रविवार, 12 जनवरी 2014

मोदी ‘राज’ . . .

काही काही माणसांचे नशीब प्रसिध्दीच्या बाबतीत  बलवत्तर असते. कारण या ना त्या कारणाने त्यांना सतत प्रसारमाध्यमांच्यात बॅनर न्यूज म्हणून झळकायचे भाग्य मिळते. त्यातीलच दोन नावे म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी! आता राज ठाकरे यांनी राजू शेट्टी महायुतीत सहभागी झाल्याच्या नंतर महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेेचे बाण सोडले आहेत. मोदी यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दयावा आणि नंतरच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रचार करावा तसेच मोदी यांनी केवळ एका राज्यापुरता मर्यादित विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करावा असा सल्ला दिला दिला आहे. राज ठाकरे हे नेहमी अचूक टायमिंग साधूनच एखादे स्टेटमेंट असे करतात की संपूर्ण प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते. ही वेळ देखिल त्याला अपवाद नाही.
काही वर्षापूर्वी राज ठाकरे हे गुजरातला जाऊन तेथील कामकाजाची पाहणी करुन आले होते. त्यानंतर त्यांनी केलेली मोदी स्तुती अजून कोणाच्याच विस्मरणात गेलेली नाही. ज्यावेळी ती स्तुती केली त्यावेळी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर होत्या. आणि भाजपा – सेना युतीच्या विरोधात मनसे दंड थोपटून मैदानात होती. त्यामुळे मोदी स्तुतीमुळे गुजराती मते आपल्याकडे वळतील असे व्यावहारीक गणित त्यामागे  असण्याची  शक्यता नाकारता येत नाही. परंतु मुंबई मनपा सेना – भाजपाच्या ताब्यात गेली आणि मनपा जिंकण्याचे मनसेचे स्वप्न भंगले. त्यामुळे मोदी स्तुती करुन गुजराती मते आपल्याकडे वळत नसल्याचे राज ठाकरे यांच्या लक्षात आले असणार. त्यामुळे आता मोदी टिका करुन अन्य मते मनसेकडे वळतील का? याची चाचपणी करण्याचा त्यांचा होरा असू शकतो. दुसरा महत्वाची बाब म्हणजे आता होणारी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत उमेदवार निवडून आणणे आता मनसेला कठीण आहे. कारण देशभर आलेली मोदी लाट आणि आपचा राजकीय पटलावर झालेला उदय! या दोन्ही बाबी दुर्लक्षित करुन चालणार नाहीत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर शिवसेना संपेल असा काहींचा मनसुबा होता. परंतु तो धुळीस मिळाला आहे. आणि उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व कणखरपणे समोर येत आहे. महायुतीत रामदास आठवले आणि आता खा. राजू शेट्टी सहभागी झाल्याने मनसेपुढे आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे. आतापर्यत मनसेला युतीत घेण्याशिवाय पर्याय नसल्याचीच चर्चा होती. परंतु ती चर्चा आता थांबली आहे. आणि महायुतीत चार शिलेदारच असतील हे स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मोदींवर टिका केली आहे. वास्तविक आपण जर मोदींची भाषणे लक्षपूर्वक ऐकली तर त्यातून आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की, मोदी हे वारंवार गुजरातचे उदाहरण देतात. कारण तेथे त्यांनी प्रत्यक्ष काम केलेले आहे. साहजिकच आश्‍वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष केलेले कामाचे दाखले कोण देत असेल तर त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. कॉग्रेसने देखिल काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे मत व्यक्त केले होते. आता राज ठाकरे यांनी कॉग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवत मोदी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दयावा अशी मागणी केली आहे. यावर भाजपाचे एकनाथ खडसे यांनी राज ठाकरे यांचा टीआरपी कमी झाल्याने त्यांनी मोदी टिका केली असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक राज ठाकरे यांचा टीआरपी हा कमी होण्यातील नाही. हे महाराष्ट्रात वारंवार झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अचूक टायमिंग साधून राज यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला असला तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचेच नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला होईल हे ज्यावेळी मतदान होईल तेव्हाच समजेल. तोपर्यत अजून बराच आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडणार आहे हे नक्की!

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें