मंगलवार, 7 जनवरी 2014

'आप' बदलली?

भाजपा आणि कॉग्रेस पक्षाला दिल्लीत हादरा देणारी आप पार्टी बदलली आहे का? असा प्रश्‍न पडावा अशा काही घटना समोर येत आहेत. आप लोकांच्या पसंतीस उतरली ती आम आदमीची पार्टी म्हणून! परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन जर त्यांनी राजकारण केले तर ते पक्षाच्या दृष्टीने धोकादायक असणार आहे. सरकारी बंगला घेणार नसल्याचे मत केजरीवाल यांनी जाहिर केले होते. परंतु त्यांना आलिशान असा सरकारी बंगला देण्यात आला. त्यानंतर जेव्हा सोशल मिडीयावरुन त्यांचा निषेध करण्यात आला त्यानंतर जाग येऊन त्यांनी तो आलीशान बंगला नाकारला. हेच त्यांनी बंगला मिळाल्यावर लगेच जाहिर केले असते तर ते अधिक श्रेयस्कर झाले असते. जनतेच्या प्रश्‍नांवर लढणारा राजकीय पक्ष म्हणून आपची ओळख आहे. आणि ती तशीच राहायला हवी.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही संकल्पना आता केव्हाच इतिहासजमा झाली आहे. सध्या साधे राहण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. की वस्तुस्थिती आहे. ती कोणीच नाकारु शकत नाही. त्यामुळेच सध्या सोशल मिडीयावरुन आपवर टिकेचा भडीमार सुरु आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी व्यक्त केलेले विचार आणि सत्तेत आल्यानंतर केलेली वक्तव्ये यांची तुलना करण्यात येत आहे. स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत केजरीवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्याविरोधात आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे सांगितले होते. परंतु ज्यावेळी भाजपाचे डॉ. हर्षवर्धन यांनी जुना संदर्भ देऊन आता दिक्षीत यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवा असे आव्हान दिले. त्यावेळी केजरीवाल यांनी चक्क डॉ. हर्षवर्धन यांनाच शीला दिक्षीत यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे आणून देण्यास सांगितले. सत्तेत आल्यावर माणसांच्या विचारात इतके परिवर्तन झालेले जनतेने पाहिलेले आहे. परंतु ती अपेक्षा आपकडून नाही.
प्रथम आम्ही लाल दिव्याच्या गाड्या घेणार नसल्याचे सांगायचे आणि नंतर सरकारी गाड्या घ्यायच्या याला बनवाबनवी नाही तर काय म्हणतात? कॉग्रेसचा पाठिंबा आप ने मागितलेला नव्हता. कॉग्रेसने तो दिलेला आहे. आणि पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलेच तर त्याचा लाभ आप लाच होणार आहे ना? मग एवढे घाबरायचे कारण काय? जनहिताचे निर्णय घेताना त्यांनी कोणतेही दडपण घेता कामा नये. महत्वाचे म्हणजे आण्णा हजारेंच्या मंचावरुन त्यांनी जे विचार मांडले त्याचे ध्वनीचित्रीकरण झालेले आहे. त्यामुळे त्याला सुसंगतच विचार केजरीवाल यांनी मांडले पाहिजेत. आपचे वेगळेपण नजरेत उठून दिसले पाहिजे. नागरिकांच्या मनात अन्य राजकीय पक्षांपेक्षा आप पक्ष हटके आहे असे ठसले तरच भावी लोकसभा निवडणूकीत त्यांचा प्रभाव राहिल. राजकारणात जाऊन आप बदलली असा जनतेचा समज व्हायला काही घटनांमुळे चालना मिळत असून निदान यापुढील काळात तरी अशा घटना कशा टाळता येतील यादृष्टीने आपच्या नेत्यांनी पाऊले उचलावीत अशीच आम आदमीची अपेक्षा आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें