बुधवार, 1 जनवरी 2014

साहित्यसंमेलन साधेपणाने व्हावे!

मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी हमखास वेगळ्याच कोणत्यातरी मुद्दयावरुन गाजते. यंदा रजनिकांतला निमंत्रण देण्याचा मुद्दा चर्चेत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. कारण मुळ मुद्दा हा संमेलन साधेपणाने केले पाहिजे हा आहे. आणि याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते. संमेलनात दरवर्षी सरकार 25 लाखांचा निधी देते. तसेच स्थानिक संयोजन समिती देखिल निधी गोळा करते. परंतु खरेच या पैशाचा सदउपयोग होतो का? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. विनाकारण संमेलनात अनावश्यक खर्च करण्यात येतो तो टाळण्यासाठी कोणताच संमेलनाध्यक्ष काहीही करत नाही हेच खरे दुर्दे:व आहे.
यंदा आचार्य अत्रे यांच्या गावी सासवड येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साहित्यप्रेमींचा उत्सव साजरा होईल. संमेलनाध्यक्ष फ.मु.शिंदे यांनी निवड होताच संमेलन साधेपणाने साजरे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु ती कधीही पूर्ण होणार नाही याची साहित्यप्रेमींना खात्री होती. संमेलनाध्यक्ष कणखरपणे एखादा निर्णय का घेऊ शकत नाही? याचे उत्तर बहुधा कोणाकडेच नसेल. मग त्या अध्यक्षाला अर्थ काय? असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात निर्माण झाल्यास आश्‍चर्य करण्याचे कारण नाही. प्रत्येक संमेलनात खर्चाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचेच दिसत आहे. हाच पैसा जर साहित्यप्रेमींसाठी खर्च झाला तर अधिक चांगले होईल. साहित्यीकांना राहण्याकरिता उच्च दर्जाची हॉटेल्स कशाला पाहिजेत? साहित्यीकांवर प्रेम करणार्‍या वाचकांची संख्या कमी नाही. मग साहित्यीकांनी संमेलनाच्या काळात त्यांचा मुक्काम त्यांच्या चाहत्यांच्या घरी केला तर चालणार नाही का? अर्थात याचे सर्व संयोजन स्थानिक संयोजन समितीनेच केले पाहिजे.
साधी राहणी उच्च विचारसरणी हे वाक्य आता फक्त पुस्तकातच सिमित झाले आहे. या तत्वानुसार आचरण करणारी माणसे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच संख्येत आहे. संमेलनाच्या निमित्ताने निदान साधी राहणी याचा अवलंब संबंधितांनी केला तर ते सर्वानाच आवडेल. संमेलनासाठी जो निधी जमा होईल त्यातून इतर साहित्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील. उदा. सध्या पुस्तकांच्या किंमती सामान्य वाचकांच्या खिशाला परवडणार्‍या  नाहीत. मग अनावश्यक खर्च होणारा पैसा काही प्रमाणात प्रकाशक संस्थांना दिला तर निदान पुस्तकांच्या किंमती तरी कमी होण्यास मदत होईल ना? किंवा संमेलनात विक्री होणार्‍या सर्व पुस्तकांवर पन्नास टक्के सवलत लावून प्रकाशकांचा जो तोटा होईल तो स्थानिक संयोजन समितीने जमा केलेल्या निधीतून भरुन द्यायला काय हरकत आहे? मंडप, भव्य व्यासपीठ, साहित्यीकांसाठी राहण्यासाठी महागडी हॉटेल, त्यांच्या खाण्या- पिण्याची मस्त सोय, संमेलनात येणार्‍या ठराविक साहित्यप्रेमींना देण्यात येणारे चमचमीत जेवण हा खर्च वाचविण्यात येणार नाही का? निश्‍चित येईल. परंतु त्यासाठी गरज आहे ती खमक्या संमेलनाध्यक्षाची!

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें