'मनसैनिकांनी
कोणत्याही टोल नाक्यावर टोल भरायचा नाही. समजा जर कोणी तुम्हाला अडविले तर त्याला
तुडवा' असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटला.
जिकडून तिकडून खळळ् फट्याक् चेच आवाज येऊ लागले. मनसैनिकांनी अटकेची पर्वा न करता 'राज'ज्ञेचे पालन करणे कर्तव्य मानले आणि टोलनाक्यावर राडा केला. टोलधाड रोखणे
गरजेचे आहे. याबाबत दुमत असण्याचेच कारण नाही. कारण सामान्य माणूस जो टोल देतो
त्याप्रमाणात त्याला टोल वसुली करणार्या कंत्राटदारांकडून काहीही सुविधा मिळत
नाहीत. रस्त्यात खाचखळगे असतातच! हमरस्त्याला कोठेही स्वच्छतागृह बांधलेले नसते.
एक ना दोन!! मग सामान्यांनी दिलेला घामाचा पैसा कोठे गडप होतो? हेच कळत नाही.
त्यामुळेच मनसैनिकांनी केलेल्या टोलफोडीचे समर्थन खाजगीत का होईना पण सामान्य
माणूस करतो आहे.
टोलवसुली
ही युतीच्या काळात सुरु झाली असल्याचा कांगावा आता कॉग्रेस- राष्ट्रवादीकडून सुरु
आहे. ते सत्यच आहे. परंतु युतीचे शासन जावून आता दशक लोटले आहे. तरीही टोलवसुलीच
सुरु आहे. कित्येक टोलनाक्यांची मुदत संपली असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु
त्याकडे दुर्लक्ष करुन खुलेआम टोलवसुली सुरुच आहे. महत्वाचे म्हणजे टोल देऊनही
रस्त्यामध्ये जर खड्ड्यांचेच साम्राज्य असेल तर नागरिक चिडणारच. परंतु सामान्य
माणूस हा तोडफोडी करीत फिरत नाही. शक्यतो शांततेत प्रश्न सुटण्याकडेच त्याचा कल
असतो. याच्या उलट राजकीय कार्यकर्त्यांचे आहे. जोपर्यत राडे होत नाहीत तोपर्यत
त्यांना स्वस्थ झोपच येत नाही. यात त्यांचीही काही चुक आहे असे समजण्याचे कारण
नाही. कारण एखादे प्रकरण न्यायालयात गेले की त्याचा निकाल किती दिवसात लावावा
याबाबत आपल्याकडे काहीच मर्यादा नाही. दामिनी चित्रपटातील सनी देओल
म्हणल्याप्रमाणे आपल्याकडे केवळ तारीख पे तारीख असेच चित्र असते.
जर
न्यायालयात जाऊन देखिल आपल्याला न्याय मिळत नाही असे सार्वत्रिक चित्र असेल तर
एखादा नेता जेव्हा तोडफोडीचे आदेश देतो त्याला त्याचे कार्यकर्ते समर्थन देतात.
राज ठाकरे यांनी आडवे आलेल्यांना तुडविण्याचे आदेश दिल्यावर याबाबत जनतेची भूमिका
काय? याचा अंदाज झी 24 तास या मराठी न्यूज चॅनेलने घेतला. त्यामध्ये 73 टक्के
लोकांनी मनसेची तुडवातुडवीची भूमिका योग्य असल्याचे मत नोंदविले आहे. सध्या
एसएमएसचा जमाना आहे. प्रामुख्याने दिल्लीत सर्व्हे शिवाय बोलून चालत नाही.
त्यामुळेच येथे मुद्दामहून महाराष्ट्रात घेतलेल्या सर्व्हेचा संदर्भ दिला.
भविष्यात राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल होईल. आणि
त्यांना कदाचित अटकही होईल. परंतु याप्रसंगातही राज ठाकरे हेच हिरो ठरतील.
सामान्य
माणूस जे डोळ्यांनी बघतो परंतु आपल्या भावना नाइलाजाने दाबून ठेवतो त्या
माणसांच्या मनातील भावनांना राज ठाकरे यांनी फक्त वाट मोकळी करुन दिली एवढेच.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत टोल रद्द होणार नाही अशी
भूमिका घेतली आहे. परंतु अशी भूमिका घेताना जे टोलचालक टोल घेऊनही रस्त्याच्या उत्तमपणाकडे दुर्लक्ष करतात तसेच
नागरिकांना सुविधा देत नाहीत त्यांच्यावर देखिल कायद्याचा बडगा उगारण्यात येईल
असेही कणखरपणे त्यांनी सांगितले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते.
नागरिकांकडून फुकटचे पैसे वसुल करुन जर काही राजकारण्यांची घरे भरणार असतील आणि
रस्त्यांच्या दर्जा खराब मिळणार असेल तर भविष्यात आणखी एखादा राजकीय पक्ष
तुडवातुडवीची भाषा करुन टोलनाके फोडू शकतो याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें