काही वर्षापूर्वी अनिल कपूर आणि अमरीशपुरी अभिनीत नायक नावाचा चित्रपट प्रचंड गाजला होता. एक दिवस मुख्यमंत्री होऊनही अनिल कपूर जे जनहिताचे धडाधड निर्णय घेतो ते प्रेक्षकांना आवडले होते. त्यामुळेच तिकीटबारीवर हा चित्रपट यशस्वी ठरला. सध्या अरविंद केजरीवाल यांनीही अनपेक्षितपणे सत्ता संपादन करुन विश्वासदर्शक ठराव जिंकून जे जनहिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. तो निश्चितच अभिनंदनीय आहे. बहुधा यामुळेच अनिल कपूरला याच विषयावर चित्रपट काढून आपण पुन्हा एकदा चांगला गल्ला जमवू शकू असा विश्वास निर्माण झाला आहे. आणि त्यांनी नायक 2 या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट काढताना अनिल कपूर यांनी घाई करु नये असेच वाटते. कारण आता आपने सत्ताभार घेऊन काही दिवसच झाले आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जेणेकरुन नायक 2 मध्ये या सर्व घटना फिल्मी स्टाईलने तपशीलाने येतील.
आतापर्यत चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिला भाग जेवढा यशस्वी होतो तेवढा दुसरा भाग यशस्वी होताना दिसत नाही. अर्थातच याला काही अपवाद आहेत. याचाही विचार अनिल कपूर यांनी केलेला असेल. पटापट जनहिताचे निर्णय जाहीर करणे आणि लोकांची सहानुभूती मिळविणे याला काही कौशल्य लागत नाही. परंतु त्यांची कार्यवाही करताना निर्णय घेतलेल्यांची खरी कसोटी लागते. आणि तेथेच खरा धोका असतो. आता देखिल सोशल मिडीयावर केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तुलना होते आहे. दोघांनी घेतलेले जनहिताचे निर्णय असले तरी पर्रीकर यांनी त्यांवर कार्यवाही करुन बरेच दिवस झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनीही जे निर्णय घेतले आहेत ते विचारपूर्वकच घेतले असणार यात शंका नाही. परंतु त्यांचा टेकू हा कॉग्रेस पक्ष आहे. त्यामुळे कायम अस्थिरतेचे ढग त्यांच्या डोक्यावर फिरत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करुन आप चे सत्ताधारी त्यांनी जाहीरनाम्यात लिहिलेले निर्णय घेत आहेत हे निश्चितच धाडसाचे आहे.
साहजिकच अनिल कपूर यांनी नायक 2 साठी वेळ द्यावा. गडबडीत निर्णय घेऊन चित्रपट काढण्याची घाई करु नये असेच चित्रपट रसिकांचे मत आहे. अरविंद केजरीवाल या नव्या नायकाची कार्यपध्दती, त्यांना लोकांकडून मिळणारा प्रतिसाद, आपमधीलच काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे पक्षाची मलीन होणारी प्रतिमा असे विविध मुद्दे यामध्ये चित्रित करता येतील. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनलेला अनिल कपूर चित्रपटाच्या अखेरीस राजकारण खेळतोच. आणि त्याचा त्याला पश्चात्तापही होतो परंतु राजकारणामध्ये आल्यावर राजकारण हे खेळावेच लागते. परंतु ते चांगल्यासाठी खेळले तर त्यात गैर नाही असे त्याला अखेरीस परेश रावल सांगतो असे चित्रपटाच्या अखेरीस दाखविण्यात आले आहे. वास्तवात आप कोणते राजकारण खेळतो? त्यात ते यशस्वी होतात का? याचा लेखाजोखाही अनिल कपूर यांना नायक 2 चित्रपटात घेण्यात येईल. त्यामुळे अनिल कपूर यांच्या नायक 2 ची सर्वानाच प्रतिक्षा आहे. परंतु काही वर्षानंतर!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें