शुक्रवार, 17 जनवरी 2014

बाप रे बाप …

सध्या महाराष्ट्रात बाप हा विषय चर्चेत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपचे आम्ही बाप आहोत असे म्हटले तर रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आम्ही बापांचे बाप आहोत असे म्हणून धमाल उडवून दिली आहे. अजून निवडणुकांसाठी काही महिन्यांचा अवकाश असतानाच राजकीय रंगमंचावर बापाची एन्ट्री झाली आहे. शाब्दीक बाण ऐकायला चांगले वाटत असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीच्या रणांगणात कोणाचा बाप कोण आहे? हे समजणार असून बाकीच्यावर बाप रे बाप म्हणायची पाळी येणार आहे.
आजकाल आपचे वारे जोरात आहे. जो तो उठतो आणि आपमध्ये प्रवेश करतो. परंतु तो देखिल एक राजकीय पक्षच आहे हे विसरुन कसे चालेल? बहुधा त्यामुळेच निवडणुकी अगोदर आपच्या नेत्यांनी केलेल्या घोषणा सत्तेत आल्यावर बदलत चालल्या आहेत. केजरीवाल म्हणजे देव माणूस त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु त्याला आता तडे जाऊ लागले असल्याचेच चित्र आहे. परवा त्यांनी मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा आवर्जुन दिल्या. परंतु मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा हिंदूना द्यायला ते विसरले. असे व्हायचेच. कारण लांगुलचालनाचा रोग बहुधा त्यांनाही जडलेला आहे. आणि आता खुद्द त्यांच्या पक्षातच बंडाची लागण झाली आहे. कालपरवा पर्यत केजरीवालांना आदर्श मानणारे आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी केजरीवालांवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. याबाबत केजरीवाल यांनी नेहमीप्रमाणे हात झटकले असून बिन्नी यांचा हेतू मला माहित नसल्याचे सांगितले आहेत. दिल्लीत आपमध्येच भांड्याला भांडे लागायला सुरवात झाली असली तरी महाराष्ट्रात मात्र आपचे भय राजकीय पक्षांना असल्याचे दिसते आहे.
त्यामुळेच मनसेने महाराष्ट्रात आपण आपचे बाप असल्याचे सांगितले आहे. परंतु हे वक्तव्य काहींना झोंबले आणि आठवले यांनी आम्ही बापांचे बाप असल्याचे सांगितले आहे. कॉग्रेस राष्ट्रवादी सपाटून मार खाणार असल्याचा निष्कर्ष नुकताच एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मोदी लाट आली असल्याची चर्चा जोरात आहे. महायुतीचे वारे वाहत आहे. मनसेची एकला चलो रे ची भूमिका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षानेच काही वाट्टेल ते होवो परंतु जिंकायचेच असेच धोरण आखले आहे. परंतु प्रत्यक्षात कोण वरचढ ठरणार हे निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच ठरणार आहे. तोपर्यत मतदारांचे मनोरंजन करण्यास राजकीय पक्षांचे नेते कोणतीच कसूर ठेवणार नाहीत याची खात्री खुद्द मतदारानांच आहे. मतदानानंतर बाप रे बाप म्हणायची पाळी कोणावर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें