रविवार, 5 जनवरी 2014

अल्पवयीन गुन्हेगारी ...

आजकाल माध्यमांमध्ये आपल्याला अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्हेगारीच्या बातम्या हमखास वाचावयाला मिळतात. दिवसेंदिवस यामध्ये वाढच होताना दिसत आहे. ही घटना निश्‍चितच धोकादायक आहे. पूर्वीच्या काळी असे प्रकार होत नव्हते. कारण त्यावेळी शाळकरी मुलांना नकार ऐकायची सवय होती. हल्ली आई वडिल दोघेही पैसे कमावण्याच्या मागे असल्याने मुलांचे सर्व हट्ट आपसुकच पुरविले जातात. त्यामुळे त्यांचे फालतू लाड होतात. आणि बहुतांशी शाळकरी पिढी ही त्यांच्याच मस्तीत असते. परिणामी त्यांच्या मनाविरुध्द झाले की लगेच त्यांच्या पध्दतीने त्याला विरोध केला जातो. शिवाय विरोध कसा करायचा हे शिकविण्यासाठी विविध टी.व्ही.चॅनेल्स आहेतच. यामध्ये प्रामुख्याने पालकांनी लक्ष दिले पाहिजे अन्यथा भविष्यकाळ कठीण आहे.
काल बिहार राज्यातील मुजफ्फरपूर येथे घडलेली एक घटना सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारी आहे. आठवीतील शाळकरी मुलीने फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमधून अनफ्रेंड केल्याने संतापलेल्या दहावीतल्या एका विद्यार्थ्याने त्या मुलीच्या घरी जाऊन तीच्या तोंडावर उकळते पाणी फेकले. यामध्ये ती मुलगी गंभीररित्या भाजली आहे. हे दोघेही जण एकाच शहरात राहायला होते. परंतु त्या मुलीने फ्रेंड करण्यास नकार दिल्याने दहावीतला विद्यार्थी संतापला आणि त्याने अविचारी पाऊल उचलले. जरी त्या मुलीचे काही बरेवाईट झाले तरी त्या दहावीतील मुलास आपल्याला काहीही होणार नाही याची खात्री असणार. कारण तो अल्पवयीन आहे ना! मुंबई गॅगरेपमधील एक आरोपी हा अल्पवयीन होता तेव्हा त्याला अत्यंत कमी शिक्षा झालेली बातमी त्याने माध्यमातून वाचली असणार. मुळात गुन्हेगार हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला कायद्यातून सुट मिळतेच कशी हा महत्वाचा प्रश्‍न आहे.
ज्यावेळी तो गुन्हा करतो त्यावेळीच त्याला खात्री असते की आपण कोणताही गुन्हा केला तर सुटणार आहोत. हा समज खोटा ठरविणे गरजेचे आहे. एकदा का अल्पवयीन असल्याचा कोणताही फायदा मिळत नसल्याचे त्याच्या लक्षात येईल तेव्हा शाळकरी मुलांच्या गुन्हेगारी कृत्यात निश्‍चित घट येईल. पालकांनीही मुलांना नकार पचवायला शिकवायला पाहिजे. त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना देऊ नये. काही गोष्टी मिळणार नाहीत असे ठामपणे सांगितले पाहिजे. मुलांना दिलेला पॉकेटमनी ती कोठे खर्च करतात याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु ते होताना दिसत नाही. शाळेत शिक्षकांचाही आजकाल म्हणावा तसा धाक राहिलेला नाही. पूर्वी शाळेत मास्तरांनी मुलाला बडवले की घरी पालक देखील त्याला बडवायचे. कारण पालकांचाही मास्तरांवर गाढ विश्‍वास होता. आजकाल मास्तरांनी मुलांना रागविले की लगेच पालक शाळेत धाव घेऊन आमच्या मुलाला का रागावले? म्हणून जाब विचारतात. वास्तविक पालक आणि मास्तरांनी मिळून विद्यार्थ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. आजची मुले उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहेत. हे विसरुन चालणाार नाही. सर्वानीच लक्ष दिले तर अल्पवयीन मुलांची गुन्हेगारीचा आलेख कमी होईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें