व्यसन हा प्रांत निदान भारतात तरी बहुतांशी वेळा पुरुषांकडेच असतो. असा एक भाबडा समज अनेकजणांचा आहे. परंतु तो सपशेल खोटा असल्याचे आता समोर आले आहे. लंडन येथील हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूएशन अर्थात आयएचएमई या संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात जगात सर्वाधिक धुम्रपान करणार्या महिलांमध्ये भारतीय महिला दुसर्या स्थानावर असल्याचे खळबळजनक सत्य समोर आले आहे. ही शरमेची बाब आहे. धुम्रपान हे वाईटच! सिगरेटच्या पाकिटावर तसा उल्लेख असूनही कित्येकजण धुम्रपानाच्या प्रेमात पडतात. आणि आयुष्य बरबाद करुन घेतात. प्रशासन देखिल याबाबत फार जागरुक असल्याचे दिसत नाही. केवळ महसुलांमध्ये कशी वाढ होईल हेच पाहिले जाते. नुकतेच 31 डिसेंबरचे उदाहरण ताजे आहे.
व्यसनांपासून माणूस दूर रहावा यासाठी शासनाने स्वतंत्र खाते काढले आहे. परंतु एकीकडे व्यसनाला प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे व्यसने करु नका म्हणून ओरडून सांगायचे हे कोणते धोरण? असाच प्रश्न सामान्यांना पडला आहे. 31 डिसेंबरला वास्तविक ड्राय डे घोषित करणे गरजेचे होते परंतु त्या दिवशी मुंबईत पहाटे पाच वाजेपर्यंत बार उघडे ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यातच अनेकांना धन्यता वाटते. मग स्त्री पुुरुष समानतेच्या युगात महिला कशा मागे राहतील. जरा आधुनिक शहरांमध्ये फेरफटका मारुन तर पहा. तेथील युवती वागण्याच्या बाबतीत किती बोल्ड आहेत ते दिसून येईल.
आता लंडन येथील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून महिला व्यसनांच्या बाबतीतही मागे नसल्याचेच समोर आले आहे. आयएचएमई संस्थेच्या सर्वेक्षणानुसार सध्या भारतात धुम्रपान करणार्या महिलांचे प्रमाण 12.1 कोटी इतके आहे. मागील तीन दशकांमध्ये धुम्रपान करणार्या महिलांचे प्रमाण 3.2 टक्कयांनी वाढले आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पुरुषांच्या संख्येत मात्र घट होत आहेत. संस्थेने 2012 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भारतात दिवसाला आठ सिगरेट ओढल्या जात असल्याचा निष्कर्ष काढला होता. अतिशय धक्कादायक अशी ही बाब आहे. प्रत्येकालाच मानसिक ताण तणाव हे असतातच. परंतु त्याला व्यसन हा काही पर्याय होऊ शकत नाही. महिलांकडे संस्कारक्षम व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. जगात जेवढी चांगली माणसे निर्माण झाली आहेत. त्यांना लहानपणी त्यांच्या आईने दिलेले संस्काराचे बाळकडूच उपयोगी पडले होते. आणि जर आजच्या युगातील महिलाच व्यसनांच्या आहारी गेल्या तर देशाचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांची काय गत होईल याचा विचारच केलेला बरा! प्रशासनाने गुटख्यावर जशी बंदी घालण्याचे धाडसी पाऊल उचलले तसेच महसुलाकडे न पाहता सिगरेटवर देखिल बंदी आणावी किंवा सिगरेटच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ करावी जेणेकरुन सिगरेट खरेदी सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जावी. अन्यथा भविष्यकाळात सिगरेट ओढण्याच्या बाबतीत महिलांनी क्रमांक एकपर्यंत मजल मारली तर नवल वाटण्याचे कारण नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें