स्वातंत्र्यपूर्वकाळात स्त्रियांवर समाजव्यवस्थेने अनेक बंधने लादलेली होती. कित्येकजणींनी त्या बंधनातच राहणे पसंत केले तर काही स्त्रियांनी मात्र ‘ती’ बंधने झुगारली आणि विविध क्षेत्ररुपी विस्तीर्ण अशा अवकाशात उत्तुंग भरारी घेतली. कालांतराने अन्य स्त्रियांनी त्यांचेच अनुकरण केले. स्त्रियांनी कोणतेही शिक्षण न घेता केवळ ‘चूल आणि मूल’ यातच रममाण व्हावे अशी सर्वसाधारण समाजमनाची धारणा असलेल्या काळात पुण्यातील एका धाडसी स्त्रीने पतीच्या मदतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जेव्हा थेट परदेशवारी केली तेव्हा त्या दांपत्यावर काय भयंकर परिस्थिती ओढवली असेल याची नुसती कल्पना तरी करुन बघा! मनात जिद्द आणि आत्मविश्वास असला की येणारे सर्व अडथळे सहजी पार करता येतात हेच खरे! भारतातील पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी अर्थात डॉक्टर असे नामाभिधान मिळविणार्या त्या धाडसी स्त्रीचे नाव म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी!
आनंदीबाई यांचा जन्म पुण्यात 31 मार्च 1865 रोजी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती. त्या प्रथेस अनुसरून वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आनंदीबाईंचा विवाह तिच्याहून अकरा वर्षांनी मोठ्या असणार्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव कल्याण येथे पोस्ट ऑङ्गिसात कारकून म्हणून कार्यरत होते. त्याकाळी रावबहाद्दुर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांची ‘प्रभाकर’ नावाच्या साप्ताहिकात प्रसिध्द होणारी सुधारकी विचारांची बहुचर्चित ‘शतपत्रे’ गोपाळराव आवडीने वाचत असत. कळत नकळत त्यातील विचारांचा पगडा गोपाळरावांवर बसण्यास प्रारंभ झाला होता. साहजिकच समाजाचा विरोध झुगारुन गोपाळरावांनी आनंदीबाईंना इंग्रजी शिकविण्यास प्रारंभ केला आणि तो तडीस नेला.
दरम्यानच्या काळात आनंदीबाईनी वयाच्या चौदाव्या वर्षी एका मुलास जन्म दिला परंतु वैद्यकीय सुविधेअभावी अवघ्या दहा दिवसातच त्याचा मृत्यू झाला. याचा ङ्गार मोठा मानसिक आघात आनंदीबाई यांच्यावर झाला. यामुळे खचून न जाता आनंदीबाईंनी कितीही कष्ट पडले तरी शिकून डॉक्टर होण्याचा निश्चय केला. यात त्यांचा, ‘भविष्यात वैद्यकीय सेवेअभावी अन्य स्त्रिया पुत्रप्रेमाला पारख्या होऊ नयेत.’ हाच हेतू होता. आता, वैद्यकीय शिक्षण घ्यायचे म्हणजे परदेशवारी आली! साहजिकच समाजविरोध आणि पैशाचा प्रश्नही आलाच. परंतु इच्छा असली की मार्ग निघतो असे म्हणतात. त्याचप्रमाणे जोशी दांपत्य करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले आणि अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीने 1883 साली वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आनंदीबाईंना अमेरिकेतील ‘वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑङ्ग पेन्सिल्व्हानिया’ या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कमी वयात प्रचंड दगदग झाल्याने त्याचा ताण आनंदीबाईंना झेपला नाही. त्यांची प्रकृती ढासळू लागली. अशा स्थितीतही त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि 11 मार्च 1886 रोजी त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. त्यांना एम.डी.ही पदवी मिळाली. आनंदीबाईंनी महाविद्यालयात जो प्रबंध सादर केला त्याचे नाव होते,‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र’. डॉक्टर ही पदवी मिळाल्यानंतर व्हिक्टोरिया राणीनेही त्यांचे खास अभिनंदन केले होते. अमेरिकेतील महाविद्यालयात झालेल्या पदवीदान समारंभास भारतातून स्वत: गोपाळराव आणि समाजसेविका पंडिता रमाबाई रानडे या उपस्थित होत्या.
आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे चांगले स्वागत झाले. परंतु अमेरिकेतून परतत असतानाच त्यांना क्षयरोगाची बाधा झाली. बोटीवर कोणत्याही गोर्या वैद्यकीय अधिकार्याने आनंदीबाईंवर उपचार केले नाहीत कारण काय तर म्हणे, आनंदीबाई या गौरवर्णीय नाहीत! आणि भारतात परतल्यावर येथील वैद्यकीय अधिकार्यांनी देखील महिला डॉक्टरवर उपचार करण्यास नकार दिला. क्षयरोगाकडे दुर्लक्ष करुन त्यांनी कोल्हापूर येथील अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात महिला कक्ष प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतला. दुर्दैवाने आजार बळावत गेला आणि 26 ङ्गेब्रुवारी 1888 रोजी पुणे येथे त्यांना मृत्यूने गाठले. अवघे बावीस वर्षे आयुष्य मिळून देखील त्यांनी खूप मोठे कार्य केले परंतु त्याचे ‘महत्त्व’ त्याकाळातील अनेकांना कळलेच नाही.
स्वत: डॉक्टर होऊनही कोणावरही उपचार करण्याचे भाग्य आनंदीबाईंना मिळाले नाही यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आपल्यापैकी कितीजणांना आनंदीबाईंचा परिचय आहे माहित नाही. पण अमेरिकेतील जनतेने मात्र आनंदीबाईंची दखल घेतली. तेथील नागरिक असलेल्या कार्पेटर नावाच्या इसमाने त्यांच्या कुटुंबाच्या स्मशानात आनंदीबाईंचे प्रतिकात्मक थडगे बांधले आणि त्यावर,‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या.परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळविणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरुन त्यांच्या स्मृतींचेच अनोख्या पध्दतीने जतन केले. स्त्रियांचे आरोग्य हा कुटुंबाचा मौल्यवान ठेवा असल्याचे म्हणतात. बहुधा हे लक्षात घेऊनच आनंदीबाईंच्या स्मृतीदिनी म्हणजेच 26 ङ्गेब्रुवारी हा दिवस शासनातर्ङ्गे राष्ट्रीय महिला आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज देखील स्त्रियांपुढे आरोग्य विषयीच्या विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी स्त्रियांमध्ये आणि समाजात देखील जनजागृतीचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निश्चय आपण सर्वांनीच करुया
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें