हे शिकविणारी कोणतीही पाठ्यशाळा उपलब्ध नाहीत. तरीही समाजात गुन्हेगारीचा आलेख सतत चढताच आहे. हे कशामुळे होते? याचा विचार शिक्षक आणि पालक कधीतरी शांतपणे करणार आहेत का? हल्लीच्या काळात शाळेत जाणे म्हणजे टाईमपास करण्याकरिता जाणे! असाच अनेक पाल्यांचा समज झालेला आहे. कारण शाळा सुटल्यानंतर प्रायव्हेट क्लासमध्ये काय शिकविले जाते? याकडेच अनेक पाल्यांचे लक्ष असते. तीच गत महाविद्यालयाची! आजकाल पूर्वीसारखा शिक्षकांचा धाक उरलेला नाही. पालकांचा दरारा तर केव्हाच इतिहासजमा झाला आहे. आज विद्यार्थीच शिक्षक आणि पालकांना खडे बोल सुनावण्यास मागे पुढे पाहत नाहीत. हे चित्र बदलण्याकरिता आपण सर्वानीच सामुहिक प्रयत्न करायला पाहिजेत.
शाळा हे मंदिर आहे हे वाक्य आता केवळ पाठ्यपुस्तकांतच वाचायले मिळते. परंतु वास्तवात काय चित्र दिसते? तेथे केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षण मिळते की, विद्यार्थ्यांवर खरेच राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारे शिक्षण मिळते ? हे पाहणे बहुसंख्य पालकांना महत्वाचे वाटत नाही. आपल्या पाल्य इंग्लिश मिडीअममध्ये शिकला म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता झाली असाच अनेकांचा समज असतो. यासाठी कितीही पैसे डोनेशन म्हणून मोजण्यास पालक तयार असतात. बालवाडीपासून उच्चशिक्षणाशिवाय शाळेच्या फी व्यतिरिक्त पालकांच्या खिशातून जादा पैसे अनेक संस्थाचालक उकळतात. आणि त्याला डोनेशन असे गोंडस नाव देतात. म्हणजे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर काहीतरी जादा दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. हाच संस्कार होतो ना? मग मोठेपणी निस्वार्थ भावनेने काम करणे म्हणजे हा अनेकांना मुर्खपणाच वाटतो. परंतु याला अपवादही काहीजण आहेत. आज काही सेवाभावी संस्थां/संघटनांमधून उच्चशिक्षण घेतलेले परंतु गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या लाथाडून ,अविवाहित राहून समाजासाठीच आपले जीवन समर्पित करणारी व्यक्तीमत्वही याच मातीत जन्माला येत आहेत.
सुखाची परिभाषाच आता बदलली आहे. वाट्टेल ते करुन पैसा कमावणे आणि भौतिक साधनात रममाण होणे म्हणजे सुख! असेच अनेकांना वाटते. परंतु शारिरीक समाधान हे दिवसेंदिवस वाढतच असते. ते कधीच पूर्ण होत नाही. आपल्याला मानसिक समाधान मिळते का? हा प्रश्‍न कितीजण स्वत:ला विचारतात. प्रचंड पैसे कमावलेल्या माणसाला मऊ बिछान्यावर झोप येत नाही. तर एखाद्या साधू, सन्यासी किंवा निरपेक्ष भावनेने काम केलेल्या कोणीही साध्या जमीनीवर देखिल आडवे पडल्यावर काही क्षणांत शांत झोपतो? हे कशाचे लक्षण आहे. आपल्या देशाला गौरवशाली इतिहास आहे. परंतु त्या इतिहासाचा केवळ जागर करण्यातच आम्ही धन्यता मानणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच. पैश्याच्या मागे लागून आयुष्य वाया घालविण्यापेक्षा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केला पाहिजे. पैसा मिळविलाच पाहिजे पण तो सचोटीच्या मार्गाने हा संस्कार देशाच्या भावी आधारस्तंभांवर होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी शाळा तसेच महाविद्यालये या मस्ती करण्याचे ठिकाण होता कामा नयेत. तर तेथून भविष्यकाळात गतकाळातील समाजसुधारकांचा वारसा पुढे चालविणारे अनेकजण घडावेत या दृष्टीने शाळांनी आपली वाटचाल ठेवली पाहिजे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें