सोमवार, 27 जनवरी 2014

तर भविष्यात हिंदू लांगुलचालनास प्रारंभ…

एका विशिष्ठ समाजाचे लांगुलचालन सुरु झाले की हमखास समजावे की निवडणुकांचा मौसम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वास्तविक सेक्युलर प्रणाली आपण घटनेच्या माध्यमातून स्विकारली असताना मतांसाठी समाजातील एका पंथाचे लांगुलचालन करणे योग्य आहे का? परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्हीही त्यातच सामील असल्याने याविरोधात आवाज उठवायचा कोणी? असाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे. स्पष्टच बोलायचे तर बहुतांशी राजकीय पक्ष निवडणुकीत हिंदूची मते गृहीत धरतात तर मुस्लिमांची मते पाहिजे असल्यास त्यांचे कोणत्याही थराला जाऊन लांगुलचालन करणे सुरु ठेवतात. परंतु याला कोठेतरी ब्रेक बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मतांची ताकदच फक्त राजकीय पक्षांना कळते. त्यांना दुसरी भाषा समजत नाही. हे आता बहुसंख्यांकाच्या लक्षात येऊ लागले आहे. जर हिंदुनी व्होट बँकेचे भय राजकीय पक्षांना दाखविले तर त्यांचेही लांगुलचालनास प्रारंभ होईल.
देशाच्या साधनसंपत्तीवर प्रथम हक्क हा मुस्लिमांचा आहे. हे पंतप्रधानांचे विधान असू दे किंवा या देशाचे पंतप्रधान हे मुस्लिमच ठरवतात हे मणिशंकर अय्यर यांनी केलेले मतप्रदर्शन असो. यातून फक्त आणि फक्त व्होट बँकेचेच राजकारणच दिसते. काय गरज आहे असे करण्याची? तुमचे कार्य उत्तम असेल तर नागरिक तुम्हाला भरघोस मतांनी हमखास निवडून देतील ना? परंतु पाच वर्षे केवळ खुर्च्या उबविण्यापलिकडे दुसरे काही केलेले नसल्यावर एकगठ्ठा मतांची हाव झाल्यास नवल  ते काय ? या देशातील सर्वच नागरिकांना समान तत्व लागू करण्यास काय हरकत आहे? आणि दुर्दे:व म्हणजे या देशात बहुसंख्येने असून जाती जातीत विभागला गेल्याने हिंदूना ही बाब लक्षात येत नाही. कोणत्याही राजकीय पक्षांच्या कारभाराकडे नजर टाकली तर सर्वानाच लांगुलचालनाचा भस्म्या रोग झाला असल्याचे दिसून येते. यावर त्वरित इलाज करणे गरजेचे आहे. मध्यंतरी दोनच दिवसापूर्वी आणखी एका बातमीने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले होते. ती बातमी होती राजस्थान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर! पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या 85 हजार पाकिस्तानी हिंदूनी त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या राजकारण्यांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे. कोणत्याच राजकीय पक्षाने विस्थापित झालेल्या या नागरिकांसाठी कोणतेच ठोस धोरण अवलंबिलेे नसल्यामुळे तेथील सर्वानीच नकारात्मक मतदान वापरण्याचे ठरविले आहे. जर खरोखरच 80 हजार जरी विस्थापित जनता बाहेर पडली तरीही राज्यकर्त्यांना हादरा बसू शकतो.
जर राज्यकर्त्यांकडून विशिष्ठ समाजाचे लांगुलचालन होत असेल तर इतर समाजातीलल लोकांच्या मनात संघटित शक्तीच्या बळावर आपणही आमच्या मागण्या पदरात पाडून का घेऊ नयेत असा व्यावहारिक विचार होऊ शकतो. आणि मग सर्वच धर्म आणि पंथातले मतदार निवडणुकींवर डोळा ठेवून वाट्टेल त्या मागण्या करु शकतात. हे निश्‍चितच धोकादायक आहे. कारण राजकीय पक्षांना फक्त मतांशी कर्तव्य असते. त्यांना समोरच्यांच्या मागण्या योग्य कि अयोग्य याचे जराही तारतम्य नसते. आपण पुन्हा सत्तेवर बसले पाहिजे एवढेच ध्येय त्यांच्यापुढे असते. राजस्थानच्या घटनेतून हिंदूनीही आपली व्होट बॅक निर्माण करण्यास सुरवात केली असल्याचा संकेत मिळतो आहे. हे चूक की बरोबर हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. परंतु आजपर्यत केवळ मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा ठेका घेतलेले राजकीय पक्ष भविष्यात बहुसंख्यांकांचे म्हणजेच हिंदूंचे लांगुलचालन करताना दिसू लागले तर नवल वाटायला नको! परंतु हा पायंडा देशहिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें