‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार महाराष्ट्रातील ज्या संताने जनसमूहाला हाती टाळ – मृदुंग नव्हे तर झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले त्या गाडगेबाबांची 27 ङ्गेब्रुवारी रोजी जयंती. महाराष्ट्राच्या भूमीत एकापेक्षा एक महान रत्ने होऊन गेली, ज्यांनी समाजाला परिवर्तनाची नवी दिशा दिली. त्यातीलच एक महान रत्न म्हणजे गाडगेबाबा! गाडगेबाबा स्वत: साक्षर नव्हते तर अंगठेबहाद्दर होते. पण त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे अनेक साक्षर लोकांचे डोळे खाडकन् उघडले आणि स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने त्यांनीही परिसर स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतला. आणि अंर्तमनात जमलेली अंधविश्वासाची जळमटे देखील साङ्ग केली. माणूस सुशिक्षित असला म्हणजे सुसंस्कृत असेलच याची शाश्वती नसते. परंतु गाडगेबाबांनी अशिक्षित आणि सुशिक्षित दोन्ही समाजाला खर्या अर्थाने सुसंस्कृत बनविले. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो आणि घरातील कचरा रस्त्यावर ङ्गेकतो. परंतु समाज हे देखील आपले दुसरे घरच आहे नव्हे ते समाजमंदिर आहे. ते घाण करुन कसे बरे चालेल? हा अत्यंत मोलाचा विचार गाडगेबाबांनी समाजमनात स्वत:च्या कृतीने रुजविला.
गाडगेबांबांचे व्यक्तिमत्व आगळे – वेगळे असेच होते. सध्या प्रसिध्दीचा जमाना आहे. कणभर काम करायचे आणि मणभर प्रचार करायचा हा नवा ङ्गंडा अनेकांनी आपलासा केला आहे. परंतु गाडगेबाबांनी प्रसिध्दीपासून दूर राहून आयुष्यभर निरपेक्षपणे समाजागृतीचे मणभर काम केले आणि आदर्श समाजसुधारक कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण सर्वासमोर ठेवले. गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे 23 मार्च 1876 रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. दारुने कुंटुंबाचा विनाश कसा होतो हे त्यांनी बालपणीच अनुभवले होते. वडिलांच्या निधनानंतर ते आईबरोबर मामाकडे गेले. गाडगेबाबांचे मन अभ्यासात कधीच रमले नाही. त्यापेक्षा त्यांना रानात गुरे चारायला घेऊन जाण्यातच आनंद वाटायचा. समाजात सुरू असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा ङ्गेकून द्याव्यात असे त्यांना मनोमनी वाटायचे. परंतु त्याला कृतीची जोड मिळणे गरजेचे होते. स्वत:च्या मुलीच्या बारशाचेवेळी गाडगेबाबांनी एक धाडसी निर्णय घेतला. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता, त्यांनी परंपरागत रुढीप्रमाणे बारशाचेवेळी उपस्थितांना दारु आणि मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले. या उदाहरणातून गाडगेबाबांनी समाजासमोर एक आदर्शच घालून दिला. मी योग्य तेच करणार! हेच त्यांनी केवळ शब्दाने नव्हे तर कृतीने सांगितले. समाजात कोणीही व्यक्ती संकटात असली की गाडगेबाबा तेथे धावून जात आणि त्यांना मदतीचा हात देत. आयुष्याच्या अखेरपर्यत गाडगेबाबांनी समाजरुपी ईश्वराची पूजा करण्याचे व्रत अंगिकारले होते.
गाडगेबाबांचे मन संसारात ङ्गारसे रमले नाही. 1 ङ्गेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी संसाराचा त्याग करुन संन्यास स्वीकारला आणि समाजमनाची स्पंदने टिपण्यासाठी तीर्थाटनास प्रारंभ केला. गाडगेबाबा जेथे जात तेथील लोकांत मिसळत असत. त्यांची सुख – दु:खे समजून घेत. यातून त्यांना ग्रामीण आणि शहरी समाजावर मोठ्या प्रमाणावर अज्ञान, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी – परंपरा यांचाच पगडा असल्याचे निदर्शनास आले. तो दूर करण्यासाठी त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत अंगिकारले. गाडगेबाबांचा पोशाख म्हणजे हातात खराटा, अंगावर चिंध्या आणि डोक्यावर खापर. यामुळे त्यांना लोक ‘गोधडीमहाराज’असेही म्हणायचे. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असायचे त्यामुळे त्यांना ‘गाडगेबाबा’ हे नाव पडले.
गाडगेबाबा कधी मंदिरात गेले नाहीत मात्र सायंकाळच्या वेळी ते मंदिराबाहेर कीर्तन,प्रवचन करीत असत. साध्या सोप्या उदाहरणातून ते जनजागृती करीत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असे. गाडगेबाबा तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानत असत. कीर्तनातून ते, चोरी करु नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा धर्माच्या नावाखाली मुक्या प्राण्यांची हत्या करु नका, अस्पृश्यता पाळू नका असे जनतेला सांगत. एखाद्याने त्यांचे कीर्तन ऐकले तरी त्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तनाचे वारे घोंघावू लागायचे. कीर्तनातून गाडगेबाबा उपस्थितांशी संवाद साधायचे. आपणास आश्चर्य वाटेल पण गाडगेबाबांचे कीर्तन ऐकायला डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आचार्य अत्रे हे मान्यवर श्रोत्यात बसत असत. डॉ. बाबासाहेबांनी स्वबांधवांच्या अन्यायनिवारणार्थ धर्मांतर करण्यापूर्वी गाडगेबाबांचा सल्ला घेतला होता. ‘गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला’ हे त्यांचे आवडते भजन. त्यांचे कीर्तन कसे असायचे माहितेय? गाडगेबाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.‘
गाडगेबाबा स्वत: शिकलेले नव्हते तरीही त्यांनी निरक्षर समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. लोकांच्या ह्रदयात समाजकार्याची मशाल प्रज्वलित केली. भुकेलेल्यांना अन्न मिळण्यासाठी अन्नछत्रे उभारली. गरीब मुलांना शिक्षण देेण्यासाठी शाळा चालविल्या, महत्त्वाच्या शहरात धर्मशाळा उभारुन अनेकांना निवारा उपलब्ध करुन दिला. रस्ते साङ्ग करुन समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एक ना दोन! गाडगेबाबांच्या उपदेशास अनुसरुन आपण आपल्या जीवनात काही समाजोपयोगी गोष्टीचे पालन जरी आपण प्रत्येकाने केले तरी सामाजिक परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें