मंगलवार, 21 जनवरी 2014

गुजरात दंगा आणि सलमान

काही कलाकार पडद्यावर दबंगगिरी करतात तर काही पडद्याबाहेरही! आतापर्यत सलमान खान हा पडद्यावर प्रचंड हाणामारी करुन दबंग स्टार म्हणून ओळखला जात होता. परंतु गुजरातला मोदींसमवेत पतंग उडविल्यापासून त्याने मोदीराग आळवायला प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे त्याने समाज काय म्हणेल? या फालतू प्रश्‍नाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते. काल पुन्हा त्याने गुजरात दंगलीबाबत मोदींनी माफी मागण्याची गरज नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. नेमक्या त्याच दिवशी केजरीवाल यांचे दिल्लीत धरणे आंदोलन सुरु झाल्याने सलमानच्या वक्तव्याला म्हणावी तशी प्रसिध्दी मिळाली नाही. असे असले तरी सलमानने ज्या धाडसाने सत्य सांगितले आहे त्याचे कौतुक करावेच लागेल.
गुजरात दंगलीवरुन नरेंद्र मोदी यांना अनेकांनी टार्गेट केले आहे. आता तर न्यायालयाने मोदी यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊनही विरोधक ऐकायला तयार नाहीत. जर गुन्हा केलाच नाही तर माफी का मागायची? अशी मोदींची भूमिका आहे. दंगल आटोक्यात आणण्यासाठी मोदी यांनी सर्व ते प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तरीही त्यांच्यावर दंगलीचे खापर फोडण्यात येते. मोदींच्या अगोदर कॉग्रेसच्या राजवटीत यापेक्षा भयानक दंगली झाल्या आहेत. परंतु सोयिस्कररित्या त्याच्याबाबत कोणीच काही बोलत नाही. देशातील मुस्लिम समाज गुजरात दंगलीबाबत मोदींवर नाराज असल्याचे काल्पनिक चित्र तयार करण्यात येते. त्यात काहीही अर्थ नसल्याचे गुजरातच्याच निवडणुकीने दाखवून दिले आहे. जर मोदींवर तेथील मुस्लिमांचा विश्‍वास नसता तर मोदी दंगलीनंतर तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते का? आणि मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणूकीत भाजपाला जबरदस्त यश मिळालेच नसते.
सलमान खान मध्यंतरी गुजरातला जय हो या चित्रपटाच्या प्रमोशनला गेला होते. तेथे त्याने मोदींसोबत जेवण केले तसेच पतंगही उडविला. तेथेच प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्याने मोदी हे चांगले माणूस असल्याचेही सांगितले होते. आता अन्य एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सलमानने गुजरात दंगलीबाबत मोदींनी माफी मागायची गरज नसल्याचे रोखठोक मत व्यक्त केले आहे. यामुळे विरोधकांची तंतरली असेल. कारण त्यांना सलमानकडून ही अपेक्षा नसेल. काही का असेना सलमानने सत्य सांगण्याचे धाडस दाखविले आहे त्याला दाद द्यावीच लागेल. मोदीराग आळविल्याने भविष्यात त्याला मोदीविरोधकांचा सामना करावा लागेल. अर्थात सलमान दबंग स्टार असल्याने कोणाशी कसा सामना करायचा? याचे त्याला चांगले ज्ञान आहे. त्यामुळे विरोधकांचाच बोजवारा उडेल असे वाटते.

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें