सोमवार, 13 जनवरी 2014

नकार पचवायला शिका!

सध्याचे युग हे संगणकाचे युग असले तरी ते धावपळीचे युग आहे. पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. साहजिकच मुलांनी काही मागायचा अवकाश त्यांची मागणी लगेच पुरी केली जाते. पण यामध्ये होते काय? तर मुलांची मागणी योग्य की अयोग्य याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येते. यामुळेच आजकालच्या मुलांकडे नकार पचवायची हिंम्मत नाही. साहजिकच आपल्या मनाविरुध्द काही झाले की लगेच वाट्टेल ते करण्याकडे मुलांचा कल असतो. याप्रकारामुळेच आज आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. परभणी येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने फेसबुक वापरण्यास पालकांनी बंदी घातल्याने आत्महत्या केली आहे. यासारख्या असंख्य घटना आज देशात घडत आहेत. यानिमित्ताने आपण कुठे चाललो आहोत ? हाच प्रश्‍न आज सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
 पूर्वीच्या काळी पालकांचे आपल्या पाल्यांकडे लक्ष असायचे. ते कुठे जातात, त्यांचे मित्र कोण आहेत, बाहेर काय दिवे लावतात याचा लेखाजोखा पालकांकडे असायचा. शाळेत देखिल शिक्षकांचा धाक असायचा. आज काय परिस्थिती आहे? शिक्षकांचा उल्लेख एकेरी करणारी अनेक विद्यार्थी आपल्या आजूबाजूला आहेत. कॉपी करु दिली नाही म्हणून शिक्षकांना मारहाण अशा घटनाही आपण वाचतो. आणि विसरुन जातो. पण घरी तरी काय वेगळी परिस्थिती असते. मॉडर्न कल्चरचे खुळ डोक्यात गेलेले काही पालक मुलांसमवेत दारु पितात. आणि मुलांना मॉडर्न बनवतात. काय करायची असली मॉडर्न मुले? फेसबुक वापरण्यास बंदी घातली म्हणून आत्महत्या करण्याचे एखाद्या विद्यार्थीनीचे धाडस होते कसे? म्हणजे पालकांनी काही उपदेशच करायचा नाही. जे मुले करतील त्याचाच पुरस्कार करायचा? अशीच सध्याच्या मुलांची मानसिकता होत चालली आहे.
आई आणि वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना वाढविलेले असते. त्यांच्या काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना मुठमाती देऊन जीवनातूनच एक्झिट घेताना मुलांना काहीच वाटत नाही. आपण या जगातून गेल्यानंतर आपल्या मागे आई – वडिल कसे जगतील ? याचा विचारही आजची पिढी करत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अशीच त्यांची मनोवृत्ती बनत चालली आहे. आणि ती निश्‍चित धोकादायक आहे. पालकांनीही सुरवातीपासूनच मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी जे मागितले ते त्यांच्यापुढे हजर करण्यापेक्षा त्यांना नकार पचवायला शिकले पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली होती. ही बाब धक्कादायक आहे. भारताचे आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीने फालतु कारणाने मृत्युशी मैत्री करण्यास प्रारंभ केला असेल तर भारताचे भवितव्य काय असेल याचा सर्वानीच विचार करण्याची वेळ आली आहे. एवढीच मृत्युला कवटाळण्याची हौस असेल तर देशासाठी तरी बलिदान द्या! एवढेच या भावी पिढीला सांगावेसे वाटते.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें