सोमवार, 3 मार्च 2014

सबका विनाश…

उत्तरप्रदेश येथे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नेहमीप्रमाणे दणदणीत सभा झाली. त्याअगोदर त्यांनी एका हिंदी दैनिकाला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी तिसर्‍या आघाडीची खिल्ली उडवली. तसेच सभेत यंदाच्या निवडणुकीत सबका अर्थात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉग्रेस यांचा विनाश अटख असल्याचे भविष्य वर्तविले आहे. निवडणुकीचे मैदान जवळच आहे. त्यामुळे खरेच सबका विनाश होतो का? ते लवकरच समजेल.
काही राजकारण्यांना जनमानसाची नस समजलेली असते. त्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे नरेंद्र मोदी यांचे आहे. लोकांच्या मनात काय चाललेले आहे? याचा अचूक अंदाज त्यांना येतो आणि त्यानुसारच ते सभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आपण नेहमीच पाहतो. गुजरात येथे झालेल्या गोध्रा दंगलीचे भांडवल विरोधी पक्षांकडून नेहमी  करण्यात येते. परंतु जे आरोप करतात त्यांच्या राजवटीत किती दंगली झाल्या आहेत हे देखील त्यांनी कधीतरी पाहिले पाहिजे. उदाहरणच घ्यायचे तर  समाजवादी पक्षाच्या राजवटीत अवघ्या एका वर्षात 150 च्या वर दंगली झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मुझफ्फरनगर दंगलीने दिलेल्या जखमा उत्तरप्रदेश विसरलेला नाही. तर बसपाने उत्तरप्रदेशात काय दिवे लावले ते जनतेने पाहिले आहे. कॉग्रेस विरोधी लाट असल्याने यंदा लोकांना परिवर्तन हवे आहे. साहजिकच गुजरात येथे विकास करुन दाखविलेल्या नरेंद्र मोदी यांची त्सुमानी आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. आतापर्यत मागील बारा वर्षाच्या कालावधीत मोंदींना पध्दतशीर त्रास देण्याचे अनेक उद्योग कॉग्रेस सरकारने केले परंंतु त्यात त्यांना यश आले नाही. गुजरात येथील जनतेने मोदींना सलग तीन वेळा प्रचंड बहुमत देऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान केले. हे विसरुन कसे चालेल? यंदा मोदी लाट आहे हे कोणीही मान्य करील.
कॉग्रेसने केलेल्या कामांच्या विविध जाहिराती सध्या वाहिन्यांवरुन सुरु आहेत. त्यामध्ये कॉग्रेस शासनाने बक्कळ पैसा खर्च केला आहेे. परंतु हाच पैसा जर खर्‍या अर्थाने विकासाच्या कामाकरिता वापरला असता तर ते योग्य झाले असते असे नागरिकांचे मत आहे. यासह कॉग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर ज्या लोकाभिमुख घोषणांचा सपाटा लावला आहे त्या पाहिल्या की मतांच्या राजकारणाशिवाय दुसरे काय दिसते. जनता आता तेवढी निश्‍चितच सुज्ञ झाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉग्रेस नेत्यांची मोदींच्या विरोधात ज्या प्रकारची भाषा वापरण्यास प्रारंभ केला आहे तो पाहिले की कॉग्रेसीजनांचा तोल सुटला असल्याचेच दिसते. विरोधकच बावचळलेले असल्यामुळे सबका विनाश होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें