कॉग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत सुरु असलेल्या अखिल भारतीय कॉग्रेस समितीच्या महाअधिवेशनात आवेशपूर्ण आणि जोरदार भाषण केले. आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. त्यामध्ये त्यांनी चमको विरोधक हे केस गळालेल्या माणसाला कंगवा विकतील आणि टकल्या माणसाचा हेअर कट करतील अशी टिका केली. अर्थातच विरोधकांमध्ये काहीही दम नाही हेच सांगण्याचा त्यांचा उद्देश होता. परंतु येथे एक प्रश्न उपस्थित होतो तो हा की, जर चमको विरोधक इतके भंपक आहेत तर त्यांच्या सभांना गर्दी का होते? आणि नुकत्याच झालेल्या चार विधानसभेच्या निवडणुकीत चमको विरोधकांनी प्रदीर्घ परंपरा असलेल्या कॉग्रेसचा धुव्वा का उडविला?
डोळे उघडे ठेवून पाहणार्या कोणालाही सध्या देशात कॉग्रेस विरोधात लाट आली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपा आणि आप या पक्षाला (अर्थात राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार चमको विरोधक ) जबरदस्त यश मिळाले आहे हे विसरुन कसे चालेल? आजच्या भाषणात राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात कडक पावले उचलणार असल्याचा इशारा दिला. मग सामान्यांसमोर असा प्रश्न पडला आहे की, इतके वर्ष सत्तेत असणार्या कॉग्रेसच्या सरकारला भ्रष्टाचार्यांना शिक्षा करण्यापासून कोण रोखले होते का? कॉग्रेसला दैदिप्यमान इतिहास होता हे कोणीच नाकारु शकत नाही. स्वातंत्र्यापूर्वीची कॉग्रेस आणि आताची कॉग्रेस यात जमीन आस्मानाचे अंतर असल्याचे सामान्य माणूस देखिल मान्य करील. सामान्य माणूस त्याचे मत हे अनुभवांवरुन बनवत असतो. सरकारमधले मंत्रीच भ्रष्टाचार करतात आणि सत्ताधारी त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई करीत नाहीत. हे त्याला दिसत आहे. इतके वर्ष काही करायचे नाही आणि निवडणुकीपूर्व मात्र आवेशपूर्ण भाषण करायचे याला काय म्हणायचे? जनता काही आता मूर्ख राहिलेली नाही. जो काम करणार नाही आणि केवळ भाषणे करुन जनतेला आश्वासने आणि उपदेशाचे डोस देईल त्याला भविष्य नाही. याचे ट्रेलर जनतेने नुकत्याच झालेल्या चार विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे.
अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 12 करण्याची विनंती राहुल गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली. मागणी योग्यच आहे. परंतु मग प्रारंभीच हा निर्णय का घेण्यात आला नाही? पेट्रोलिअम मंत्री विराप्पा मोईली यांनी काही दिवसापूर्वीच अनुदानित सिलेंडर 12 करण्याचे संकेत दिले होते. आता अधिकृतरित्या राहुल गांधी त्यावर शिक्कामोर्तब केले. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची अंमलबजावणीही त्वरेने होईल यात वाद नाही. कॉग्रेस का हाथ आम आदमी के साथ असे म्हटले जाते. परंतु आम आदमी आज चमको विरोधकांच्या मागे का लागला आहे? याचा विचारही कॉग्रेसच्या महाअधिवेशनात चर्चेला आला असेलच. जनता आता आश्वासनांना कंटाळली आहे. त्यामुळेच दिल्लीत आप ला लोकांनी निवडून दिले आहे. यापूर्वी आपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन जनतेच्या खांद्याला खांदा लावून आंदोलने केली आहेत. त्यामुळे लोकांच्यात साहजिकच आप बद्दल विश्वास उत्पन्न झाला आहे. अर्थात या विश्वासाला तडे जाऊ न देण्याची जबाबदारी आपने सांभाळली नाही तर पुन्हा सत्ताबदल होऊन लोकांना जो पक्ष खरोखरच देशाचे भले करेल, जनतेची कामे करील असे वाटते त्यांना मतदान करेल यात शंका नाही.
या अधिवेशनातच कॉग्रेसतर्फे कोण पंतप्रधान होणार? त्याचे नाव जाहीर झाले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. कारण विरोधी पक्ष असणार्या भाजपाने त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुध्द संपूर्ण कॉग्रेस पक्षातील नेते अशीच निवडणुक रंगणार असल्याची चिन्हे आहेत.राहुल गांधी यानी विरोधी पक्षांवर टिका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते आणि नेते जनतेची सेवा करण्यात कसे मग्न होतील ते पाहिले पाहिजे. अन्यथा चमको विरोधी पक्षामागे जनता गेली तर पुन्हा जनतेच्या नावाने बोटे मोडून काहीही फायदा होणार नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें