गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती सलमान खान यांना चांगलीच महागात पडली आहे. वास्तविक भारतात लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु विकासाला प्राधान्य देणार्या आणि जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळणार्या मोदी यांचा उदोउदो का केला? या मुद्द्यावरुन काही मुस्लिम मान्यवर संतप्त झाले आहेत. मुंबईतील ऑल इंडिया उलेमा कॉन्सिलचे सदस्य व मुंबई अमन कमिटीचे सचिव असलेल्या मौलाना इजाझ काश्मिरी यांनी काल चक्क सलमान विरोधात फतवाच जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी आठ कलमी कार्यक्रमच जाहीर केला असून सलमानला दफनासाठीही कब्रस्तानात जागा देऊ नका असा आदेश दिला आहे. अर्थात असल्या फतव्यांचे पालन येथील विचारस्वातंत्र्यप्रिय आणि राष्ट्रभक्त मुस्लिम समाज करेल काय? याचा साधा विचारही मौलनांनी केलेला दिसत नाही.
हैद्राबादचा खासदार ओवेसी याने काही दिवसांपूर्वीच सलमानचा जय हो हा चित्रपट पाहू नये असे आवाहन केले होते. या आवाहनाला राष्ट्रभक्तांनी केराची टोपली दाखविली आणि अवघ्या तीनच दिवसात जय हो ने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. वास्तविक जय हो मध्ये सामान्य माणसाने अन्यायाविरोधात केलेल्या संघर्षाची कथा दाखविली आहे. या कथेला साहजिकच फिल्मी टच आहे. महत्वाचे म्हणजे आपल्याला एखाद्याने मदत केली तर त्याचे नुसते आभार न मानता तुम्ही इतर तिघांना निरपेक्ष भावनेने मदत करा असा मोलाचा संदेश देखिल दिलेला आहे. परंतु चित्रपट रिलीज झाल्यापासून विविध प्रसारमाध्यमांच्यातून देखिल चित्रपटावर टिकेचा भडीमार होत आहे. आतापर्यतच्या सलमानच्या चित्रपटांवर कधी टिका झालेली पहावयास मिळालेली नाही. अर्थात आता टिका करण्यामागे अत्यंत महत्वाची दोन कारणे आहेत. एक म्हणजे सलमानने 2002 च्या गुजरात दंगलीत मोदींनी माफी मागायची आवश्यकता नाही असे रोखठोकपणे व्यक्त केलेले मत. आणि दुसरे कारण म्हणजे यामध्ये डॅनी या चरित्र अभिनेत्याने केलेली राजकीय पक्षाच्या नेत्याची अर्थात खलनायकाची भूमिका! आता तुम्ही म्हणाल, याचा काय संबंध? पण संबंध आहे. डॅनी यांनी चित्रपटात एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून काम केले आहे. त्या पक्षाचे चिन्ह आणि आता दिल्लीत सतत चर्चेत असलेल्या आप पक्षाचे चिन्ह जवळजवळ सारखे आहे. एका अर्थाने ज्या प्रसारमाध्यमांनी मोदी विरोधी पक्ष म्हणून ज्या आपला उचलून धरले आहे त्या पक्षाशी साधर्म्य असणाराच पक्ष चित्रपटात बदमाश दाखविला आहे. साहजिकच बहुतांशी प्रसारमाध्यमे चित्रपटाच्या विरोधात गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यापूर्वी चार राज्यांत झालेल्या निवडणुकीत भाजपाला चार राज्यात जे यश मिळाले त्याकडे दुर्लक्ष करुन दिल्लीत आपला मिळालेल्या यशाचे वारेमाप कौतुक केल्याचे अद्यापी जनतेच्या स्मरणातून गेलेले नाही. मौलांनांचा फतवा, मालेगाव येथे त्याच्या पुतळ्याची झालेली जाळपोळ, प्रसारमाध्यमांनी केलेला विरोध या सर्वांना सलमान पुरुन उरला आहे. आणि त्याचा चित्रपट तिकीट बारीवर गर्दी खेचतो आहे. तसेच सलमानने माफी मागण्याचा विचार देखिल केलेला नाही. आणि यापुढे करेल असे वाटत नाही.
मौलानांनी जारी केलेल्या फतव्यानुसार सलमान खानचा कोणताही चित्रपट पाहू नये, सलमानला मुसलमान समजण्यात येऊ नये, सलमान सोबत भारतातल्या कोणत्याही मुसलमानाने कसल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, सलमान जाहीरात करीत असलेल्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, सरकारने सलमानला कार्यक्रमासाठी निमंत्रित करु नये आणि समजा त्यांनी बोलावले तर त्या कार्यक्रमावा मुसलमांनांनी बहिष्कार टाकावा आदी आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्याने मौलांनांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्याला समाजातून किती प्रतिसाद मिळतो की तो केराच्या टोपलीत पडतो ते लवकरच समजेल.
नेमक्या याच वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखिल गुजरातच्या दंगलीवर मत व्यक्त केले आहे. पटेल यांनी गुजरात दंगलीबाबत मोदी यांना चक्क क्लिन चिट दिली आहे. न्यायालयाने आणि विशेष पोलीस पथकाने नरेंद्र मोदींना दंगलीस जबाबदार न म्हणता क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे विरोधकांनी मोदींना लक्ष करु नये तसेच न्यायालयाचा आदर करावा असे मत पटेल यांनी व्यक्त केले आहे. यावर सर्वांनीच विचार करायला हवा. राष्ट्रवादी हा काही मोदी समर्थक पक्ष नाही. परंतु असे असतानाही त्यांनी न्यायालयाचा सन्मान करण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. प्रत्येकाने हीच भूमिका घ्यायला हवी. एकदा न्यायालयाने निर्णय दिल्यावर वारंवार मोदींना दोषी धरता येईल का? याचा तटस्थपणे विचार करणे आवश्यक आहे. मग अशा परिस्थितीत सलमानने मोदींना दोषी धरायला पाहिजे होते असे मौलानांना वाटते का? खासदार ओवेसीने दिलेल्या आव्हानाला खुद्द सलमानने प्रत्युत्तर दिले होते. ओवेसी समर्थकांनी माझा चित्रपट पाहू नका असे आवाहन सलमानेच केले होते. यंदा मात्र मौलानांना सलमानचे वडिल आणि ज्येष्ठ पटकथा व संवाद लेखक सलीम खान यांनी मौलानांना उत्तर दिले आहे. भारतात इतक्या दंगली झाल्या त्यावेळी कुठल्या राज्यात कोठला मुख्यमंत्री होता हे फतवा काढणार्या मौलानांना माहित आहे का? सलमानच्या प्रसिध्दीचा काहीजण गैरफायदा घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आतापर्यत भारतात इतक्या दंगली झाल्या परंतु एकाही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कोणी केल्याचे आठवत नाही. परंतु मोदी विषय आला की अनेकांच्या पोटात मळमळायला सुरु होते. काहींना राजकीय पोटदुखीचा आजार असतो त्याला इलाज नाही. या पोटदुखीला जर सार्वजनिक केले तर राजकीय पटलावर या ना त्या कारणाने सतत मोदी हे नाव चर्चेत येते आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष त्याचा लाभ मात्र मोदींनाच मिळतो हे कितीजणांच्या लक्षात येते? हाच खरा प्रश्न आहे. हे प्रकरण देखिल याला अपवाद नाही!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें