गुरुवार, 13 फ़रवरी 2014

टोलच्या मुद्दयावर विरोधकांची एकी का नाही?

नेहमीप्रमाणे शिवसेनेचा मुद्दा मनसेने सफाईने उचलला आणि त्यावर आंदोलनाचे रणशिंग फुंकले. काहींना ती पिपाणी वाटली, काहींना नुसतीच गर्जना वाटली तर काहींना नाटकाचा ड्रामा वाटला. परंतु मनसैनिकांनी कमी कालावधीकरीता आंदोलन करुन अपेक्षित ते यश मिळविले असल्याचे तरी प्रथमदर्शनी दिसत आहे. वास्तविक  कोल्हापूर टोलप्रश्‍नी आंदोलनात शिवसेनेने पुढाकार घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील टोलप्रश्‍न शिवसेना आता हातात घेणार आणि रान पेटवणार असे वाटत असतानाच अचानक मनसेने त्यात उडी घेतली. पुणे येथील भाषणात राज ठाकरे यांनी मुद्देसुद मुद्दे मांडून टोलचा पोलखोल केली. आणि कालच्या रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली. अन्यायी टोल हटलाच पाहिजे यावर जर एकमत होत असेल तर टोलविरोधी आंदोलनात सर्व विरोधी पक्ष का एकवटत नाहीत? हाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. प्रत्येक प्रश्‍नाकडेच राजकीय चष्म्यातून पहायचे बंद केले पाहिजे. निवडणुकांकडे पाहून दुसर्‍यांचे आंदोलन कसे फ्लॉप झाले याबाबत प्रसारमाध्यमांना बाईट देण्यापेक्षा समाजकारणाला महत्व दिले पाहिजे असेच सामान्यांचे मत आहे.
सत्ताधारी पक्ष हा टोलच्या बाजूने आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, भाजपा , आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांची महायुती झालेली आहे. मनसे स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार आहे. असे असले तरी वरील सर्व पक्ष हे विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे शासनाच्या विरोधात जर एखादे आंदोलन असेल तर त्यात केवळ ज्यांनी आंदोलन पुकारले आहे तोच पक्ष का सहभागी होतो? इतर पक्षांना त्या पक्षाबाबत अस्पृश्यता का वाटते? हे कळत नाही. ज्या पक्षाने आंदोलन पुकारले आहे त्याला त्याचा राजकीय लाभ होणार यात शंका नाही. परंतु असे असले तरीही इतर विरोधी पक्ष संबंधित आंदोलनात सहभागी झाले तर निश्‍चितपणे त्यांच्याबद्दलचा आदर वाढण्यास मदत होईल यात शंका नाही. परंतु राजकारण एक्के राजकारण हेच एकदा धोरण ठरल्यावर दुसरी अपेक्षाच नाही.
आता मनसेने टोलप्रश्‍नावर केवळ हमरस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आंदोलनाचा प्रभाव शहरात काही दिसला नाही हे खरे आहे. केवळ पाच तास आंदोलन केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी 10 वाजता चर्चेसाठी राज ठाकरे यांना बोलावले आहे. चर्चा फिस्कटली आणि सरकारने कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही असे गृहीत धरले तरी दि. 21 चा दिवस मनसेच्या हातात आहे. कारण त्या दिवशी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्टेप बाय स्टेप आंदोलन कसे करायचे याचे हे चांगले उदाहरण आहे. एकदमच रुद्रावतार धारण केला की समाजात चुकीचा संदेश जातो. परंतु समोरच्याला योग्य मुदत देऊन नंतर आक्रमकपणे आंदोलन केले तर त्या आंदोलनास सामान्यांचा पाठिंबा मिळतो हे सूत्र मनसेने धरले आहे. आज म्हणावा तसा तमाशा झाला नसला तरी नजीकच्या काही दिवसात महाराष्ट्रात तमाशा होणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सध्या तरी मनसेचे एकला चलो असेच धोरण आहे. आता याचा फटका महायुतीला किती प्रमाणात बसतो ते नजीकच्या काळातच समजेल.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें