मंगलवार, 31 दिसंबर 2013

घमंड नको!

रामलीला मैदानावर जनहितार्थ आंदोलने करणारे अरविंद केजरीवाल यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच ही घटना आहे. बहुधा त्यामुळेच त्यांची तुलना अनिल कपूर अभिनीत नायक या चित्रपटाशी करण्यात येते. केजरीवाल यांनी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर जे भाषण केले ते केवळ 'आप'च्या नेते आणि कार्यकर्त्यांनीच नव्हे तर सर्वच पक्षात कार्य करणार्‍यांसाठी मार्गदर्शक असेच आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घमंड येऊ देऊ नका असा प्रेमळ सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला. या घटनेला एक दिवस होत नाही तोपर्यत त्यांच्याच पक्षातील नेते कुमार विश्‍वास यांनी आत्मप्रौढी मिरवित दम असेल तर अमेठीतून निवडणुकीला उभे राहण्याचे आव्हान थेट भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच दिले आहे. यावर अजून तरी केजरीवाल यांनी प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही.
आम आदमी पक्षाने दिल्लीत जे यश मिळवून सरकार स्थापन केले आहे ते निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणाचाही पाठिंबा मागितला नसला तरी कॉग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. परंतु असे असले तरीही आपचे नेते कॉग्रेसवरच टिका करण्याचे धाडस करीत आहेत. यावरुन आपच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी नेत्यांना हाकलून लावायचे आहेे. यामध्ये खरे तर कॉग्रेसचीच गोची होणार आहे. कारण प्रथम पुढाकार घेऊन पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जर विनाकारण पाठिंबा काढला तर त्याचा तोटा कॉग्रेसलाच होईल यात शंका नाही. परंतु त्याचवेळी आपच्या नेत्यांनी केजरीवाल यांनी घालून दिलेली आचारसंहिता जोपासली पाहिजे.
आपल्याला लोकांची कामे करायची आहेत. हे कधीही विसरुन चालणार नाही. त्यामुळेच इतर राजकीय पक्षातील नेत्याप्रमाणे मनाला येईल तशी शेरेबाजी त्यांनी करणे कटाक्षाने टाळले पाहिेजे. कारण बाकीच्यांना केवळ राजकारण करायचे असते असाच सामान्यांचा समज आहे. परंतु आप पक्षाला समाजकारणाला महत्व द्यायचे असल्याने त्यांनी राजकारणातील आरोप प्रत्यरोपांच्या फैरी न झाडलेल्याच चांगल्या. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याची गर्जना करणार्‍या विश्‍वास यांनी आता मोदींना फुकटचा सल्ला दिला आहे. याची खरेच गरज होती का? असाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. कोण कोणाविरोधात लढणार हे ज्या त्या वेळी पाहिले जाईल. त्यामुळे आतापासून एकमेकांना इशारे देऊन मीच खरा प्रामाणिक असा आव आणण्यात अर्थ नाही.इतर राजकीय पक्ष आणि आप याचे वेगळेपण लोकांच्या नजरेत कायम भरले पाहिजे. तरच अल्पावधीत जरी सरकार पडले तरी पुढील निवडणूकीत आपला एकहाती सत्ता मिळण्याची चिन्हे असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे घमंड अर्थात गर्वाला मुठमातीच दिली पाहिजे. अन्यथा याचा फटका 'आप'ला पुढील निवडणूकीत हमखास बसेल यात शंका नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें