गुरुवार, 2 जनवरी 2014

माध्यमांची गांधारीवृत्ती !

गोवा शहरातील मडगाव येथे 16 ऑक्टोबर 2009 रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. बॉम्बस्फोट प्रकरणी सनातन संस्थेच्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आणि प्रसारमाध्यमांना एक नवा विषय मिळाला. पोलिसांचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच अनेक प्रसारमाध्यमांनी विनाकारण सनातन संस्थेला झोडपायला सुरवात केली. अर्थात प्रत्येक प्रसारमाध्यमांनी काय करायचे? हा त्यांचा अधिकार असल्याने त्याबाबत इथे वाद घालण्यात अर्थ नाही. परंतु बॉम्बस्फोटमध्ये सनातचा हात अशा अर्थाच्या बातम्या देणार्‍या प्रसारमाध्यमांनी काल गोव्यातील विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाकडे मात्र साफ दुर्लक्षच केलेले दिसले. कारण हा निकाल त्यांनी ठळक छापला असता अथवा ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवीला असता तर त्यांचा खोटेपणाच उघडा पडला असता कारण या बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायमूर्तींनी अटक करण्यात आलेल्या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
महाभारतातील कौरवांचे पिता धृतराष्ट्र हे आंधळेच होते. त्यांना आजुबाजूला घडणारे काहीच दिसत नव्हते. परंतु त्यांची पत्नी असणार्‍या गांधारीने डोळस असूनही आपल्यालाही काहीही दिसू नये यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली होती. ती पतीप्रेमासाठी बांधलेली होती. तशीच पट्टी आजच्या बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी सेक्यूलरच्या नावाखाली बांधली आहे का? असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. समाजविघातक अनेक वार्ता सतत कानावर आदळत असतात. परंतु त्यातील काहीच वार्तांना सध्याच्या माध्यमात कोठेतरी कोपर्‍यात जागा मिळते. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. तरी हल्ली सोशल मिडीया आहे. म्हणून बरे!  त्यामुळेच कोणतीही बातमी लपून राहत नाही. काही क्षणात इतरांनी दाबलेली बातमी सर्वांपर्यत पोहचते. एखाद्याने खरेच गुन्हा केला असेल तर त्यावर शाब्दीक फटकारे ओढलेच पाहिजेत याबाबत दुमत नाही. परंतु तपासही पूर्ण झाला नसताना अनेक माध्यमे थेट न्यायालयाच्या भूमिकेत शिरतात ते कितपत योग्य आहे? याचाही शांतपणे संबंधितांनी विचार करणे गरजेचे आहे. एखाद्याला बदनाम करण्यास वेळ लागत नाही. परंतु त्याची गेलेली अब्रु परत येत नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे.त्यामळेच बातमी देताना तारतम्य ठेवणे आवश्यक आहे.
अनेक माध्यमे स्वत:ला निपक्षपाती म्हणवितात.मग दोन्ही बाजूकडील बातम्या दाखविण्यात काय हरकत आहे? आरोपांच्या फैर्‍या झाडण्यासाठी जर तुम्ही काही तास खर्ची घालणार असाल तर ज्यावेळी सदर प्रकरणाचा निकाल लागेल त्यावेळी तेवढेच तास खर्ची का घातले जात नाहीत ? असा प्रश्‍न तटस्थपणे विचार करणार्‍याला पडला आहे. आरोपांची बॅनर न्यूज आणि निकालाची बातमीही नाही हे कोणत्या तत्वात बसते. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रे असा भेदाभेद करत नव्हती. जे सत्य असेल त्यालाच प्रसिध्दी मिळत असे. आगरकरांनी दर्पण वृत्तपत्र काढले. ते कशासाठी? दर्पण म्हणजे आरसा! समाजाचे प्रतिबिंब आपल्या वृत्तपत्रात पडावे म्हणूनच ना! लो. टिळक नेहमी वृत्तपत्राला जागल्याची उपमा देत असत. भारतीय माध्यमांना गौरवशाली परंपरा आहे. त्याचे पाईक होण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. माध्यमांनी स्विकारलेली गांधारीची भूमिका ही निश्‍चितच धोकादायक असून आता त्यांनी डोळ्यावर बांधलेली पट्टी फेकून देणे गरजेचे आहे.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें