इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झेर्वेशन ऑफ नेचर अर्थात आययुसीएन या संस्थेच्या वतीने नुकताच एक अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार वाढत्या शहरीकरणामुळे भारतातील पंधरा पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्वत:पुरताच विचार करणार्या मनुष्यामुळे या पक्ष्यांची जमातच नष्ट होण्याची भिती संघटनेने व्यक्त करुन देखिल याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे तो ही बातमी वाचेल आणि विसरुन जाईल. असे का होते? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्या सुखासाठी आपण निसर्गचक्रात सहभागी असणार्या पक्ष्यांकडे दुर्लक्ष करतोच कसे? परंतु चलता है यार! असे यावर अनेकांचे उत्तर असेल हे वेगळे सांगायलाच नको!
आपल्याकडील चिमण्या गायब होऊन आता बरीच वषर्र झाली. त्याचे कुणाला सोयरसुतक आहे का? आजकालच्या पिढीने चिऊ काऊची गोष्ट ही ऐकली नाही. आणि प्रत्यक्षही कधी त्या पाहिलेल्या नाहीत. पूर्वी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही चिमण्या – कावळे दिसायचे. आता केवळ पुस्तकातच त्यांची चित्रे पहावयास मिळतात. मानवाने स्वत:च्या निवासासाठी पशु- पक्ष्यांची निवासस्थान असलेले जंगलच नष्ट करण्याचा विडा उचल्यावर दुसरे काय होणार? आपल्याला सुखासमाधानात रहायला पाहिजे म्हणून दुसर्यांचे काहीही झाले तरी चालेल ही वृत्ती सध्या वाढत चालली आहे. याचा प्रत्यय आपल्याला रोजच्या जीवनातही येतो. बेसुमार जंगलतोडीमुळे पर्जन्यमानाचे वेळापत्रकच बदलून गेले आहे. जंगलेच नसल्याने जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. तसेच ढगाला रोखण्यासाठी झाडेच अस्तित्वात नाहीत. याचे मानवाला काहीच वाटत नाही. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्याकरिता कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी वाढत्या लोकसंख्येला राहण्याकरीता जागा नाही. मग काय करायचे? तर बिनधास्तपणे जंगले तोडून तेथे अतिक्रमण करायचे.
हिंसक प्राणी नागरी वस्तीत येऊन निदान अतिक्रमण केलेल्या मानवावर हल्ला तरी करु शकतात. पण त्यांचाही शेवट हा बंदूकीच्या गोळीवरच लिहिलेला असतो. पक्षी तर काय बिचारे! ज्या घरांवर घरटी बांधतात ती झाडेच तोडली गेल्यावर एक तर दुसर्या जंगलाचा आसरा घ्यायचा नाहीतर कालांतराने नष्ट व्हायचे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतात. आता देखिल ज्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, त्यामध्ये रानपिंगळला, गिधाड, पाणमोर, माळढोक, पांढर्या चोचीचा बगळा आदिंचा समावेश आहे. आज गिधाड तर जवळजवळ नामषेश झाल्यातच जमा आहे. याचे कोणतेही सोयरसुतक कित्येकांना नसते. म्हणजे एकीकडे पशु-पक्ष्यांची घरे बेधडकपणे दिवसा – ढवळ्या उद्ध्वस्त करायची आणि एवढे होऊनही मनुष्य बिनधास्तपणे उजळमाथ्याने फिरायला मोकळा. पशु- पक्षी कोणत्याही न्यायालयात दाद मागू शकत नाहीत म्हणून वाट्टेल तसे वागायचा परवाना मनुष्याला मिळाला आहे का? असाच प्रश्न मनात उपस्थित होतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें