सोमवार, 10 मार्च 2014

मनसे विरोध सेनेला महागात पडणार!

महायुतीत मनसेला स्थान असावे जेणेकरुन मतांची फाटाफूट होऊ नये आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात खासदार निवडून द्यावेत अशी भाजपाची इच्छा होती. त्याकरिता भाजपाच्या काही नेत्यांनी प्रयत्नही केले. परंतु याला सेनेने खोडा घातला. प्रसंगी भाजपाच्या नेत्यांवर पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कडक भाषेत टिकाही केली. त्यामुळे भाजपा नेते मनातून दुखावले गेले होते. गडकरी, तावडे, शेलार यांनी घेतलेली राज यांची भेटीत काय चर्चा झाली याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती. त्यावरील पडदा काही प्रमाणात काल मनसेच्या वर्धापनदिनी उठला आहे. राज यांनी जी पहिली यादी जाहीर केली त्यावर नजर टाकली असता त्यांचे टार्गेट शिवसेनाच असल्याचे दिसते. त्याचवेळी त्यांनी मोदींना पाठिंबा देऊन भाजपा च्या मनात मनसेबद्दल सहानुभूती निर्माण केली आहे.
मनसे लोकसभेला उतरणार म्हणजे मतांची फाटाफूट होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. यामुळे निश्‍चितच कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर बहुतांशी ठिकाणी मनसे दोन क्रमांवर असल्याचे दिसते. याचाच अर्थ युतीचे उमेदवार अवघ्या काही फरकानेच निवडून आले आहेत. तर काही ठिकाणी मनसे आणि युती यांचे उमेदवार पडले असून तेथे आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. मागील अनुभव लक्षात घेता यंदा तरी युती आणि मनसे हे दोन्ही राजकीय पक्ष विचारपूर्वक निर्णय घेतील असे वाटत होते. परंतु इतिहासावरुन कोणीच काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही.
जुने हेवे दावे विसरुन सेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी टाळीसाठी प्रथम हात पुढे केलेला होता. म्हणजे मनसे महायुतीत यावी अशी सुरवातीस शिवसेनेची भूमिका होती. मग नंतर असे काय घडले? की शिवसेनेला मनसे बरोबर युती नकोशी वाटायला लागली. आता मनसेेचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे शिवसेनेला विजय वाटतो तितका सोपा नाही. मनसेच्या पहिल्या यादीवर नजर टाकली असता लोकसभा निवडणुकीत मनसे आणि शिवसेना असाच सामना रंगणार असल्याचीच चिन्हे आहेत. याचा तोटा महायुतीलाच होणार अशीच चिन्हे आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें