आप पक्षाने दिल्ली काबीज केली असली तरी बहुधा पक्षातील नेत्यांचा समज आपण भारतावरच सत्ता मिळविली आहे असा झालेला दिसतो. कुमार विश्वास काल वाट्टेल ते बडबडले. मुस्लिम खासदाराने त्वरित माफी मागावी अन्यथा पाठिंबा काढण्याची धमकी दिल्यानंतर लगेच माफीनाम्याचा प्रयोग झाला. यापूर्वी काश्मिरात सार्वमत घेण्याचे वक्तव्य करुन लाथाबुक्कयांचा प्रसाद खाल्लेले ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी आता काश्मिरात तैनात असलेले लष्कर हटविण्यासाठी सार्वमत घेण्याचीच मागणी पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता काश्मिरमध्ये लष्कर आहे म्हणून तो भाग अद्याप भारतात आहे. ज्या दिवशी सैन्य हटविले जाईल त्यानंतर काही दिवसांनी तेथे पाकचा झेंडा फडकलेला दिसेल. आधीच तेथे फुटीरतावादी संघटना आणि धर्मांध मुस्लिम संघटना जोरात आहेत. त्यामुळे सार्वमत घेतले तर तेथील परिस्थिती पाहता सैन्य हटवावे अशी मागणी आल्यास काय करणार? याचा विचार भूषण यांनी केला आहे का? त्यामुळे आपण काय बोलतो याचे जरा तरी भान प्रशांत भूषण यांनी ठेवायला पाहिजे होते.
जम्मू काश्मिरमधील स्थानिक परिस्थिती काय आहे? हे जनतेला माहित आहे. लाखो कश्मिरी पंडितांना ज्यावेळी तेथून हाकलून लावले त्याचवेळी तेथे फुटीरतेचे अधिकृत बीज पेरले गेले. अगोदरपासून जम्मू काश्मिरला भारतापासून अलग करण्याचे षडयंत्र पाकचे होतेच. त्याला काश्मिरमध्ये फोफावलेल्या फुटीरतावादी संघटनेने बळ दिले. लाल चौकात तिरंगा झेंडा फडकविण्यासही फुटीरतावादी राष्ट्रद्रोह्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळेच भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी लाल चौकात तिरंगा फडकविण्याचे आव्हान स्विकारले व तेथे तिरंगा फडकवला होता. हे आपचे प्रशांत भूषण विसरले काय? काश्मिरमधून सैन्य हटविण्याची मागणी प्रथमपासून फुटीरतावादी गटाची आहे. आता तीच मागणी आप करीत आहे? यातून काय अर्थ घ्यायचा? बहुधा त्याचमुळे माजी लष्करप्रमुख व्ही.पी.मलिक यांनी भूषण यांना काश्मिरमधील स्थानिक स्थितीचे पुरेसे आकलन नसल्यानेच ते अशी विधाने करीत असल्याचे सांगितले आहे.
पण जर आपल्याला एखाद्या विषयात ज्ञान नाही तर त्याबद्दल मत व्यक्त करायचा मुर्खपणा का करायचा? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. आप चा आज सर्वत्र बोलबोला आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. मागे देखिल प्रशांत भूषण यांनी आगलावे वक्तव्य केले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या तरुणांनी त्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. आता पुन्हा परत तीच चुक प्रशांत भूषण यांनी केली आहे. केजरीवाल यांनी कसलेल्या राजकीय पुढार्याप्रमाणे प्रशांत भूषण यांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांचे व्यक्तीगत मत असल्याचे सांगून हात झटकले आहेत. परंतु आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या केजरीवालांना नुसते हात झटकून उपयोग नाही. तर प्रशांत भूषण यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. किंवा डोके फिरलेल्या माणसासारखे बडबडणार्या भूषण यांना आप पक्षातून काढून त्यांची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करावी का? यावर आपच्या इतर कार्यकर्त्यांनी जनतेचे सार्वमत घ्यावे. व सार्वमतप्रेमी असणार्या भूषण यांच्यावर जनतेने दिलेल्या सार्वमतानुसार कार्यवाही करावी. हे धाडस आप टिम दाखविणार आहे का?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें