बुधवार, 25 दिसंबर 2013

'मोदी फॅक्टर'...

चार राज्यात कॉग्रेसची दाणादाण उडाली आहे. या चारही राज्यात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचारसभा केल्या होत्या. त्यांच्या सभांना झालेली गर्दी प्रसारमाध्यमाव्दारे आपण सर्वांनीच पाहिली आहे. मोदींनी प्रश्‍न विचारल्यावर नागरिकांतून मिळणारा प्रतिसाद देखिल आपण पाहिला आहे. असे असूनही काही भाजपा विरोधक आणि खुद्द अमेरिकेतील तज्ञांच्या मते या विजयात मोदी लाटेचा काहीही वाटा नाही? मग नेमकी मोदी लाट म्हणजे काय? हे त्यांनी स्पष्ट केले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते.
चारही राज्यात कॉग्रेसचे जेवढे आमदार निवडून आले त्यांची बेरीज केली तरी ती मध्यप्रदेशमध्ये भाजपाच्या आमदारांपेक्षा कमी होते. यावरुन लोकांच्या मनात कॉग्रेसच्याप्रती किती राग आहे याची कल्पना येते. निकाल लागल्यावर सोशल मिडीयावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या त्या पाहिल्या की कोणाच्याही चेहर्‍यावर हसू येत होते. समजा नरेंद्र मोदी यांचे नाव योग्य वेळी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले नसते तर आणि त्यांनी झंझावाती प्रचार केला नसता तर भाजपाला किती जागा मिळाल्या असत्या? याचा अर्थ असा नव्हे की जेथे भाजपाची सत्ता होती त्या मुख्यमंत्र्यांचा काहीही प्रभाव नाही. त्यांचा प्रभाव आहेच. परंतु त्याला मोदींची साथ मिळाली हे विसरुन कसे चालेल? बिहारमधील सभेपूर्वी बॉम्बस्फोटांची मालिका होऊन देखिल सभेची गर्दी जराही कमी झाली नाही हे कशाचे द्योतक आहे? जर मोदींचे विचार लोकांना ऐकायचे नसते तर त्यांनी मोदींच्या सभांना गर्दी केली असती का?
राजकीय सभांमध्ये आश्‍वासनांचा पाऊस पाडणे निराळे आणि प्रत्यक्ष योजना राबवून त्यावर नागरिकांशी संवाद साधणे वेगळे! या दोन भिन्न गोष्टी आहेत. मोदींनी गुजरातचा केलेला कायापालट त्यांचे विरोधक देखिल मान्य करतात. त्यामुळे भविष्यात मोदी पंतप्रधान झाले तर संपूर्ण देशाला ते एक प्रकारची शिस्त लावतील असा भाव मतदारांच्या मनात आहे. त्यामुळेच राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये भाजपाला स्वप्नातही वाटले नसेल इतके यश मिळाले आहे. मोदींचे पंतप्रधानपदाचे प्रतिस्पर्धी असलेले राहुल गांधी यांनी एखादे वाक्य उच्चारताच त्यावर धुरळा उडायला पाहिजे होता. तसा तो उडतो परंतु नकारात्मक पध्दतीने. या उलट मोदी इज न्यूज असेच समीकरण तयार झाले आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी मोदी यांना दहा वर्षाहून अधिक काळ तीव्र विरोध केला तीच प्रसारमाध्यमांचे पान आज मोदी यांच्याशिवाय हलत नाही. ही वस्तुस्थिती तर आपण मान्य करणार की नाही? मोदींनी एखादा मुद्दा मांडला की त्यावर प्रसारमाध्यमातून आठवडाभर चर्चा होतात. त्यामुळे त्यांना चर्चेसाठी खाद्य पुरविण्याचे काम मोदीच करतात असे म्हटले तर वावगे होणार नाही.
भाजपा विरोधकांनी निदान आता तरी साखर झोपेतून जागे व्हावे आणि सत्य परिस्थिती स्विकारावी. अमेरिकेच्या तज्ञांने निष्कर्ष मानायचे, राजकीय टिकाकारांचे म्हणणे ग्राह्य धरायचे? की येथील जनतेच्या मनाचा अंदाज घेत पावले टाकायची? याचा फैसला आता सत्ताधार्‍यांना करायचा आहे. शहामृग हा प्राणी बाहेर वादळ आले की वाळून तोंड खुपसून बसतो आणि वादळ गेले की तोंड वरती काढतो. तशी गत आज विरोधकांची झाली आहे. बाहेर मोदींचे वादळ सुरु असताना ते वाळूत तोंड खूुपसून बसले आहेत. परंतु त्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही. विरोधकांनी वाळून खुपसलेले तोंड बाहेर काढून जर सभोवार डोळसपणे नजर टाकावी आणि मग चार राज्यातील विधानसभा निवडणूकात मोदी फॅक्टर नसल्याचा निष्कर्ष काढला तर ते अधिक योग्य होईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें