सोमवार, 3 मार्च 2014

विज्ञान प्रसाराची चळवळ राबवूया…

विज्ञान हे सध्या आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे अंग झाले आहे. त्यामुळेच विज्ञानरुपी वरदान आपल्याला लाभले नसते तर आज आपले जीवन कसे असते? ही कल्पनाही करवत नाही. कदाचित आपण आजही कंदिलाच्या प्रकाशात चाचपडत जंगलातच मुक्काम केला असता. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत नानाविध विज्ञानरुपी उपकरणांशी आपली नाळ जोडली गेली आहे. टिव्ही, ङ्ग्रिज, मोबाईल, संगणक यासंह अनेक वस्तू आज चैन नव्हे तर गरजेच्या झाल्या आहेत. विज्ञान म्हणजे काय? असा प्रश्‍न विचारला तर अनेकजण गोंधळून जातात. परंतु साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर, आजूबाजूला घडणार्‍या घटनांना कोणते ना कोणते कारण हे असतेच. त्याचा शोध घेणे व त्याची उकल करणे थोडक्यात निरिक्षण व चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पध्दतशीर, तर्कसुसंगत माहिती म्हणजे विज्ञान असे आपल्याला म्हणता येईल. असे असले तरीही आज समाजात अद्यापी अंधश्रध्देचा पगडा असल्याचेच जाणवते. लोकांच्यात विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी अनेक महानपुरुषांनी प्रयत्न केले आहेत. हे खरे आहे की, प्रत्येकजण काही शास्त्रज्ञ होऊ शकणार नाही मात्र ज्या गोष्टीचे कारण आपल्याला सापडत नाही अशा गोष्टींना दैवी न मानता त्यामागील विज्ञानाची बाजू शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे एवढे तरी आपण करु शकतो ना!
28 फेब्रुवारी हा दिवस देशात 1987 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी हाच दिवस निवडण्यामागील कारण म्हणजे याच दिवशी 1928 साली जगप्रसिध्द शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन अर्थात सी.व्ही.रामन यांनी रामन इङ्गेक्ट हा वैशिष्टपूर्ण शोधनिबंध प्रसिध्द केला होता. तो पुढे ‘रामन इङ्गेक्ट’ म्हणून जगभर मान्यता पावला. या शोधासाठी रामन यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळाले. रामन हे नोबेल मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. पारदर्शी पदार्थातून एकरंगी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर काय होईल यावर संशोधन करीत असताना त्यांना मूळ एकरंगी प्रकाशाशिवाय इतर विविध कंपनसंख्या असणार्‍या रेषा वर्णपटलावर उमटलेल्या दिसल्या. यातूनच ‘पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाशाचे विकीरण होते हे त्यांनी सिध्द केले. यालाच ‘रामन इङ्गेक्ट’ असे म्हणतात.
भारताला वैज्ञानिक शास्त्रज्ञांची थोर परंपरा लाभली आहे. अगदी बाराव्या शतकातील भास्कराचार्य, आर्यभट्ट यांच्यापासून आधुनिक काळातील जगदीशचंद्र बोस, डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या, मेघनाद साहा, होमी जहांगीर भाभा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, विक्रम साराभाई,सतीश धवन, जयंत नारळीकर नावे तर किती सांगावीत. शास्त्रज्ञ आणि विज्ञाननिष्ठ नेते यांच्यामुळेच आज आपण विज्ञानाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. यांच्या बरोबरच परदेशी शास्त्रज्ञांने विज्ञानयुगातील योगदान दुर्लक्षित करताच येणार नाही. समाज विज्ञाननिष्ठ व्हावा यासाठीच आपले सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताला एकविसाव्या शतकात विज्ञानयुगात नेण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यादृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केला होता. आजघडीला राजीव गांधींचे स्वप्न बहुतांशी प्रमाणात सत्यात उतरल्याचे आपण पाहत आहोत. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी देखिल येथील विज्ञाननिष्ठ युवकपिढीवर विश्‍वास ठेवूनच भारताला 2020 सालापर्यत विकसित राष्ट्रांच्या पंगतीत बसविण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते निश्‍चित पूर्ण होईल असा विश्‍वास भारतीयांना आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे कट्टर विज्ञाननिष्ठ होते. ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ या लेखातून त्यांनी विज्ञानाची कास धरलेला युरोप आणि श्रृतीपुराणाची महती गात बसणारे भारतीय यांची वास्तवनिष्ठ तुलना केली आहे. सावरकर म्हणतात,‘ भारतास काळाच्या तडाख्यातून वाचवायचे असेल तर ज्या श्रृतिस्मृतिपुराणोक्ताच्या बेडीने कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकले आहेत ती तोडलीच पाहिजे. ती बेडी तोडणे सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. युरोप चार शतकापूर्वीपर्यंत धर्माच्या अपरिवर्तनीय सत्तेचा दास झालेला होता. आणि त्यापायी आपल्यासारखाच दुर्गतीस पोहचला होता. पण त्याने बायबलास दूर सारुन विज्ञानाची कास धरताच अप – टु – डेट बनला. युरोप गेल्या चारशे वर्षात आमच्यापुढे चार हजार वर्षे निघून गेला. तसे आपल्या भारतीय राष्ट्रासही होणे असेल तर, ‘पुरातनी’ युगाचा ग्रंथ मिटून, ही प्राचीन श्रृतिस्मृतिपुराणादि शासने गुंडाळून आणि केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात ठेवून आपण विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे.’
 विज्ञान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर थोर शास्त्रज्ञ आणि महान विज्ञानप्रेमी विचारवंत यांच्या विचारांचा जागर केलाच पाहिजे. परंतु तेवढेच करुन न थांबता आपणास काय करता येईल यावर देखिल विचार करुन तो कृतीत आणला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन हाच आधुनिक जीवनाचा पाया बनण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. अजूनही कित्येकजणांच्या मानेवर जात, धर्म, पंथ, कालबाह्य रुढी, अंधश्रध्दा यांचे जोखड आहे. त्यांना त्या जोखडातून मुक्त करुन विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीमधील एक घटक कसे बनविता येईल यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत. पालकांनीही मुलांना लहानपणापासून विज्ञानाची गोडी लावली पाहिजे. चला तर मग, विज्ञान दिनाच्या निमित्ताने केवळ एक दिवसापुरतेच उपक्रम साजरे करुन न थांबता सातत्याने विज्ञान प्रसाराची चळवळ राबवूया.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें